घरसंपादकीयअग्रलेखससूनच्या चौकशीचा फार्स

ससूनच्या चौकशीचा फार्स

Subscribe

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात पोलीस तर दोषी आहेतच, पण ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थेने आजवर ललितवर जे भरभरून प्रेम दाखवले, ते अक्षम्य असेच आहे. हे गौडबंगाल जेव्हा चव्हाट्यावर आले, तेव्हा व्यवस्थेने भानावर आल्यासारखे वागायला सुरुवात केलेली दिसते. या प्रकरणात आता वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर अशाप्रकारच्या चौकशी समिती गठित करणे ही बाब नवीन नाही. यापूर्वी असंख्य प्रकरणांत अशा समित्या गठित करण्यात आल्या आहेत, परंतु या समित्यांनी नेमके काय निरीक्षण नोंदवले, कोणावर दोषारोप सिद्ध केले, हे गुलदस्त्यातच राहिले.

डॉ. म्हैसकर समितीचेही असेच काही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळकाढूपणासाठी चौकशी समितीचा हादेखील फार्स आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुळात कुठल्याही कैद्याला किती काळ रुग्णालयात ठेवावे यावर काही धरबंधन असायला हवे. ललित पाटील ९ महिन्यांपासून नव्हे, तर तब्बल १८ महिन्यांपासून ससून हॉस्पिटलचा पाहुणचार खात होता, हे सरकारी वकील अ‍ॅड. शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हापासूनच त्याची राजरोसपणे बाहेर ये-जा सुरू होती. महत्वाचे म्हणजे ललितला असा कोणता गंभीर आजार झाला होता की तो तब्बल १८ महिन्यांपासून ससूनला दाखल होता, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्याला १० डिसेंबर २०२० ला पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याच्या वैद्यकीय अहवालात तो तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते, परंतु पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याच्या आजारांच्या यादीत अचानक वाढ होत गेली. प्रथमत: त्याने जिन्यावरून खाली पडल्याचे नाटक केले. त्यासाठी त्याने पूर्वतयारी केली होती.

- Advertisement -

तोंडाला फेस येण्यासाठी विशिष्ट प्रकारची गोळी त्याने तोंडात ठेवली होती. ही गोळी चघळल्याने त्याच्या तोंडाला फेस आला. हेच कारण दाखवून त्याला प्रथमत: औंद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्थात ही वकिलांनी सांगितलेली मनघडत कहाणी नाही, तर ज्या नोंदी चार्जशिटमध्ये म्हणजे दोषारोपपत्रात आहेत, त्याच पुढे आल्या आहेत. ललितला वेगवेगळ्या कारणास्तव ससून रुग्णालयात दाखल ठेवण्यात आले. यासंदर्भात खेड येथील विशेष सत्र न्यायालयात वेळोवेळी अर्ज दिले. न्यायालयानेही त्या-त्या वेळी कठोर भूमिका घेतली, परंतु ससून रुग्णालयाच्या व्यवस्थेने या आदेशांची पायमल्ली केली. म्हणजेच ससूनची व्यवस्था ललितच्या ‘माये’ने इतकी मस्तवाल झाली होती की, त्यांना न्यायालयाच्या आदेशांचीही तमा उरली नाही. अशा प्रकरणांत रुग्णालयांची जबाबदारीही निश्चित होणे गरजेचे आहे.

व्यक्ती कोमात गेला तरच तो १८ महिने रुग्णालयात राहू शकतो, हे मान्य आहे, मात्र ललितच्या बाबतीत अनुभव वेगळा आहे. जो ललित पाटील अटक केली तेव्हा तंदुरुस्त होता; त्याला काही दिवसांतच विविध आजारांचे प्रमाणपत्र मिळायला लागले. क्षयरोग, लठ्ठपणा, पाठदुखी, मानदुखी, हर्निया यांसारखे आजार यात दाखवण्यात आले. एका प्रमाणपत्रावर तर क्षयरोग आणि लठ्ठपणा दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात क्षयरोग झाल्यावर मनुष्याचे वजन वाढत नाही, तर कमी होते, असे शास्त्र सांगते, परंतु ललितचे सार्वत्रिक ‘वजन’ हे वाढत होते. क्षयरोग आणि कोलेस्ट्रॉल असल्याचा दावा करूनही त्याला रुग्णालयात पाहुणचार देण्यात आला. वास्तविक, कोलेस्ट्रॉल वाढणे हे रुग्णालयात दाखल होण्याचे कारण होऊ शकत नाही. तरीही त्याला दाखल करण्यात आले. कर्करोगासारख्या दुर्धर आजार असलेल्या कैद्यांना काही दिवसांत तुरुंगात पाठविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ललितला कशाच्या आधारे ससूनने इतक्या दीर्घ काळ दाखल करून घेतले याचा छडा लागणे आता क्रमप्राप्त आहे. ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक १६ या कैदी वॉर्डमध्ये ललितप्रमाणे अन्य प्रकरणातील व्हीआयपी आरोपीदेखील पाहुणचार घेत होते. यातील एका आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातील कैद्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी थेट राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळींकडून ससून प्रशासनावर दबाव आणला जात होता. एवढेच नाही तर डिस्चार्ज कार्डवर सही करणार्‍या डॉक्टरला घरचा रस्ता दाखवण्याची धमकी दिली गेली. अशाचप्रकारे ललित प्रकरणातही एका आमदाराने ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर दबाव आणल्याचा आरोप होत आहे. सुषमा अंधारेंनी तर मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधत भुसेंचाच संबंध ललितशी होता, असा गंभीर आरोप केला आहे.

तसेच ललितला पळवून नेण्यात शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. आमदार धंगेकरांचाही रोख भुसेंकडेच दिसतो. त्यामुळे भविष्यात भुसेंवर हे प्रकरण अधिक जड जाणार हे स्पष्ट आहे. केवळ भुसेच नव्हे, तर राज्यातील असंख्य आमदार, खासदार अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्क ठेवण्यात ‘धन्यता’ मानतात. त्याचाच फायदा उचलत या मंडळींच्या नावाने ललितसारखे गुंड दहशत पसरवतात. मग अशा दहशतीला ससून रुग्णालयासारखी व्यवस्था बळी पडते. अर्थात त्यामुळे ससून व्यवस्थापन निर्दोष ठरू शकत नाही. या व्यवस्थापनातील मुख्य दोषींना कारवाईचे इंजेक्शन दिल्याशिवाय राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेची भूल उतरणार नाही हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -