घरदेश-विदेशनितीश कुमारांना पुन्हा पंतप्रधानपदाचे स्वप्न; विरोधकांची मोट बांधण्याचा उचलला विडा

नितीश कुमारांना पुन्हा पंतप्रधानपदाचे स्वप्न; विरोधकांची मोट बांधण्याचा उचलला विडा

Subscribe

नवी दिल्ली : जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यासाठी त्यांनी आता विरोधकांची मोट बांधण्याचा विडा उचलला आहे. परंतु यात काँग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

सन 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाप्रणित लोकशाही आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार इच्छुक होते. परंतु भाजपाकडून नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आल्यानंतर नाराज झालेल्या नितीश कुमार रालोआतून बाहेर पडले. परंतु 2017मध्ये राष्ट्रायी जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्याशी बिनसल्याने तसेच भाजपाचा बोलबोला ध्यानी घेऊन नितीश कुमार पुन्हा रालोआमध्ये सामील झाले. पण आपला जदयू फोडण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचा आऱोप करत नितीश कुमार हे पुन्हा रालोआतून बाहेर पडले आणि पुन्हा एकदा राजद व काँग्रेसची मदत घेत सरकार स्थापन केले.

- Advertisement -

रालोआची साथ सोडल्यानंतर त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यासाठीच ते आता विरोधकांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भाजपामुक्त भारत करण्याचा त्यांचा मानस असून ते प्रारंभी समाजवादी गटातटांशी संपर्क साधणार आहेत. त्यानंतर ते प्रादेशिक पक्षांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे, बुधवारी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नितीश कुमारांना किती साथ मिळते, हा खरा प्रश्न आहे. शिवाय, विरोध गटाचे नेतृत्व करण्याचा मानस असलेल्या तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी व टीआरएस यासारखे पक्ष मात्र मौन बाळगून आहेत.

ते आता दिल्लीदौरा करत असून या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र करत आहेत. त्यामुळे नितीश कुमार आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्त्व आहे. तसेच ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नितीश कुमारांच्या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची शक्यता
तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनी अलीकडेच बिहारमध्ये नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. विरोधकांच्या एकजुटीची ही नांदी असल्याचे जदयू व राजदने म्हटले आहे. परंतु काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी असावी, असे केसीआर यांचे म्हणणे असल्याचे जदयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी सांगितले. तर, काँग्रेस आणि डाव्या आघाडीला वगळून भाजपाविरोधी आघाडी बनवता येणार नाही, असे जदयूचे मत आहे. शिवाय, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेत विरोधकांच्या एकजुटीला धक्का दिला होता. त्यामुळे 2024च्या निवडणुकीतही आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा प्रयत्न तृणमूलचा राहील, अशी दाट शक्यता आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -