घरदेश-विदेशशेतकरी मोर्चात हिंसाचार

शेतकरी मोर्चात हिंसाचार

Subscribe

२२ एफआयआर, २ हजार आंदोलकांची धरपकड, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह २६ जणांविरुद्ध गुन्हे

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. हातात तलवार, भाले, खंजीर घेऊन आलेले शेतकरी दिल्ली पोलिसांवर तुटून पडले. या हिंसाचारात ८० हून अधिक पोलीस जखमी झाले. इतकेच नव्हेतर काही शेतकरी थेट लाल किल्ल्यात घुसले. त्यांनी लाल किल्ल्यावर जेथे तिरंगा फडकवला जातो तेथे धार्मिक झेंडा फडकवला. लाल किल्ल्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हिंसाचाराच्या या घटनेनंतर बुधवारी दिल्ली पोलिसांनी २२ एफआयआर दाखल केल्या असून २००० पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आहे. इतकेच नव्हेतर नर्मदा बचाव आंदोलनच्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि ६ शेतकरी नेत्यांसह २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

26 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांकडून हिंसाचार आणि तोडफोडी प्रकरणी 22 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तर 200० पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. आता क्राईम ब्रांचकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस हिंसाचार करणार्‍या आंदोलकांची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर लाल किल्ला आणि सिंधू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने बुधवारी पुन्हा लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. एका अ‍ॅडिशनल डीसीपीवर तलवारीने हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह या सहा शेतकरी नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -

या २६ जणांविरुद्ध गुन्हे
नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग, कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपूर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे.

शेतकर्‍यांमध्ये फूट! दोन संघटनांची आंदोलनातून माघार

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भानू) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणार्‍या दोन्ही संघटना ह्या उत्तर प्रदेशमधील आहेत.

व्ही.एम. सिंग यांनी सांगितले की, हमीभाव मिळाल्यास आम्ही निघून जाऊ. आम्ही येथे लोकांना मारहाण करण्यास आलो नव्हतो. मात्र, लाल किल्ल्याची तिरंग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाचीही होती, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच व्ही. एम. सिंह यांनी काल झालेल्या हिंसाचारावरून राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र व्ही.एम. सिंग हे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात नव्हते, अशीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, व्ही. एम. सिंग यांच्या पाठोपाठ भारतीय किसान युनियन(भानू)चे प्रमुख ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही या आंदोलनातून बाजूला होण्याची घोषणा केली. भानू प्रताप सिंह यांनी काल लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याच्या प्रकाराचा निषेध केला. तसेच भारताची तिन्ही सुरक्षा दले, बीएसएफ या सर्वांबाबत आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले आणि आंदोलनात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपली संघटना या आंदोलनातून बाजूला होत असल्याची घोषणा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -