प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांची सरकारला चिंता, यंदा परेडचे पास फक्त दिल्लीकरांनाच

25 thousands spectators will be allowed at Rajpath this year for republic day parade
यंदा प्रजासत्ताक दिनी परेड पाहण्यासाठी फक्त २५ हजार प्रेक्षकांना परवानगी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी इतर राज्यातून दिल्लीत येणाऱ्या प्रेक्षकांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यावेळच्या प्रजासत्ताक दिनासाठी फक्त दिल्लीवासीयांनाच सहभागी होण्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे यामागचे कारण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत एक मुद्दा समोर आला होता, तो म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शेतकरीच कार्यक्रमाचे तिकिट खरेदी करून परेडमधील येतील आणि त्याठिकाणीही घोषणाबाजी करतील. याच कारणामुळे शेतकऱ्य़ांना नवी दिल्लीत येण्यासापासून मज्जाव करण्यासाठी केंद्राकडूनच आता रणनिती आखण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या तयारीच्या निमित्ताने नुकतीच एक बैठक झाली. राजपथ येथे झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या बैठकीत दिल्ली पोलिस, एनडीएससी, पीडब्ल्यूडी आणि संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दिल्ली पोलिस सह आयुक्त जसपाल सिंह यांनी प्रश्न केला की यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी पासेसची विक्री कशा पद्धतीने केली जात आहे ? पास फक्त दिल्लीकरांना मिळत आहेत की संपुर्ण देशातील लोकांना मिळत आहेत असा सवाल त्यांनी केला. पासची विक्री करताना ओळखपत्र तपासण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. जर पास खरेदी करून शेतकऱ्यांनी परेडमध्ये घोषणाबाजी केली तर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा होऊ शकतो असा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

दिल्लीकरांनाच पासची विक्री झाली तर असा प्रकार घडण्याची शक्यता कमी आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे फक्त २५ हजार पासची विक्रीच होणार आहे. इतर वेळी मोठ्या प्रमाणात जशी पासची विक्री होते, तसे पास यंदा विकण्यात येणार नाहीत. दिल्ली पोलिसांनी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाबतची चिंता बोलून दाखवली. त्यावर वरिष्ठ पातळीवरच रणनिती घोषित होणार आहे असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.