घरटेक-वेक'आत्मनिर्भर भारत' व्हिजनची काहींनी चेष्टा केली, पण...; पंतप्रधानांकडून 5जी सेवेचे लॉन्चिंग

‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनची काहींनी चेष्टा केली, पण…; पंतप्रधानांकडून 5जी सेवेचे लॉन्चिंग

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे 5जी सेवेचा शुभारंभ केला. काही लोकांनी माझ्या आत्मनिर्भर भारत व्हिजनची चेष्टा केली. गरीबांना डिजिटलचा अर्थही समजणार नाही, असे काहींना वाटत होते. पण ही 5जी सेवा आता डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, एका नव्या युगाची नांदी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

डिजिटल इंडियाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, ही केवळ सरकारी योजना आहे, असे काहींना वाटते. पण डिजिटल भारत हे केवळ एक नाव नाही, तर देशाच्या विकासासाठीचा तो एक मोठा दृष्टिकोन आहे. जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्गाने गरीबांना डिजिटलचा अर्थ तरी समजेल का, असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली होती. पण देशातील सामान्य माणसाची समज, शहाणपण आणि जिज्ञासूपणा यावर आपला नेहमीच विश्वास होता. देशातील गरीब जनता नेहमीच नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला तयार असल्याचे आढळले आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल भारतासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, उपकरणाची किंमत, डिजिटल संपर्क सक्षमता (कनेक्टिव्हिटी), डेटाची किंमत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डिजिटल फर्स्ट हा विचार या चार आधारस्तंभांवर आम्ही एकाच वेळी लक्ष केंद्रित केले. 21व्या शतकातील वेगाने विकसित होणाऱ्या भारतासाठी आजचा दिवस विशेष आहे. देशाच्या दूरसंचार उद्योगाकडून 5जीच्या स्वरुपात एक अद्भुत भेट मिळत आहे. नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाचा विकास आणि कार्यान्वयनामध्ये भारत सक्रिय भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आठ वर्षांपूर्वीपर्यंत भारतात फक्त दोन मोबाईल उत्पादन युनिट (यंत्रणा) होती, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. हीच संख्या आता 200च्यावर गेली आहे. 2014मधील मोबाईल फोनच्या शून्य निर्यातीवरून, आज आपण काही हजार कोटींचे मोबाईल फोन निर्यात करणारा देश बनलो आहोत. स्वाभाविक आहे, या सर्व प्रयत्नांचा परिणाम उपकरणाच्या किमतीवर झाला. आता आपल्याला कमी किमतीत अधिक फीचर्स मिळू लागली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

देशाला 2047पर्यंत ‘विकसित देश’ बनवण्याची उमेद जागवणाऱ्या पंतप्रधानांच्या प्रेरणादायी द्रष्टेपणाबद्दल रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी यावेळी पंतप्रधानांचे आभार मानले. 5-जी तंत्रज्ञान देशातल्या लोकांसाठी अमर्याद संधीचा सागर घेऊन येणारे आहे, विशेषतः ग्रामीण भागात, यामुळे विपुल संधी उपलब्ध होतील, असे भारती एन्टरप्रायजझेसचे अध्यक्ष, सुनील भारती मित्तल म्हणाले. तर, 5-जी ची देशांत होणारी सुरुवात, भारताच्या रोमहर्षक प्रवासाची सुरुवात आहे. देशात 5-जी तंत्रज्ञानाचे आगमन होणे ही जागतिक मंचावर भारताची ताकद दर्शवणारी घटना आहे, असे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -