घरदेश-विदेश...तर तुमचाही नेत्यानाहू होईल, राहुल गांधींना बेघर केल्यानंतर शिवसेनेचा मोदींना इशारा

…तर तुमचाही नेत्यानाहू होईल, राहुल गांधींना बेघर केल्यानंतर शिवसेनेचा मोदींना इशारा

Subscribe

मुंबई – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. खासदारकी गेल्याने राहुल गांधींनी आता त्यांचे शासकीय निवासस्थान सोडावे असे निर्देशही त्यांना देण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इस्रायल देशात जे घडते आहे, त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल! देश त्याच दिशेने निघाला आहे, असं आज सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही व पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही. इस्रायलप्रमाणे येथील जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल . जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करते तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात व मोदींचे मित्र , इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागते . उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील व मोदी त्यांना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील , पण राहुल गांधींना मात्र बेघर करतील , नव्हे केलेच आहे . इस्रायल देशात जे घडते आहे , त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा . नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल ! देश त्याच दिशेने निघाला आहे, अशी आगपाखड या  अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंडित नेहरू व त्याआधी मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य लढय़ातले योगदान अतुलनीय आहे. प्रयागराजमधील (आधीचे अलाहाबाद) नेहरू कुटुंबाची ‘आनंद भवन’ ही भव्य वास्तू स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थानच होते. ही वास्तू नेहरूंनी राष्ट्राला समर्पित केली. या वास्तूचे आजचे मूल्य साधारण दोन हजार कोटी इतके आहे याची नोंद घ्यावीच लागेल. पंडित नेहरूंनी त्यांच्या पुस्तकांतून मिळविलेले लाखो रुपयांचे उत्पन्नही सामाजिक कार्यास बहाल केले. 1965 च्या युद्धानंतर इंदिरा गांधींनी आपले सर्व दागिने सैनिक कल्याण निधीस दान केले. अशा नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही, असा हल्लाबोलही यावेळी करण्यात आला.

गौतम अदानी यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदीं’चा नामोल्लेख करून त्यांच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला त्यांचीही घरे-बंगले शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी व घरही आता काढून घेण्यात आले. देशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -