घरसंपादकीयअग्रलेखदसरा मेळाव्याचा वाद फुकाचा!

दसरा मेळाव्याचा वाद फुकाचा!

Subscribe

‘तुमच्यात हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिकेसह विधानसभा निवडणुका घ्या’ असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांना दिले. त्यावर एकनाथ शिंदेंकडून तातडीने प्रत्युत्तर आले.

‘तुमच्यात हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिकेसह विधानसभा निवडणुका घ्या’ असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांना दिले. त्यावर एकनाथ शिंदेंकडून तातडीने प्रत्युत्तर आले. गेल्या दोन महिन्यांपासून उभा महाराष्ट्र शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा हा वाद-प्रतिवाद बघत आहे, परंतु त्यातून जनतेचे मतपरिवर्तन होत आहे, असा जर कुणाचा समज होत असेल तर तो व्यर्थ समजावा. कारण ज्यावेळी शिवसेनेत फाटाफूट झाली त्याचवेळी जनतेचे एक मत तयार झालेले आहे. हे मत बदलले जाणे आता अवघड आहे. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही उर बडवून गद्दारीचा समाचार घेतला तरी तो जनतेच्या जिव्हारी लागेल याची शाश्वती देता येत नाही.

तसेच एकनाथ शिंदे यांनी कितीही बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम व्यक्त केले तरी जनता ते स्वीकारेल याचा भरवसा नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने ठाकरे-शिंदे हा वाद म्हणजे करमणुकीचे साधन बनला आहे. फिल्मी पद्धतीने एकमेकांना आव्हाने दिली जात असल्यामुळे त्याकडे लोकांचे लक्ष जात आहे. परंतु म्हणून महाराष्ट्रातील जनता या वादाला गांभीर्याने घेत आहे असे मुळीच नाही. या वादाचा पुढचा एपिसोड सुरू झाला तो दसरा मेळावा कोण घेणार यावरुन. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ या आधारावर बीकेसीतील मैदानाची परवानगी शिंदे गटाला एमएमआरडीएने दिलीे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीचा अर्ज २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी दाखल केला होता. त्यामुळे ‘फर्स्ट कम फर्स्ट’ या आधारावर शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण आता मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने सावध भूमिका घेत दोन्ही गटांना शिवाजी पार्कपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

- Advertisement -

कारण तिथे दोन्ही गट आल्यास संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर दादर प्रभादेवी भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली होती, त्यावेळी हवेत गोळीबार झाल्याचा आरोप झाला होता. या अगोदर बुलढाण्यात या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी चुन चुन के मारेंगे, अशा धमक्या एकमेकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर शिवजी पार्कवर दोन्ही गटाचे लोक एकत्र आले तर बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी फडणवीस-शिंदे सरकारवर येईल, त्यामुळे त्यांनाही सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

शिवसेना मागील ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेत आली आहे. त्यामुळे या वर्षीही दसरा मेळावा कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवर होईल, असे सांगून नेस्को मैदानावर झालेल्या रंगीत तालमीच्या भाषणात पालिका प्रशासन आणि फडणवीस-शिंदे सरकारला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेने पालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकूणच दसरा मेळाव्यावरुन आता रान पेटले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना यानिमित्ताने एकमेकांवर चिखलफेक करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. वास्तविक, एका मैदानावर एकाच वेळी हे मेळावे होणे शक्य नाही. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी हे मेळावे घेता आले असते. वा दुसर्‍या मैदानावर दसर्‍याच्याच दिवशी कुणा एकाला हा मेळावा घेता आला असता.

- Advertisement -

यात विशेषत: शिंदे गटाने आपला बालहट्ट मागे घेत समजुतीची भूमिका घेणे क्रमप्राप्त होते. उद्धव ठाकरे किंवा यापूर्वीच्या सर्वच तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भूमिका बघता मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या-त्यांच्या कार्यकाळात ते तोंडावर बोट ठेऊन होते. मुख्यमंत्रीपदाला शोभेसे विवेचन करणारी भाषणे त्यांची असायची. परंतु शिंदेंच्या बाबतीत मात्र दररोज विरोधकांना शिंगावर घेण्याचा प्रकार सुरू आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांचे नेस्को मैदानावर झालेले संपूर्ण भाषण ऐकता त्यात नवीन काही होते असेही नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ठाकरेंच्या भाषणाला प्रत्त्युत्तर देण्याची गरजच नाही. परंतु त्याचे भान न ठेवता मुख्यमंत्री आपल्या पदाचा विचार न करता वाद-प्रतिवादात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेमुळे ते भाजपच्या हातचे खेळणे होेऊन बसले आहेत की काय असे वाटल्या वाचून राहत नाही.

वास्तविक, महाराष्ट्राच्या जनतेपुढे असंख्य प्रश्न असे आहेत. ज्यामुळे लोक मेटाकुटीस आले आहेत. सप्टेंबरचा पंधरवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी पाऊस थांबायला तयार नाही. त्याचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. त्याच्या सर्वच कष्टांवर पाणी फिरले आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी तुंबून पीक कुजून जात आहे. या संकटग्रस्त भागांची पाहणी करुन नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या हातापर्यंत पोहचवण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. आज नुकसानभरपाई देण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांपर्यंत रक्कम पोहचवण्यात कालापव्यय होत आहे. त्यातून बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शहरांसह गावा-खेड्यांच्या रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन मार्गक्रमण करणे चारचाकीधारकांसह दुचाकीधारक आणि पादचार्‍यांना जिकिरीचे ठरत आहे. खाचखळग्यांतून मार्गक्रमण करताना मणकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अतिरक्तदाब यांसारखे आजार वाढत आहेत. खड्ड्यांचा त्रास केवळ शारीरिक नाही तर मनोसामाजिक घडामोडींवरही त्याचा परिणाम होत आहे. खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना चिडचिडेपणा वाढत आहे. परिणामी कार्यालयांतील वाद वाढले आहेत. इतके दूरगामी परिणाम खड्ड्यांमुळे होत असताना राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्था पाऊस थांबण्याची वाट पाहत हातावर हात धरुन बसल्या आहेत. महागाईच्या राक्षसानेही दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करायला सुरुवात केली आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच बाबींची होणारी भाववाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी अशीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही वारंवार लांबवण्यात येत असल्याने विकासकामांना खोडा बसत आहे. याशिवाय बेरोजगारी, वेगवेगळ्या आजारांचे थैमान, आत्महत्या, वाढती गुन्हेगारी या समस्याही नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करायची सोडून शिंदेसरकारसह ठाकरे गट दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी भांडत आहे. यावरुन या राजकारण्यांची बांधिलकी नेमकी कशाशी आहे हे स्पष्ट होते. ज्या शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मराठी माणसांच्या दोन गटांमध्ये जी गळेकापू चढाओढ सुरू आहे, ती पाहून तिथे पुतळ्याच्या रुपात अश्वारुढ छत्रपती शिवरायांना काय वाटत असेल, याचा या दोन गटांच्या प्रमुखांनी विचार करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -