घरसंपादकीयअग्रलेखविचारांचे सोने..की वैचारिक दिवाळे ..?

विचारांचे सोने..की वैचारिक दिवाळे ..?

Subscribe

भारत देशामध्ये विजयादशमी अर्थात दसरा या दिवसाला आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ठ्या अनन्य साधारण असे महत्व आहे. वाईट दुष्प्रवृत्तीचा सद्प्रवृत्तीने विनाश करण्याचा हा दिवस आहे. असत्यावर सत्याने मात करण्याचा हा दिवस आहे. मनातील वाईट गुणांवर सद्गुणांनी मात करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. अर्थात रावणाचे दहन हा आणखीन एक वादाचा विषय आहे. मात्र आपण तूर्त तरी रावणातील दुष्प्रवृत्तीचे दहन असा त्याचा अर्थ घेऊन पुढे जाऊ. एकूणच हिंदू धर्मात विजयादशमीला आगळे वेगळे असे महत्व आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. वरुणराजाच्या कृपेनंतर बळीराजा या काळात सुखावलेला असतो, कारण त्याने शेतात पेरलेले बीज हे प्रचंड प्रमाणावर फोफावलेले असते. निसर्गामध्ये ही क्षमताच अफाट आहे की तुम्ही जर एक दाणा पेराल तर तुम्हाला अगणित दाणे निसर्ग बहाल करत असतो.

त्यामुळे विजयादशमीला देशातील बळीराजा हा खर्‍या अर्थाने सुखावलेला असतो. ग्रामीण जीवनात यामुळेच विजयादशमीचे महत्व अधिक आहे. देशाचे आणि महाराष्ट्राचे शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहेत गावखेड्यांची रूपांतरे शहरांमध्ये होत आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजारपेठादेखील वाढीस लागल्या आहेत. बाजारपेठ म्हटली की व्यापार उद्योग हा आलाच. विजयादशमीच्या निमित्ताने सर्वसामान्य जनता विविध वस्तूंची खरेदी करत असते त्यामुळे शहरांमधील बाजारपेठा या निमित्ताने गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात. गेली दोन वर्ष भारतीय जनतेची आणि महाराष्ट्राचीदेखील कोरोना आणि त्यानंतरची भयानक टाळेबंदी यामुळे खर्‍या अर्थाने विजनवासात गेलेली आहेत आणि त्यामुळे यावर्षी जल्लोषात साजरा झालेला गणपती उत्सव असो नवरात्र उत्सव असो की विजयादशमी, लोकांचा उत्साह हा वाढला आहे.

- Advertisement -

अर्थात ही झाली भारतीय सणांची आध्यात्मिक आणि व्यावहारिक बाजू होय. मात्र भारतातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांचे राजकारण हे धर्मावरच अधिक अवलंबून ठेवल्याने सर्वच सण हे प्रामुख्याने आता राजकारण्यांचे प्रमुख अड्डे झाले आहेत. विजयादशमीचे सर्वसामान्य जनतेमध्ये असलेले महत्त्व लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी यावर जर लक्ष केंद्रित केले नसते तरच नवल होते. त्यामुळे याच सणांचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अगदी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आणि आता तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यापासून शिवसेनेतून उठाव करून मुख्यमंत्रीपदावर पोहोचलेले एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सार्‍या जणांचे राजकीय दसरा मेळावे प्रचंड मोठ्या जल्लोषात आता साजरे होऊ लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरे तर हा स्वतःच्या गटाचा असा पहिलाच ऐतिहासिक मेळावा म्हणावा लागेल. अर्थात ठाण्यासारख्या शहरातून उभे राहिलेले एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहे हेदेखील राजकीयदृष्ठ्या कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबरीने तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासमोर एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा ऐतिहासिक समांतर दसरा मेळावा घ्यावा हे धाडसदेखील बरेच काही बोलून जाणारे आहे. शिंदे यांच्या राजकारणाचे समर्थनदेखील कोणी करत नाही, मात्र एकनाथ शिंदे यांनी जे शिवधनुष्य उचलले आहे ते उचलण्यासाठीही ५६ इंचाची छाती लागते, याचीही दखल घ्यावी लागते.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वलय आणि आशीर्वाद नक्कीच आहेत, त्यामुळे जे बाळासाहेबांचे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कोणत्याही प्रलोभनाला कधी बळी पडणारे नाहीत, त्यामुळे त्यांचे पाठबळ हे सदैव यापुढेदेखील उद्धव ठाकरे यांना मिळत राहील याबाबत शंका बाळगण्याचे कारणच नाही. त्यामुळे बीकेसीवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मोठा की शिवाजी पार्कवरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा मोठा, या मोठेपणाच्या भांडणात अथवा वादात न जाता या दोन्ही नेत्यांनी दोन्ही शिवसेनेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरू ठेवली आहे, एवढे जरी लक्षात घेतले तरी खूप झाले असंच म्हणावं लागेल.

अर्थात उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आणि एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व यापेक्षादेखील देशात २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक आणि जहाल हिंदुत्वाचा डंका अधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपकडे खर्‍या हिंदुत्वाचे पेटंट आहे हे उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली. मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्या या चढाओढीमध्ये भाजप हा या दोघांच्याही बराच पुढे निघून जात आहे याकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे सोने लुटण्याची जी ऐतिहासिक परंपरा मुंबईत शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून सुरू केली तीच खर्‍या अर्थाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली पाहिजे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा हा दरवर्षीच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असतो. खर्‍या अर्थाने संघाच्या दसरा मेळाव्यात चांगल्या विचारांची उधळण होत असते.

आता याच बरोबरीने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील मराठवाड्यात बीडमधील सावरगाव येथे भगवानगडावर दसरा मेळावा सुरू केला आहे. पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजप मधल्या आक्रमक महिला नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षशाली स्वभावाप्रमाणे त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यादेखील अखंड अविरत संघर्ष करणार्‍या आहेत. मात्र भाजपात २०१४ पासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रस्थापित केलेले आहे आणि त्यामुळे भाजपमधील ज्या नेत्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जमले नाही अथवा ज्या भाजपा नेत्यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतली नाही त्यांना एकतर भाजपमधून बाहेर पडावे लागले अथवा ते भाजपमध्ये साईड ट्रॅकला अर्थात बाजूला फेकले गेले आहेत. त्यामुळेच आजच्या विजयादशमीच्या विविध दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना सुबुद्धी सुचत राहो आणि राज्यातील गोरगरीब जनतेची अधिकाधिक सेवा राजकारणाच्या माध्यमातून घडत राहो अशाच सदिच्छा त्यांना आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने देता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -