corona vaccine : १२ वर्षांवरील सर्वांसाठी Pfizer ची लस प्रभावी, कंपनीचा दावा

Pfizer tells Centre its covid vaccine suitable for 12 years and above: Report
corona vaccine : १२ वर्षांवरील सर्वांसाठी Pfizer ची लस प्रभावी, कंपनीचा दावा

देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम सर्व स्तरावर राबवली जात आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात भारतात कोवॅक्सिन, कोव्हिशील्डनंतर स्पुटनिक आणि फायझर लस येत्या काही दिवसात नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन फायझर कंपनीने आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारतेची आणि चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. यात जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनीही या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

यात फायझर ही कोरोनाविरोधी लस १२ वर्षावरील सर्व नागरिकांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा फायझर कंपनीने सरकारसमोर केला आहे. या लसीला एका महिन्यासाठी २ ते ८ डिग्री तापमानात ठेवता येऊ शकते. तसेच भारतात आढळणाऱ्या कोरोना विषाणूवर ही लस अधिक प्रभावी ठरत असल्याचे कंपनीने केंद्र सरकारसमोर स्पष्ट केले आहे.

फायझर २०२१ वर्षाअखेरीस पाच कोटी लस देण्यास तयार आहे. परंतु त्यांना भरपाईसह काही नियामक अटींमध्ये मोठी सूट हवी आहे. अशी माहिती समोर आली आहे. लस पुरवठ्याबाबत फक्त भारत सरकारशीच चर्चा केली जाईल आणि लसींच्या किंमतींची माहिती भारत सरकारने फायझर इंडियाला घ्यावी अशी मागणी कंपनीने केली आहे. फायझर कंपनीने लसींच्या विक्रीसाठी अमेरिकेसह ११६ देशांशी करार केला आहे. फायझर कंपनीने आत्तापर्यंत जगभरात १४.७ कोटी डोस वितरित केले आहे.

सध्या भारतात २० कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधी लसींचे डोस दिले आहे. यात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. यात सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीलाही मान्यता दिली आहे, मात्र अद्याप ही लस अद्याप नागरिकांना दिली जात नाही. यात फायझरची लसही भारतीयांसाठी उपलब्ध झाल्यास कोरोना लसीकरण मोहिम पुन्हा वेगाने सुरु होईल.