घरदेश-विदेश14 दिवसांनी भारतात परतणाऱ्या विजयचा तुर्कीतील भूकंपात मृत्यू

14 दिवसांनी भारतात परतणाऱ्या विजयचा तुर्कीतील भूकंपात मृत्यू

Subscribe

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्य झाला आहे. या भूकंपामध्ये एका भारतीय नागरिकाचा सुद्धा दुर्दैवी अंत झाल्याचे भारतीय दूतावासाकडून कळविण्यात आले आहे. विजय कुमार गौड असे मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव आहे.

तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाचा मृतदेह शनिवारी तो राहत असलेल्या हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे. उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि बंगळुरू येथील एका कंपनीत नोकरी करणारे विजय कुमार गौड ऑफिसच्या कामानिमित्त तुर्कीला गेला होता. याचवेळी या देशात झालेल्या भूकंपामध्ये विजय कुमार गौड यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भूकंपातील मृतांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय दूतावासाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. भारतीय दूतावासाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘आम्हाला कळवताना अतिशय दुःख होत आहे की, तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारीच्या भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या विजय कुमार या भारतीय नागरिकाचा मृतदेह मालत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे.’

- Advertisement -

पुढे भारतीय दूतावासाने दुसरे ट्विट करत म्हटले आहे की, ‘त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही त्यांचे पार्थिव लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबाकडे आणण्याची व्यवस्था करत आहोत.’ विजय हा 24 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत राहत होता. सध्या परराष्ट्र मंत्रालय बेंगळुरू येथील विजयच्या कंपनीच्या संपर्कात आहे जिथे तो नोकरीला होता.

- Advertisement -

टॅटूवरून पटली विजयची ओळख
6 फेब्रुवारीला भूकंप झाल्यानंतर विजय बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. शोध पथकाकडून विजयचा शोध घेण्यात येत होता. पण अखेरीस विजय तो राहत असलेल्या हॉटेलच्या मलब्याखाली सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामध्ये विजय मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला. ज्यामुळे त्याचा चेहरा अत्यंत विद्रुप झाला होता. यामुळे त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. पण विजयच्या हातावर असलेल्या ‘ओम’च्या टॅटूमुळे त्याची ओळख पटविण्यात आली आहे.

6 फेब्रुवारीला झाले शेवटचे बोलणे
विजयचा मोठा भाऊ अरुण कुमार गौडने सांगितले की, विजय ऑक्सी प्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचा आणि तो तुर्की येथे बिझनेस टूरवर गेला होता. 6 फेब्रुवारीला सकाळी विजयसोबत फोनवर बोलणे झाले होते. भूकंप झाल्यानंतर इतके दिवस विजयचा फोन वाजत होता, पण कोणीच उत्तर देत नव्हते. अरुणनं पुढे सांगितलं की, विजय 20 फेब्रुवारीला भारतात परतणार होता.

भूकंप झाल्यानंतर विजयसोबत काहीच संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतामध्ये त्याची पत्नी आणि सहा वर्षांचा लहान मुलगा चिंतेत होते. विजयचे कुटुंबीय एखादा चमत्कार घडावा, यासाठी प्रार्थना करत होते. मात्र शेवटी विजयच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. भूकंपामध्ये सुमारे 25 हजारहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

हेही वाचा – आगामी निवडणुकांसाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कामाला लावले, टार्गेटही दिलं; काय आहे रणनीती?

दरम्यान, अद्यापही काही भारतीय नागरिक हे या भूकंपामध्ये अडकल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. तसेच ऑपरेशन दोस्त दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट केले आहे की, ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत 7 वे फ्लाइट सीरिया आणि तुर्कीसाठी रवाना झाले आहे. ट्विटमध्ये जयशंकर यांनी माहिती देताना सांगितले की, या फ्लाइटमध्ये मदत सामग्री तसेच आपत्कालीन औषधे, वैद्यकीय पुरवठा आणि इतर वैद्यकीय उपकरणे पाठविण्यात आलेली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -