घरदेश-विदेशRBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं सूचक वक्तव्य!

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं सूचक वक्तव्य!

Subscribe

माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर शक्तीकांत दास यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली. आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

आधी रघुराम राजन आणि आता उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यामुळे केंद्र सरकारकडून आरबीआयवर टाकल्या जात असलेल्या कथित दबावाची चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता, मूलतत्वे, व्यावसायिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वायत्तता राखण्याचा मी प्रयत्न करेन’, अशा प्रकारची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. तसं पाहाता हे वक्तव्य जरी साधं सरळ वाटत असलं, तरी याआधी आरबीआयच्या स्वायत्ततेवर बंधनं आणली जात होती, या शंकेला कुठेतरी पाठबळ देणारी ही प्रतिक्रिया असल्याचं आता बोललं जात आहे.

नवनियुक्त गव्हर्नरांची बोलकी प्रतिक्रिया

नोटबंदीसारखा मोठा निर्णय रिझर्व्ह बँकेला विश्वासात न घेता घेतला गेला असं बोललं जात होतं. त्यातच सरकार मतांसाठी लोकानुनयी निर्णय रिझर्व्ह बँकेवर लादत असल्याचा देखील दावा केला गेला. त्यामुळे रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तीकांत दास यांची अशी प्रतिक्रिया सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. आरबीआय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच शक्तीकांत दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

‘सगळ्यांना सोबत घेऊन काम करेन’

‘आरबीआयसाठी काम करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असून मी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काम करणार आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच, ‘सगळ्यांना सोबत घेऊन मी काम करणार आहे’, असं देखील त्यांनी सांगितलं. उर्जित पटेल आणि केंद्र सरकार यांच्यामधल्या मतभेदांविषयी विचारलेल्या प्रश्नांना मात्र त्यांनी सोयीस्कर रीत्या बगल दिली. ‘त्याबद्दल मला काहीही माहिती नाही’, असं सांगून त्यांनी उत्तर देणं टाळलं.

‘सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका अडचणीत’

दरम्यान, बँकिंग क्षेत्रावर आता लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘बँका या अर्थव्यवस्थेचा कणा असतात. पण सध्या त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. ती सोडवण्यासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणार असून त्यासाठीच गुरुवारी देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदावरील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत’, असं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -