घरसंपादकीयअग्रलेख‘समृद्ध मृत्यू’रोखायला हवेत

‘समृद्ध मृत्यू’रोखायला हवेत

Subscribe

समृद्धी हायवेवर पुन्हा झालेल्या अपघाताने महामार्गावरील धोक्याचा प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून या मुद्याचे राजकारण करण्यात मूळ अपघाताच्या गंभीर विषयाकडे होणारे दुर्लक्ष येत्या काळात अनेक भीषण अपघातांना आमंत्रण देणारे ठरणार आहे. महाराष्ट्राला समृद्ध करणार्‍या या महामार्गामुळे उद्योग, पायाभूत सुविधा, सर्वांगीण विकासाची स्वप्ने रंगवली जात असताना महामार्गावरील प्रवासाच्या धोक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. महामार्ग उभारताना वेग, वाहतूक, प्रवासाची संभाव्य स्थिती याविषयी योग्य सर्वेक्षण केले गेले होते का, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरज या मुद्याच्या राजकारणापेक्षा जास्त महत्वाची आहे.

सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात काळाची झडप पडली. दर्शन घेऊन नाशिक, निफाडकडे जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. महामार्गावर वाहन उभे करण्यास मनाई असताना, याविषयी होणारा संभाव्य धोका भीषण असताना हा प्रकार मानवी चुकीमुळे घडल्याचे आता स्पष्ट करता येईल, मात्र मानवी चुकांवर नियंत्रण ठेवणार्‍या, देखरेख ठेवणार्‍या सरकारी संस्थांना या अपघाताची जबाबदारी डावलता येणार नाही. केवळ प्रकरणाची अपघाती नोंद सरकारी दप्तरी करून हा विषय संपणारा नाही. हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याची चर्चा अधूनमधून केली जाते. खासदार अमोल कोल्हे यांनी अपघातानंतर जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, त्यामधून त्यांनी या महामार्गावरील प्रवासादरम्यानचा अनुभव सांगितला आहे, तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अपघातानंतर सरकारवर हल्लाबोल केला. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप होणार हे स्पष्ट असतानाच सत्ताधार्‍यांनी या केवळ विरोधकांचे राजकीय आरोप, एवढाच याचा विचार न करता समृद्धी महामार्गावरील अपघाताची खरी कारणे शोधून त्यावर तातडीने ठोस कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

- Advertisement -

विरोधकांनीही केवळ ‘शापित महामार्ग, भ्रष्टाचाराचा महामार्ग’ असे ढोबळ आरोप करण्याऐवजी महामार्गावरील अपघाताची तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ अभ्यासपूर्ण कारणे शोधून सत्ताधार्‍यांना उपाययोजनेत मदत करण्याची खरी गरज आहे. समृद्धी महामार्गावरील मृतांमध्ये बालकांचाही समावेश आहे. अशा वेळी या निष्पाप बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नाचे राजकारण बाजूला ठेवून गांभीर्याने उत्तर शोधायला हवे. एवढ्या वेगाने होणार्‍या वाहतुकीसाठी हा महामार्ग खरोखरच तयार होता का? राजकीय श्रेय लाटण्यासाठी वेळेआधी पुरेसा अभ्यास न करता महामार्ग सुरू करण्यात आला का, ही घाई कोणी आणि का केली? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रातील होणार्‍या विकासाचे श्रेय घेणारे येथील अपघातांची जबाबदारी घेतील का? असाही प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. केवळ राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नाचे गांभीर्य समजून घेण्याची गरज आहे. समृद्धी महामार्ग धोक्याचा का आहे? याबाबत काही निरीक्षणे यातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत. यात समृद्धीवर अधिकृत थांबा नसल्यामुळे वाहने रस्त्यातच, रस्त्याच्या कडेला उभी केली जातात, या महामार्गावर वेगावर पुरेसे नियंत्रण नाही, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नाही.

रखरखीत रस्त्यावर वेगाने जाणार्‍या वाहनांचे टायर्स तापल्याने जादा ताणामुळे फुटण्याचा धोका असतो, महामार्ग साकारताना या भीषण धोक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, असा प्रश्न आहे. महामार्गावर वाहनांनी अचानक पेट घेणे, टायर फुटणे असे भीषण अपघात घडतात. हे अपघात भीषण असतात, कारण वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसते. वेगावर नियंत्रण आणल्यास, वाहतुकीवर शिस्त असल्यास भीषण अपघात टाळले जाऊ शकतात. टायरमधील हवेचे प्रमाण निर्देशित केल्यानुसारच असावे, वाहनाचा वेग आणि टायरमधली हवेचा दाब याचा थेट संबंध असतो. वेग वाढल्यास टायरमधील हवा प्रसरण पावते आणि ताण निर्माण होतो, त्यातून टायर फुटण्याचा धोका वाढतोच. अशा स्थितीत टायर फुटल्यास वाहन वेगात असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे चालकासाठी केवळ अशक्य असते, त्यामुळे महामार्गावरील प्रवासात शक्यतो नायट्रोजन एअर टायरमध्ये भरण्याची गरज असते. टायरचे तापमान वाढणे आणि हवेचे प्रसरण यावर नियंत्रणासाठी अभियांत्रिकी आणि स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रातील याशिवाय रस्ते दुरुस्ती आणि उभारणी करणार्‍या अभियंत्यांनी मिळून अभ्यास करून या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी सरकारने अशा अभ्यास संस्थांसोबत गांभीर्याने कार्यवाही सुरू करावी. शंभर किमी अंतर पार केल्यावर अर्ध्या तासाचा विराम घ्यायलाच हवा, त्यामुळे टायरचे तापमान कमी होईल. टायरची काळजी घ्यावी, साईड व्हॉलची तपासणी करावी, जीर्ण, जुने, कालावधी संपलेले टायर उपयोगात आणू नयेत.

- Advertisement -

उन्हाळ्यातील स्थिती वेगळी असते, उन्हाळ्यात रस्ता तापलेला असतो, सिमेंटचा रस्ता डांबरी रस्त्यापेक्षा जास्त तापल्याने घर्षण वाढून धोका वाढतो. याशिवाय वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी सक्षम वाहतूक यंत्रणा उभारण्याची गरज आहेच. महामार्गावर विशिष्ट अंतरावर वाहनांचा वेग तपासणारी यंत्रणा, वेग वाढवणार्‍या वाहनांवर वेळीच कारवाई करणारी वाहतूक यंत्रणा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारली जाण्याची गरज आहे. महामार्गावर प्रवाशांच्या विरामासाठी योग्य त्या ठिकाणी व्यवस्था करायला हवी. ‘येथे वाहने थांबवणे निशिद्ध आहे’ एवढीच पाटी लिहून हा प्रश्न सुटणारा नाही. आपल्याकडे वाहतूक व्यवस्था आणि वाहन चालवतानाच्या शिस्तीबाबत न बोललेले बरे, वाहतूक विभागातील बजबजपुरी, भ्रष्टाचार हीसुद्धा अशा अपघाताची पडद्यामागील कारणे असल्याचे स्पष्ट आहे. त्यावर उपाययोजनेसाठी मोठा वेळ जाणार आहे. समृद्धी महामार्गावर चालणार्‍या प्रत्यक्ष वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. एवढा मोठा महामार्ग सरकार उभारू शकते, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनेतील उदासीनता आपल्या राजकारण आणि ढिसाळ सरकारी धोरणांचा परिणाम आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणता येतील, मात्र राजकारण बाजूला ठेवून या विषयाचे गांभीर्य समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा हे ‘समृद्ध मरण’ याहीपुढे सुरूच राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -