घरदेश-विदेशजनतेला राहुल गांधींबद्दल सहानुभूती आहे, खासदारकीवरून शशी थरूर यांचा दावा

जनतेला राहुल गांधींबद्दल सहानुभूती आहे, खासदारकीवरून शशी थरूर यांचा दावा

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ठोठावलेली शिक्षा आणि त्यानंतर त्यांची रद्द केलेली खासदारकी यावरून लोकांच्या मनात राहुल गांधी यांच्याबद्दल सहानुभूती आहे, यात शंका नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा दावा केला.

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजपाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर गुजरातमधील सुरत न्यायालयात सुनावणी होऊन राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

- Advertisement -

न्यायालयाच्या या निकालाच्या आधारे संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत या प्रश्नावरून गदारोळ केला. गेल्या सोमवारी तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेते संसदभवनात काळे कपडे परिधान करून पोहोचले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी याबाबतची भूमिका मांडली. 1970च्या दशकात राहुल गांधी यांची आजी म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील तसेच राहुल गांधी यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईत काही साम्य आहे का, असे विचारले असता थरूर म्हणाले की, ही अपात्रता कारवाई आणि तुरुंगवास निषेधार्ह असून यामुळे जनतेची सहानुभूती राहुल गांधींना मिळत आहे. मुख्य विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते आणि संसदेत आवाजही उठवू दिला जात नाही हे लोकशाहीसाठी चांगले नाही, याची जाणीव लोकांना आहे, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

भाजपाला वाटते राहुल गांधींची भीती
राहुल गांधींवर भाजपाकडून सातत्याने टीका होत आहे. त्यावरून भाजपा घाबरली आहे, असे वाटते. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे, असे सांगून शशी थरूर यांनी सांगितले की, लोकसभेच्या पटलावरून हटवलेल्या आपल्या भाषणाद्वारे देशाचे लक्ष वेधून घेतल्याने राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या शांत करण्याचे भाजपाने ठरविले आहे, असे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -