नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा होणार देशाचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला होणार निवृत्त

नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यावर सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी क्वात्रा यांची नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, विनय मोहन क्वात्रा हे हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. हर्षवर्धन श्रृंगला या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत.

क्वात्रा हे १९८८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेमधील अधिकारी आहेत. त्यांनी वर्षाच्या ३२ व्या वर्षी बीजिंग सेवेत आणि वॉशिंग्टन येथील भारताच्या राजनैतिक मिशनमध्ये विविध पदांवर कामं केली आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने क्वात्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

क्वात्रा यांची २०२० साली नेपाळमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. कार्मिक मंत्रालयाने क्वात्रा यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. ३० एप्रिल रोजी क्वात्रा परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, १९९३ पर्यंत जिनिव्हा येथील भारताच्या स्थायी मिशनमध्ये तृतीय सचिव आणि नंतर द्वितीय सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सीसह मानवाधिकार आयोगाशी संबंधित देखील त्यांनी कामं केली आहेत. तसेच त्यांनी जिनिव्हा येथील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय संबंधीत डिप्लोमा मिळवला आहे.

भारताचे रशिया, अमेरिका, चीन आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर भारताचे राष्ट्रीय हित समतोल राखण्याची मोठी जबाबदारी क्वात्रा यांच्यावर असणार आहे. रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी वाढवू नये आणि निर्बंध लागू करण्यात मदत करावी यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, ५२ नवीन रुग्ण, तर शून्य मृत्यूची नोंद