घरसंपादकीयअग्रलेखमहाराष्ट्रातील प्री वेडिंग समारंभ!

महाराष्ट्रातील प्री वेडिंग समारंभ!

Subscribe

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग समारंभ गुजरातमधील जामनगर येथे शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात झाला. या समारंभासाठी केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून नामवंत सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते. त्यांना त्यांची मुहबोली किंमत देण्यात आली होती. काही लोक तर केवळ अंबानी यांच्यासारख्या देशातील अग्रगण्य उद्योगपतीच्या मुलाच्या प्री वेडिंग समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळते, म्हणून आलेले होते. कारण अंबानींकडून आपल्याला केवळ निमंत्रण मिळणे हीदेखील खूप मोठी गोष्ट आहे, याची त्यांना कल्पना होती.

अंबानी यांनी जामनगरमध्ये रिफायनरीच्या माध्यमातून आपले मोठे औद्योगिक साम्राज्य उभे केले असले तरी त्यांच्या वडिलांच्या औद्योगिक जीवनाची सुरुवात ही महाराष्ट्रातून झालेली आहे. उद्योगपतीला कुठलाही राजकीय पक्ष वर्ज्य नसतो आणि कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला कुठलाही उद्योगपती वर्ज्य नसतो. त्यामुळे अंबानी यांच्या मुलाला त्यांच्यावर टीका करणारे राजकीय नेतेही गेले होते. अंबानी यांच्या मुलाचे प्री वेडिंग जोरदार म्हणजे जागतिक प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. कारण त्यांनी अनेक जागतिक कीर्तिच्या सेलिब्रिटींना खरेदी केले होते. या माध्यमातून त्यांनी एक उद्योगपती म्हणून स्वत:ची आणि भारताची ताकद जगभरात दाखवूून दिली. अशी माहिती आहे की, प्री वेडिंग समारंभासाठी आलेल्या एका विदेशी सेलिब्रिटी नतर्कीने काही दिवसांपूर्वी भारत हा गरीब देश आहे, असे म्हटले होेते. तिला अंबानी यांनी मागेल ती किंमत देऊन आपल्या मुलाच्या विवाहपूर्व समारंभासाठी यायला भाग पाडले आणि भारताची श्रीमंती दाखवून दिली.

- Advertisement -

एका बाजूला जामनगरमध्ये अंबानी यांच्या पुत्राच्या प्री वेडिंग समारंभाने जगाचे लक्ष वेधून घेतलेले असताना भारतात होणार्‍या लोकसभा निवडणुकीकडेही जगाचे लक्ष लागलेले आहे. कारण नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली जर देशात पुन्हा भाजपची सत्ता आली तर ती त्यांची हॅट्ट्रिक असेल, पण यावेळी मोदींना केवळ हॅट्ट्रिक नको, तर अब की बार चारसौ पार करायचे आहेत. त्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरात लोकसभेची आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणारी विधानसभेची निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे. लोकसभेत भाजपला ४०० पार करायचे आहेत. पण तरीही मोदींनी एनडीएचे लक्ष्य ४०० पार असे म्हटले आहे. कारण एनडीएमध्ये असलेल्या आपल्या मित्र पक्षांचा कल आपल्या विरोधात जाऊन त्याचा फायदा आपल्या विरोधात असलेल्या इंडिया आघाडीला मिळू नये, असा त्यामागे विचार असावा. कारण केवळ भाजप असे म्हटले तर मित्र पक्ष नाराज होऊ शकतात.

जे इंडिया आघाडीत दिसून आले. कारण या आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने एकट्याने निवडणुका लढवण्याचा निर्णय काही राज्यांमध्ये घेतला. इतकेच नव्हे तर मित्र पक्षांना जास्त जागा दिल्या नाहीत, त्यामुळे त्यांची नाराजी ओढवून ममता बॅनर्जी यांनी आपली वेगळी भूमिका घेतली. आम आदमी पार्टी वेगळी झाली. त्यामुळे इंडिया आघाडीतील हवा निघून गेली. त्यात पुन्हा या आघाडीचे निमंत्रक असलेले नितीश कुमार त्यातून बाहेर पडले आणि भाजपच्या पंक्तीला जाऊन बसले. नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे नाव घेतले असले तरी यांना भाजपनेच ४०० पार करावे असे वाटत असणार यात शंका नाही, कारण एका पक्षाच्या बहुमताची काय ताकद असते, याचा अनुभव यांनी मागील दोन टर्ममध्ये घेतला आहे.

- Advertisement -

इंडिया आघाडीचे घोडे जागावाटपावरून अडलेले असताना तिकडे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 34 मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांची नावेदेखील जाहीर केली आहेत. त्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीवर विरोधकांवर आघाडी घेतली आहे. पण या यादीमध्ये महाराष्ट्रातील कुठल्याच उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. नितीन गडकरी यांच्यासारख्या वजनदार मंत्र्याचे नावही या यादीत नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे जागावाटप हा किती गुंतागुंतीचा मामला आहे याचा अंदाज यावरून येऊ शकतो. कारण महाराष्ट्रात भाजपची सत्ता असली तरी ती एकट्याची नाही, त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोघे भागीदार आहेत.

त्यांनी भाजपसोबत महायुती केलेली असली तरी त्यांचे पक्ष स्वतंत्र आहेत. त्यामुळे लोकसभेचे तिकीट वाटप करताना त्यांचा योग्यतो विचार करावा लागणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होईल. कारण भाजपने महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन ठाकरे यांना शह दिला. त्याचसोबत सरकार स्थिर असताना लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना सोबत घेतले. पण आता या नव्या सहकार्‍यांना तिकिटे द्यावी लागणार आहेत, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नाराजी परवडणारी नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे लग्न मानले तर त्या अगोदर होणार्‍या प्री वेडिंग समारंभाला कोण कसे रंग भरतो, त्यावर पुढील वेडिंग म्हणजेच लग्न कसे होणार हे अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -