घरदेश-विदेश'या' गावात मुलगी जन्मल्यावर १११ झाडं लावतात!

‘या’ गावात मुलगी जन्मल्यावर १११ झाडं लावतात!

Subscribe

राजस्थानमध्ये असलेल्या पिपलांत्री गावात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर १११ झाडं लावली जातात.

भारतात स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींच्या बालहत्येच्या घटना काही नवीन नाहीत. घरात मुलगी जन्मली की पुरुष मंडळींची नाराजी स्त्रीच्या पदरी पडायची. घरात मुलगी असली तर तिच्या लग्नाच्या वेळी जास्त हुंडा द्यावा लागेल किंवा वंशाला कोणी वारस मुलगा पाहिजे अशा विचारांमुळे मुलगी नकोच, अशा विचारांना कित्येक वर्षांपासून खतपाणी मिळत गेलं. पण राजस्थान येथील पिपलांत्री गावात काहीसं वेगळं दृश्य पाहायला मिळतं. या गावात घरात मुलगी जन्मली की लोकं आनंदी होतात आणि त्या आनंदात १११ झाडं लावली जातात! हे इथेच थांबत नाही, तर दरवर्षी गावातल्या मुली या झाडांना राखी देखील बांधतात आणि त्यांची रक्षा करतात.

- Advertisement -

मी १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या ग्रामपंचायतीत हा पुढाकार घेतला आणि आताही तो चालू आहे.

श्याम सुंदर पालीवाल, माजी सरपंच, पिपलांत्री

Shyaam Sundar Paliwal
श्याम सुंदर पालीवाल

पालीवाल यांची मुलगी किरण हिचा २००७ मध्ये मृत्यू झाला. यानंतरच पालीवाल यांनी हा उपक्रम सुरू केला होता. या शिवाय पालीवाल यांनी गावातील लोकांच्या रोजगारासाठीही वेगळे उपक्रम चालू केले होते. याव्यतिरिक्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘भामाशाह’ योजना सूरू करण्यात आली होती. ही एक कौटुंबिक योजना असून या योजनेत घरातील महिलेचं बँकेत खातं आणि ‘भामाशाह कार्ड’ बनवलं जातं. यामुळे तिला घरातील निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातो. मुलीच्या सक्षमीकरणासाठी तिच्या जन्मानंतर झाडं लावण्याव्यतिरिक्त तिच्या नावाची फिक्स्ड डिपॉजिट (एफडी) केली जाते. १० हजाराची रक्कम मुलीच्या पालकांकडून आणि ३१ हजाराची रक्कम देणगीदार आणि भमाशाह योजनेतून गोळा करून एफडीमध्ये ठेवली जाते.

- Advertisement -

मुलगी लग्नाच्या वयाची झाल्यानंतर अर्थात तिच्या वयाच्या १८ वर्षांनंतर ही एफडीची रक्कम काढता येऊ शकते. एफडीच्या रकमेवर आलेल्या व्याजामुळे ही रक्कम तोपर्यंत काही लाखांच्या घरात गेलेली असते. त्यामुळे मुलींना लग्नासाठी किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी या रकमेचा मोठा हातभार लागतो. या सगळ्या उपक्रमांमुळे मुलींचं सक्षमीकरण तर होतंच, पण वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचं देखील संवर्धन केलं जातं. त्यामुळे या उपक्रमांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -