घरसंपादकीयअग्रलेखगोळीबार...आपलाच आपल्यावर !

गोळीबार…आपलाच आपल्यावर !

Subscribe

 

कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीचा मोठा प्रभाव कायमच महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला आहे. वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांच्यासारखे विदर्भातील काही नेते राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री होते, पण राज्याच्या राजकारणात कोकण हा तसा उपेक्षितच होता. जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर व्हायच्या तेव्हाच देशावरचे नेते प्रचारासाठी आपल्या जीप गाड्या घेऊन कोकणात उतरत असत. त्यानंतर पुन्हा कोकण शांत होत असे, पण जेव्हा शिवसेनेचा राज्यात विस्तार होऊ लागला, तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा प्रतिसाद कोकणातून मिळाला. कारण कोकणात मोठी राजकीय पोकळी होती. त्याचा फायदा शिवसेनेला झाला. त्याचसोबत कोकणातील मोठ्या संख्येने तरुणवर्ग हा मुंबईत नोकरीसाठी येतच होता. त्यांच्या नोकरीचा प्रश्न होता. त्यात पुन्हा हा तरुण हा फार उच्च शिक्षित नव्हता. त्यामुळे त्यांना नोकर्‍या मिळणार कुठे हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांची कोंडी झालेली होती.

- Advertisement -

अशाच भूमिपुत्र तरुण-तरुणींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक मराठी तरुणांना नोकर्‍या मिळाल्या. त्यामुळे त्यांना कोकणातील आपल्या गावी दर महिना मनिऑर्डर पाठवणे शक्य झाले. इतकेच नव्हे तर जे शिवसेना या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी झाले, ते पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले. त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थितीही सुधारली. आता अनेकांची मुले नातवंडे ही महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. एकेकाळी संघटनेसाठी जीवाची बाजी लावून लढणारे शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आता चांगल्यापैकी श्रीमंत झाले आहेत. जशी शिवसेना पुढे येऊ लागली, तसे कोकणातून काही प्रभावी नेते पुढे आले. कोकणाची राजकीयदृष्ठ्या राज्याच्या राजकारणात दखल घेणे भाग पडू लागले. तसा राजकीयदृष्ठ्या शांत असलेला कोकण शिवसेनेच्या माध्यमातून जागा होऊ लागला.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आलेल्या नेत्यांची आजची परिस्थिती पाहिली तर कोण होतास तू काय झालास तू, अशी म्हणायची वेळ आली आहे. ही परिस्थिती फक्त कोकणातीलच नाही, तर शिवसेनेचा ज्या मुंबई आणि ठाणे, नवी मुंबईत प्रसार झाला तिथेही काही वेगळे नाही. सुरुवातीला मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलेले हे नेते जसे स्वत:च्या महत्त्वाकांक्षेने भारावून गेले तसे त्यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याचा मार्ग स्वीकारला. त्यातूनच मग शिवसेनेतून फुटून दुसर्‍या पक्षात जाणे किंवा स्वत:ची वेगळी संघटना स्थापन करण्याचे प्रकार होऊ लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झालेली ही मंडळी हळूहळू पक्षातून बाहेर पडू लागल्यावर पक्षाचा प्रभाव कमी होऊ लागला.

खरे तर ही सगळी मंडळी शिवसेना या पक्षात राहिली असती तर पक्षाचा विस्तार झाला असता आणि कदाचित शिवसेना स्वबळावर राज्यात सत्तेत येऊ शकली असती. देशात काही असे पक्ष आहेत की, ज्यांची स्थापना शिवसेनेच्या नंतर झाली आणि ते राज्यात सत्तेवर आले. त्याचे खास उदाहरण म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या आहेत. अशी आणखीही नेते मंडळी आहेत. हे शिवसेनेला का जमू शकले नाही. खरे तर शिवसेनेला मराठी अस्मितेचा आणि भूमिपुत्रांच्या कटिबद्धतेचा आधार होता, पण नेते मंडळी फुटून बाहेर पडल्यामुळे पक्षाची संघटना विस्कळीत झाली. आजवर अनेकदा नेते शिवसेनेला सोडून गेले, पण राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर तो एक मोठा धक्का होता, पण त्यातूनही पक्ष सावरला. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्रीपद मिळवले, तेव्हा मात्र परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. कारण ही महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना पटत असली तरी त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना ही झालेली कोंडी जास्तच जाणवत होती.

- Advertisement -

त्यातूनच पुढे त्यांनी भाजपच्या मदतीने शिवसेनेत बंड करून संघटनेवर आपला दावा केला. त्यातून पुढे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खेडमधील गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदार, नगरसेवकांवर सडकून टीका केली. आपल्या हातात काही नाही, असे त्यांनी सांगून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आता त्याच गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या आहेत. मुद्दा असा आहे की, मैदान तेच आहे, तसेच गोळीबार करणारी माणसेही मूळची शिवसेनेची आहेत. त्यात त्यांचेच नुकसान होत आहे. जे मंडळी काल एकमेकांच्या ताटात जेवत होती, तेच आज एकमेकांच्या ताटात विष कालवण्याइतके शत्रू का बनले, याचा या सगळ्यांनीच विचार करायला हवा. भाजप असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, हे राजकीयदृष्ठ्या कसलेले पक्ष आहेत, ते शिवसेनेचा वापर करत आहेत. त्यासाठी शिवसेनेचे तुकडे केले जात आहेत, पण आपण आपल्याच लोकांवर गोळीबार करत आहोत, हे मूळ शिवसेनेतील असलेल्या नेत्यांच्या लक्षात येत नाही, यापेक्षा आणखी दुसरे दुर्दैव ते कुठले?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -