घरसंपादकीयअग्रलेखछोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात

छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Subscribe

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड महत्त्वाकांक्षेने राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह लहानसहान पक्षांच्या अस्तित्वावर गदा येऊ लागली आहे. काँग्रेसमुक्त भारताचा विडा उचललेल्या भाजपने आता प्रादेशिक पक्षांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना जेरीस आणून त्यांना आपल्या कळपात सामील करण्याचे काम भाजपकडून होताना दिसत असताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावागावीत छोटे पक्ष संपवा, त्यांच्या नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घ्या, असे फर्मान जारी केले आहे.

भाजपच्या या रणनीतीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी कडक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वापरा आणि फेका हे भाजपचे तत्त्व आहे. त्यामुळे मित्रपक्षांचा वापर करून भाजप त्यांना बाजूला सारतो, असा थेट आरोप जानकर यांनी केला आहे. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लहान पक्षांना बरोबर घेऊन ठेचून काढण्याची भाजपची वृत्ती आहे. त्याचा थोडा थोडा अनुभव आम्हालाही येत आहे, अशा शब्दांत कडू यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तीन टर्म पंतप्रधान होण्याचा विक्रम करायचा आहे. त्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधकांना बेजार करण्याची भाजपची रणनीती अद्यापही सुरूच आहे. तिकडे दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब यासह दक्षिणेतील राज्यांमध्येही भाजपने तेथील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रात त्याने कळस गाठला आहे. आधी शिवसेना फोडून ठाकरे परिवाराची सद्दी संपवण्याचे काम केले गेले.

एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतील आमदार, खासदार फोडून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यात आले. इतक्यावरच न थांबता शिवसेना पक्षाची ठाकरे कुटुंबाची मालकी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह गेल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. आमदार, खासदारांसह पक्षच चोरीला गेल्याने आता ठाकरे गटाची मदार जनमतावर आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या बाजूने जाणार यावर ठाकरे गटाचे अस्तित्व अवलंबून आहे.

- Advertisement -

हीच खेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केली गेली. शिवसेना फुटीपूर्वी ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा खासदार, आमदारांच्या मागे लावण्यात आला, तशीच पद्धती राष्ट्रवादी काँग्रेससाठी वापरली गेली. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे असतानाही अभय मिळते, मंत्रीही होता येते याचा शिवसेना नेत्यांना आलेला अनुभव पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना बळ मिळाले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह इतर नेत्यांवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

त्याच नेत्यांना अवघ्या काही दिवसांतच मंत्रिमंडळात सामील करून घेत भाजपने त्यांना अभय दिले. त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीही अजित पवार यांच्या मालकीची झाली. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्याने शरद पवार गटाची कोंडी झाली आहे. काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका आल्या असताना पक्ष आणि चिन्ह हातून गेल्याने ठाकरेंप्रमाणेच शरद पवार गटाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

सत्तेच्या हवासापोटी भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांवर घाला घालत असले तरी त्यांच्यातही आता निष्ठावानांची गळचेपी सुरू झाली आहे. घोटाळेबाजांच्या मांडीला मांडी लावून भाजपचे वरिष्ठ नेते बसू लागल्याने पक्षाची निष्ठा, तत्त्वे यांनाच तिलांजली दिली जात असल्याची भावना सर्वसामान्य भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. चारशेपारच्या नादात निष्ठावानांना डावलून उपर्‍यांना संधी दिली जात असल्याचीही नाराजी भाजपमध्ये आहे, मात्र उघडपणे बोलण्याची हिंमत अद्याप कुणी दाखवली नसली तरी भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या पुत्राने आपल्या भावनांना वाट मोकळी केल्याने भाजपमधील नाराजी हळूहळू बाहेर येईल यात शंकाच नाही.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात होते. त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती, मात्र आयत्या वेळी पक्षात आलेल्या काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्या गळ्यात राज्यसभेची माळ घालण्यात आली. अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदाच्या काळातील आदर्श घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार टोकाची टीका केली होती. त्याच चव्हाणांना राज्यसभेवर पाठवून भाजपने राजकीय तत्त्वांनाही तिलांजली देण्याचे काम केल्याची भावना भाजपमध्ये जोर धरू लागली आहे.

एकीकडे भाजपमध्येच असंतुष्टांमध्ये भर पडत असताना महाविकास आघाडी सरकारला सत्तांतर करण्यासाठी मदत केलेल्या शिंदे गटासह अपक्षांमध्येच नाराजीचा सूर निघू लागला आहे. सरकार स्थापन करतेवेळी दिलेला शब्द भाजपने पाळला नसल्याची खंत त्यांच्यात आहे. त्यांच्यानंतर आलेल्यांना मानाचे पान दिले जात असल्याने नाराजीही आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्याप जागावाटप झाले नसल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे, मात्र दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास नक्की करण्यात आली. याचा मोठा फटका उद्योगमंत्री उदय सामंत यांना बसणार आहे. आपल्या भावासाठी आग्रह धरत असलेले सामंत यामुळे नाराज झाले आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिंदे गटासह त्यांच्यासोबत असलेल्या छोटा पक्षांच्या नेत्यांची राजकीय कोंडी होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -