घरदेश-विदेशOdisha Train Accident : केंद्राच्या 'जाहिरातबाजी'वर टीका करताना काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती

Odisha Train Accident : केंद्राच्या ‘जाहिरातबाजी’वर टीका करताना काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक असलेल्या ओडिशा रेल्वे दुर्घटनेत (Odisha Train Accident) किमान 288 प्रवासी ठार आणि 900हून अधिक जखमी झाले. या भीषण रेल्वे अपघाताबाबत आता काँग्रेसने (Congress) भारतीय जनता पार्टीला (BJP) घेरले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि पक्षाचे नेते पवन खेडा यांनी जोरदार टीका करत मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

- Advertisement -

रेल्वेत 3 लाख पदे रिक्त आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. पंतप्रधान कार्यालयात भरती होत असेल तर, तशी भरती 9 वर्षांत का केली गेली नाही? मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे लोको पायलटच्या कामाचे तास वाढले असून हे अपघातांच्या वाढत्या संख्येचे प्रमुख कारण असल्याचे रेल्वे बोर्डाने नुकतेच कबूल केले आहे. मग पदे का भरली नाहीत? 8 फेब्रुवारी 2023 रोजी म्हैसूरमध्ये दोन गाड्यांची टक्कर होण्याची शक्यता होती. या संभाव्य दुर्घटनेचा हवाला देऊन सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या प्रधान मुख्य ऑपरेटिंग व्यवस्थापकाने सांगितले होते. रेल्वे मंत्रालयाने त्याची अंमलबजावणी का केली नाही? रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (CRS) शिफारशींबाबत रेल्वे बोर्डाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल संसदीय स्थायी समितीने आपल्या 323व्या अहवालात रेल्वेवर टीका केली आहे. सीआरएस केवळ 8 ते 10 टक्के अपघातांचा तपास करते, असे त्यात म्हटले होते. मग सीआरएस मजबूत का केले नाही? असे अनेक सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

मोदी सरकारकडून 10-12 चकचकीत गाड्या (वंदे भारत) दाखवण्याच्या नादात संपूर्ण सिस्टीमच ढासळत चालली आहे, असी टीका पवन खेडा यांनी केली. राजीनामे म्हणजे नैतिक जबाबदारी घेणे, मात्र येथे नैतिकताच उरली नाही तर राजीनामा कोणाकडे मागायचा, असा बोचरा सवाल करून पवनखेडा म्हणाले, रेल्वेरुळांच्या देखभालीसाठीचे बजेट सातत्याने कमी होत आहे, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. रेल्वेच्या अहवालानुसार 3 लाख 12 हजार पदे रिक्त आहेत. भलेही जीव गेला तरी, बेहत्तर पण जाहिरातबाजी करत राहणार, सरकारला हे धोरण सोडावे लागेल. पंतप्रधान मोदी या भीषण अपघाताची जबाबदारी घेणार का? सरकार रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कॅग आणि स्टॅण्डिंगच्या अहवालाची दखल घेणार का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत, असे खेडा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -