नूपुर शर्मांविरोधात कोलकाता पोलिसांची लुकआऊट नोटीस, समन बजावूनही गैरहजर

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता कोलकाता पोलिसांनी नुपूर यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे

पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याने अडचणीत आलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मागची शुक्ल काष्ट संपता संपत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता कोलकाता पोलिसांनी नुपूर यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. कोलकाता पोलिसांनी त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. त्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नुपूर यांच्याविरोधात कोलकाता येथे  १० पोलीस ठाण्यात तक्रार

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह विधानप्रकरणी कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना नारकेलडांगा पोलीस ठाण्यात २० जूनला हजर होण्यास सांगितले होते. तर २५ जूनला एमहस्ट स्ट्रीट पोलीस ठाण्यानेही त्यांना समन जारी केले होते. पण नुपूर यांनी या दोन्ही पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला. नुपूर यांच्याविरोधात कोलकाता येथे १० पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नुपूर शर्मा यांना त्यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून फटकारले होते. सध्या देशात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणासाठी नुपूर यांनाच न्यायालयाने जबाबदार ठरवले. उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडही नुपूरमुळेच घडल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. तसेच नुपूर यांनी मीडियासमोर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधातील वक्तव्य हे थिल्लर प्रसिद्धीसाठी, राजकीय हेतूने किंवा जाणीवपूर्वक वाईट कृत्याला प्रेरित करण्यासाठी केली असल्याचे मत न्यायालयाने मांडले . नुपूर यांची वक्तवे ही अहंकारी आणि अस्वस्थ करणारी असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.त्याचबरोबर अशी प्रक्षोभक विधाने करण्याची गरज काय असा सवालही न्यायालयाने नुपूर यांना केला.

त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनीही नुपूर शर्मा यांना पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी याआधीही कलम ४१ ए अंतर्गत त्यांना  नोटीस पाठवली . त्यानंतर १८ जूनला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO युनिटसमोर नुपूर यांनी आपला जबाबही नोंदवला होता.