‘मी दिला गो कोरोनाचा नारा, तेव्हा जागा झाला भारत सारा’, पुन्हा एकदा आठवले

Ramdas Athawale RajyaSabha Speech
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

‘गो कोरोना, कोरोना गो’ असा अजब नारा देऊन प्रसिद्धि झोतात आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा कोरोनावर आपल्या शैलीत कविता केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत बोलत असताना आठवले यांनी कोरोना विषाणूविरोधात मोदी सरकार चांगले काम करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मी सर्वात आधी २० फेब्रुवारीला गो कोरोनाचा नारा दिला होता. त्यानंतर संबंध देश कोरोनाविरोधात उभा राहिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच “आपल्याला कोरोनाचे राजकारण करुन चालणार नाही. या महामारीचा सर्वांनी मिळून सामना करायला हवा. आपल्याला पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा लागेल. प्रत्येक वेळी टीका करुन चालणार नाही.”, असेही आठवले आपल्या भाषणात म्हणाले.

रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर भाषण करत असताना सर्वात आधी एक कविता सादर केली. ती पुढीलप्रमाणे –

मैने दिया था गो कोरोना का नारा,
तब जाग गया था भारत सारा.
मोदीजीने इस कार्यकाल मे किया है बोहोत अच्छा काम
इसलिये वो है चमकने वाला तारा
हस सब पार्टी मिल के बजाते है कोरोना का बारा…

“कोरोनाला हरविण्यासाठी मोदी सरकारने २५ मार्च रोजी लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतरही मोदींनी अनेकवेळा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन लॉकडाऊनचे नियम तयार केले होते. लॉकडाऊन काळात झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारत सारखी योजना आणली. या योजनेतंर्गत २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज दिले. प्रवासी मजुरांना भोजन आणि प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली.”, अशी प्रशंसा आठवले यांनी केली.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोविड योद्ध्यांना शहीदाचा दर्जा द्या

डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलीस यांनी कोविड योद्धे म्हणून कोरोना काळात काम केले. मात्र अनेक कोविड योद्ध्यांचे कोरोनामुळे मृत्यू झालेले आहेत. त्यांना शहीदाचा दर्जा दिला पाहीजे, अशी मागणी आठवले यांनी केली. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आज सर्वाधिक मृत्यूंमध्ये भारत द्वितीय क्रमाकांवर आहे, लवकरच आपण पहिल्या क्रमाकांवर जाऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असेही ते म्हणाले.

रामदास आठवलेंची पुन्हा एकदा कोरोनावर कविता | Ramdas Athawale' Remark on Covid 19 | RajyaSabha

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना महामारीवर राज्यसभेत भाषण केले. गो कोरोना नंतर पुन्हा एकदा आठवलेंनी कोरोनावर एक कविता केली. यावेळी त्यांनी सर्व पक्षांनी मिळून कोरोनाचे बारा वाजवूया, असे आवाहन केले. तसेच जो कोविड योद्धे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना शहीद दर्जा द्या, असेही आठवले म्हणाले.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, September 17, 2020