घरदेश-विदेशनिवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींना दुखापत, पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न

निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींना दुखापत, पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे. त्याच्या पायाला सूज आल्याचे सांगण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. नंदीग्राम येथे त्यांच्या पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचे सांगत त्यांनी या झालेल्या प्रकाराला भाजपाचे षडयंत्र म्हटले आहे. तर ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही भाजपने म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकारानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझ्या पायावर कोणीतरी गाडी चढवली त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली असून पायाला सूज आली आहे. यावरील उपचारासाठी मी कलकत्ता येथे जात आहे. तर चार-पाच लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला हा कटकारस्थानाचा प्रकार असून पक्षाकडून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार बॅनर्जी यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार समोर आली असून, ही घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस नव्हते.

दरम्यान, यंदा ममता बॅनर्जी यांनी त्यांची अनेक वर्षांपासून चालत आलेली भवानीपूर येथील उमेदवारीची जागा सोडत नंदीग्राम येथून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी शुभेंदू अधिकारी हे निवडणूक लढवणार आहेत. शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते थेट बॅनर्जी यांच्याविरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात २७ मार्चपासून मतदानास सुरूवात होणार आहे तर नंदीग्राम येथे १ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या घोषणेनंतर या जागेवर सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -