माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चूक, मंचावर भाषण करताना चाकू घेऊन पोहोचला तरुण

काशीपुर कोतवाल मनोज रतूडी यांनी रात्री उशीरा माहिती दिली आहे की, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभात साहनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतापपूर गावातील विनोद कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

major mistake in harish rawat security youth come on stage with knife
माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चूक, मंचावर भाषण करताना चाकू घेऊन पोहोचला तरुण

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांच्या सुरक्षेतही हलगर्जीपणा झाला आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाच्या कार्यक्रमात रावत मंचावरुन संवाद साधत होते. त्याचवेळी एक युवक हातात चाकू घेऊन मंचावर आला आणि एकच खळबळ उडाली. या युवकाने जय श्री रामचा नारा देण्याची धमकी दिली होती. सुदैवाने रावत मंचावरुन खाली उतरले होते. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केल आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत उत्तराखंडमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रावत यांनी सभेला संबोधित केले आणि शेवटी मंचावरुन खाली उतरत असताना एका तरुणाने मंचावर धाव घेतली. हातात चाकू घेऊन तरुण मंचावर आला. चाकू फिरवत त्यांनी माईक धरला आणि उपस्थितांना जय श्री राम म्हणण्याचा आग्रह केला. जर घोषणाबाजी केली नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करेल असं तो युवक म्हणाला.

सभेत अनपेक्षित घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु मंचावर उपस्थित असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पकडले आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेण्यात आले मात्र तरुण हात पाया पडून पळून गेला. एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार पुन्हा त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोज जोशी यांनी पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे. एक युवक चाकू घेऊन मंचावर पोहोचला, मात्र माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना त्याची माहिती नव्हती. निवडणुकीपूर्वी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. दुसरीकडे, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, आरोपी तरुण आधीच कार्यक्रमाला उपस्थित होता. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे आगमन होताच त्यांनी त्यांना पुष्पहारही घातला होता.

आरोपी मानसिकदृष्ट्या कमकुवत

काशीपुर कोतवाल मनोज रतूडी यांनी रात्री उशीरा माहिती दिली आहे की, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभात साहनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतापपूर गावातील विनोद कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपी तरुण मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची माहिती रतूडी यांनी दिली आहे.


हेही वाचा : भाजपाच्या माजी नगरसेवकावर दुसरा गुन्हा दाखल