घरसंपादकीयअग्रलेखनाराजीच्या नाना कळा!

नाराजीच्या नाना कळा!

Subscribe

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. २१ जागा वाट्याला आल्याने या जागावाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा भाऊ ठरला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या वाट्याला अनुक्रमे १७ आणि १० जागा आल्या आहेत. मुंबईतील ६ पैकी ४ जागा ठाकरे गटाला गेल्या असून २ जागांवर काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेचदेखील थांबल्याचे म्हटले जात होते, परंतु तसे झालेले सध्यातरी दिसत नाही.

या जागावाटपात प्रामुख्याने सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई अशा तीन जागा प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. या तिन्ही जागा काँग्रेसच्या हातून खेचण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार गट) यश आल्यामुळे ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते सध्या हर्षवायूचा अनुभव घेत आहेत, मात्र या हर्षवायूला नाराजी, अविश्वास, असहकार्य आणि बंडखोरीची बाधा झाल्याने ठाकरे गट तसेच शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांचा श्वास कधीही गुदमरु शकतो, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे नेते जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत हजर असले, तरी त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.

- Advertisement -

जागावाटपाची यादी वाचण्यासदेखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नकार दिला. ती संजय राऊत यांना वाचावी लागली. आमच्यात सारं कसं आलबेल आहे, जागावाटप सकारात्मक पद्धतीने, एकमताने झालंय आणि कुणीही नाराज नाही, असे संजय राउतांनी पत्रकारांना न विचारताच सांगितले. त्यावरूनच हा बोलाचा भात नि बोलाचीच कढी असल्याचे स्पष्ट झाले होते. आता सांगलीच्या जागेवर दावा सांगत असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे बंडखोरीच्या मोडमध्ये गेल्याने ही केवळ ठाकरे गटासाठीच नाही, तर महाविकास आघाडीसाठीही धोक्याची घंटा म्हटली जात आहे.

सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा या काँग्रेसच्या परंपरागत जागा असल्याचा दावा काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. सांगलीत १९५७ पासून २००९ पर्यंत काँग्रेस उमेदवाराचाच वरचष्मा होता. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शालिनी पाटील, प्रकाश बापू पाटील असे अनेक खमके नेते सांगलीने महाराष्ट्राला दिले. प्रकाशबापूंच्या निधनानंतर वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांनी २००६ सालच्या पोटनिवडणुकीत हा गड शेवटचा राखला होता. त्यानंतर २०१४ पासून गेली १० वर्षे हा मतदारसंघ भाजपचे संजय काका पाटील यांच्या ताब्यात आहे.

- Advertisement -

वसंतदादांच्या काळात असलेला काँग्रेसचा दबदबा आता राहिलेला नाही. तरी सलग दोन निवडणुका पराभूत होऊनही काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकत आहे. जागावाटपाच्या तडजोडीत कोल्हापूरमध्ये सेनेचा विद्यमान खासदार आणि संघटनेचे बळ असूनही ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. छत्रपती शाहू महाराज या जागेवर उमेदवार म्हणून उभे असल्याने ठाकरे गटाने कुठलीही खळखळ न करता ही जागा सोडली. रामटेकमध्येही सेनेचा दोन टर्म खासदार असतानादेखील ही जागा काँग्रेसने परस्पर घेतली. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा हवी म्हणून काँग्रेसला अद्दल घडवायची म्हणून ठाकरे गटाने सांगलीची जागा बळकावली आहे.

बळकावली अशासाठी म्हणता येईल की सांगलीत ठाकरे गटाचे कुठलेही संघटन नाही, काँग्रेसच्या तुलनेत तर काहीच नाही. त्यातही कुस्तीपटू चंद्रहार पाटीलसारखा उमेदवारही आयात केलेला. मग ही जागा ठाकरे गट कशाच्या जोरावर जिंकणार, हा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला अजूनही खमका उमेदवार शोधता आलेला नाही. उत्तर मुंबईत तर भाजपचे पीयूष गोयल यांचा विजय पक्का समजला जात असल्याने इथून कुणीही लढायला तयार नाही. काँग्रेसकडून या जागेवर उमेदवार ठरत नसल्याने ठाकरे गटाने विनोद घोसाळकरांना इथे तयारी करायला सांगितले होते, परंतु ही जागा काँग्रेस लढत असल्याने घोसाळकरांनी तलवार म्यान केली आहे.

उत्तर मध्य मुंबईची जागा लढण्यास प्रिया दत्त यांनी स्पष्ट नकार दिला आहे. या मतदारसंघात यंदा भाजपकडून पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांची या मतदारसंघावर चांगलीच पकड आहे. त्यामुळे प्रिया दत्त हे आव्हान स्वीकारायला तयार नसल्याचे समजते. तीच गत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची आहे. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराकडून सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊनही वर्षा गायकवाड यांना हीच जागा लढायची आहे.

स्थानिक नेत्यांच्या बैठकीला वर्षा गायकवाड यांनी दांडी मारली. नाराजी दाखवायचीच असेल, तर ती ठाकरे गटाच्या नेत्यांनाही दाखवता येते, असे म्हणत संजय राऊत यांनी कळीच्या मुद्यावर बोट ठेवले आहे. जागावाटपात महायुतीविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे मविआच्या नेत्यांनी ठरवले होते, मात्र जागावाटपानंतर एकमेकांच्या उमेदवारांना बळ देण्याऐवजी हे नेते नाराजीच्या नाना कळा दाखवून, असहकार्य आणि बंडखोरी करून एकमेकांचीच कन्नी कापू लागले, तर मतदानाआधीच अब की बार मविआ हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -