रालोआत शिवसेना पुन्हा ‘इन’ तर, जदयू दुसऱ्यांदा ‘आऊट’!

पाटणा : भाजपा पक्ष फोडत असल्याचा आरोप करत जनता दल यूनायटेडने भाजपाची साथ सोडली आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून जदयू दुसऱ्यांदा बाहेर पडली आहे. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर रालोआतून एक-एक पक्ष बाहेर पडतच आहे. मात्र, या काळात शिवसेनेने पुन्हा एन्ट्री घेतली आहे.

सन 2014च्या आधी रालोआमध्ये लहान-मोठे 24 पक्ष होते. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदासाठी नाव जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांची जदयू पहिल्यांदा बाहेर पडली. या लोकसभा निवडणुकीत रालोआने भरघोस यश मिळवले. पण त्याचबरोबर रालोतील गळती सुरू झाली. प्रादेशिक पक्षाला संपविले जात असल्याचा आरोप करत कुलदीप बिश्नोई यांचा हरियाणा जनहित काँग्रेस बाहेर पडली. त्यांच्यापाठोपाठ एमडीएमके रालोआतून बाहेर पडले. तमिळ नागरिकांविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर, 2016मध्ये तामिळनाडूच्या डीएमडीके आणि पीएमके हे दोन पक्ष बाहेर पडले. त्यानंतर जन सेना पार्टी, रेवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, जनाधिपत्य राष्ट्रीय सभा यासह इतर छोटे पक्ष बाहेर पडले. पण 2018पासून रालोआला मोठे धक्के बसले. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा, यासाठी तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी महबूबा मुफ्ती यांची पीडीपीने रालोआशी काडीमोड घेतला. 2019च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा सांगितला आणि त्यावरून युती फिस्कटली. परिणामी शिवसेना रालोआतून बाहेर पडली. तसेच राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी देखील रालोआपासून दूर झाली. 2020मध्ये मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणताच शिरोमणी अकाली दल रालोआतून बाहेर पडले.

जदयू, शिवसेनेची पुन्हा एन्ट्री
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करणाऱ्या नितीश कुमार यांनी भाजपाशी फारकत घेतली. परंतु नंतर राजदच्या तेजस्वी यादव यांच्याशी बिनसले आणि जदयू पुन्हा रालोआत सहभागी झाली. पण आता कालच पुन्हा काडीमोड घेत, राजद आणि काँग्रेससमवेत सरकार स्थापन केले आहे. तर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये जून महिन्यात फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने रालोआला साथ दिली. या गटाकडे 40 आमदार व 12 खासदार आहेत.