घरसंपादकीयअग्रलेखगोंधळात गोंधळ!

गोंधळात गोंधळ!

Subscribe

महायुतीमधील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात संघर्षाला सुरुवात झाली असून आपापल्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर नाराजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीमधील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. असे असले तरी दोन्ही मतदारसंघांत महायुतीकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे, पण उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातून भाजप आणि शिंदे गटात संघर्षाला सुरुवात झाली असून आपापल्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर नाराजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा असतानाच भाजपनेही मैदानात उडी घेतली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच ठाणे लोकसभा मतदारसंघातील आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघावरून भाजप व शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू असून शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठा या मतदारसंघावरून पणाला लागली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या की भाजपच्या वाट्याला येणार हेच अजून निश्चित नाही. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

- Advertisement -

फाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात. आमदार प्रताप सरनाईकदेखील शिंदे यांचे जवळचे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवसेनेत फूट पडण्याआधी आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. तेव्हा सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भाजपमध्ये सरनाईक यांच्याबद्दल सहानुभूती आहे. शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच अचानक माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे.

मध्यंतरी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे नाव ठाणे लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. डॉ. सहस्त्रबुद्धे सक्रियसुद्धा झाले होते. भाजपने त्यांच्यावर दुसरी जबाबदारी सोपवल्याने सहस्त्रबुद्धे यांचे नाव आता मागे पडले आहे. आता संजीव नाईक मैदानात उतरले आहेत. वरिष्ठांकडून आपली उमेदवारी निश्चित असून चिन्ह कमळ की धनुष्यबाण असेल आपणास माहीत नाही. आपली तीव्र इच्छा ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची आहे.

- Advertisement -

पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत, असा दावा संजीव नाईक यांनी केल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. शिवसेनेत असताना नवी मुंबईचे गणेश नाईक आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे यांच्यात ठाणे जिल्ह्याच्या नेतृत्वावरून नेहमीच स्पर्धा होत होती. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यावर शिंदेंचा मार्ग मोकळा झाला होता. आता गणेश नाईक मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये आल्याने शिंदे यांना जिल्ह्यात तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झाला असतानाच लोकसभा निवडणुकीत नाईकांच्या दावेदारीने शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.

पालघरची स्थितीही फार वेगळी नाही. राजेंद्र गावित विद्यमान खासदार असल्याने शिंदे गटाने पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. भाजपने या मतदारसंघात पारंपरिक मतदार असल्याने आपला दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आपल्याच पक्षाला जागा मिळावी असा आग्रह आहे.

मजेशीर बाब म्हणजे राजेंद्र गावित यांची दोन्ही गटांकडून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाकडून सध्यातरी एकमेव राजेंद्र गावित यांच्याच नावाची चर्चा आहे, तर भाजपकडून दोन-तीन इच्छुक असले तरी त्यांना फारसा जनाधार नसल्याने त्यांची नावे मागे पडली आहेत.

भाजपचे स्थानिक पदाधिकारी राजेंद्र गावित यांच्या नावाला विरोध करताना दिसत आहेत. राजेंद्र गावित यांचे पारंपरिक मतदार असल्याने महायुतीचे नेते त्यांच्या नावाला विरोध करताना दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचा मेळावा घेतला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपले उमेदवार आहेत असे समजून कामाला लागा, असे सांगत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची समजूत त्यांनी काढली असली तरी नेमकी जागा कुणाची आणि उमेदवार कोण हे तेही सांगू शकले नाहीत. परिणामी महायुतीत हा तिढा कायम राहिला आहे.

महाविकास आघाडीने पालघर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून महायुतीपुढे आव्हान उभे केले आहे. आघाडीने उमेदवार जाहीर केला नसला तरी ठाकूर ठरवतील तोच उमेदवार असणार आहे. आघाडीचा वसई-विरार बालेकिल्ला असून त्या ठिकाणची मते निर्णायक मानली जातात. याच भागात आघाडीने जोर मारला आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीतील गोंधळ सुटता सुटेनासा झाला आहे. कोणताही तोडगा निघाला नसतानाही महायुतीकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे. चिन्ह कोणतेही असले तरी आपणच उमेदवार असल्याचा ठाम विश्वास असलेल्या राजेंद्र गावित यांनी उमेदवारी जाहीर झाली नसतानाही प्रचार सुरूच ठेवला आहे. महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. मतदारांकडून उमेदवार कोण आणि चिन्ह कुठले, हा विचारला जाणारा प्रश्न त्यांना अडचणीत टाकू लागला आहे. त्यातूनच पदाधिकारी-कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -