घरसंपादकीयअग्रलेखजिवंतपणीच श्रद्धांजलीचे ‘सोहळे’

जिवंतपणीच श्रद्धांजलीचे ‘सोहळे’

Subscribe

आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो झाला सोहळा अनुपम्य॥

या तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती आज समाजमाध्यमांमध्ये रोजच येतेय. अर्थात तुकाराम महाराजांनी त्यांच्या मरणाच्या सोहळ्याकडे अतिशय सकारात्मकतेने बघितले होते. सध्याची परिस्थिती मात्र तशी नाही. जिवंत माणसांना समाजमाध्यमांवर मारण्याची जणू स्पर्धाच सुरू असते. ही स्पर्धा एवढी शिगेला पोहोचलीय की त्यातून महान अभिनेतेही सुटू शकले नाहीत. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बाब त्यांचेच आप्तस्वकीय पत्रकार परिषद घेऊन सांगत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियाच्या भिंती त्यांच्या श्रद्धांजलीने भरून गेल्या. बहुसंख्य प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू जाहीर करण्याची घाई सोशल यूजर्सना झालेली असते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही यातून सुटू शकले नव्हते. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करताच श्रद्धांजली वाहणारे संदेश सामाजिक माध्यमांवर सुरू झाले होते. इतकेच नाही तर काही प्रकरणांमध्ये ज्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती, त्यांनीच ट्विट करत आपण जिवंत आहोत, असे सांगितल्याची काही जिवंत उदाहरणे आहेत. ‘देवाला रिटायर करा’ असे म्हणणारे नटश्रेष्ठ श्रीराम लागू यांना आयुष्यातून रिटायर करण्यासाठी काहींनी कंबर कसली होती. त्यातूनच ते जिवंत असताना त्यांच्या मृत्यूच्या बातम्या समाजमाध्यमांवर वारंवार पेरल्या जात होत्या.

- Advertisement -

या असंवेदनशीलतेचा फटका गानकोकीळा लता मंगेशकर यांनाही बसला होता. दोन वर्षांपासून त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार रुग्णालयात दाखल होत होत्या. त्यामुळे एकीकडे प्रत्येक जण सोशल मीडियावर लतादीदींच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असताना दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती. अखेर लता मंगेशकर यांच्या टीमकडून निवेदन देण्यात आले की, त्यांच्या तब्येतीत आधीपेक्षा सुधारणा होत आहे. अमिताभ बच्चन यांना तर शिंक आली तरी काही विघ्नसंतोषी मंडळी समाजमाध्यमांवर त्यांना श्रद्धांजली वाहून मोकळे होतात. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मुमताज यांनीही जिवंतपणी आपल्या मृत्यूचा ‘सोहळा’ अनुभवला आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या मृत्यूच्या अफवेने जोर धरला होता. अखेर खुद्द मुमताज यांनीच या अफवांना पूर्णविराम दिला. ‘माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा ते गुपित नसेल’, असे त्यांना सांगावे लागले. अटलबिहारी वाजपेयी मरणासन्न अवस्थेत होते आणि सलग काही दिवस त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या. लोक बिनदिक्कतपणे त्यावर व्यक्त होत होते. श्रद्धांजलीची लडी लावत होते.

गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांचे पेव फुटले होते. त्यांना हाडांचा कॅन्सर झाल्याच्या अनेक पोस्ट फेसबुक, ट्विटरवर व्हायरल झाल्या होत्या. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक व्हिडीओ कॉन्फरन्समधला फोटोही व्हायरल केला जात होता, ज्यात शहा यांची प्रकृती ढासळल्याचे दिसत होते. अखेर या अफवांचे खंडन अमित शहा यांनाच करावे लागले. अनेकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना पण केल्या, असे शहांना म्हणावे लागले. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराचा अँकरिंगदरम्यान मृत्यू झाल्याचा व्हिडीओ गेल्या वर्षी वार्‍याच्या वेगाने फिरला. प्रत्यक्षात या पत्रकाराला अँकरिंगदरम्यान भोवळ आली होती आणि उपचाराअंती ती बरीदेखील झाली, पण पुढची माहिती न घेता केवळ अर्धवट माहितीच्या आधारे हजारो लोक तिला श्रद्धांजली अर्पण करून मोकळे झाले होते. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्याही मृत्यूची अफवा पसरली होती. ट्विटरवर तर चक्क ट्रेंडदेखील चालवण्यात आला होता. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री फरिदा जलाल, अभिनेते कादर खान यांच्याबाबतही वेळोवेळी मृत्यूच्या खोट्या बातम्या येत राहिल्या.

- Advertisement -

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. खरेतर यामुळे असंख्य भारतीय सुखावले होते, पण दुर्दैवाने ती अफवा ठरली. दाऊदच्या मृत्यूच्या अफवेवेळीच प्रसिद्ध रेसलर अंडरटेकरही मृत झाल्याच्या अफवा पसरत होत्या. याशिवाय हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनचे निधन झाल्याच्या अफवेने जगभरात खळबळ माजवली होती. पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याचा हिंसाचारात मृत्यू, तर पाकिस्तानचाच वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानचे अपघातात निधन झाल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी इरफानने स्वत: ट्विट करून आपण जिवंत असल्याचे सांगितले. रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाल्याची अफवा अगोदरच पसरली होती. ‘लंकेश जिवंत आहे’ असे ट्विट करून त्रिवेदी यांनी या अफवेला पूर्णविराम दिला.

समाजमाध्यमांवरील अफवांचे बळी केवळ प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वच ठरले असे नाही, तर सर्वसामान्यांनाही हा मनस्ताप सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील डॉ. आयशाचा फोटो ट्रेंडिंग झाला होता. त्यात तिचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात ती कोरोनाशी लढा देत बरीदेखील झाली. कोणतीही शहनिशा न करता मेसेज फॉरवर्ड करण्याची सवय दहिसरमधील एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला कमालीची तापदायक ठरली. जिवंत असूनही त्याच्याच मृत्यूचे शोकसंदेश त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. नाशिकमध्येही व्यसनमुक्तीसंदर्भात काम करणार्‍या एका डॉक्टरांना समाजमाध्यमांवर श्रद्धांजली वाहण्यात येत होती. त्याचा मोठा फटका त्यांच्या आर्थिक व्यवहारांनाही बसला. समाजमाध्यमांच्या विश्वात पोस्ट, लाइक्सची चढाओढ असते. त्या नादात चुकीची माहिती शेअर होण्यासारखे प्रकार नवीन राहिलेले नाहीत.

पण त्यातून कुणाच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असतील तर अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग तो काय? अशा बातम्या जेव्हा संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांसमोर जात असतील तेव्हा त्यांच्या मनावर किती मोठा आघात होत असेल याचा विचार कधी होणार आहे का? खरेतर मृत्यू हे एक शाश्वत आणि अटळ सत्य आहे. समाजातील हरएक माणूस कधी ना कधी या अंतिम ठिकाणावर पोहोचणारच असतो, पण म्हणून माणूस जिवंत असताना त्याला समाजमाध्यमांच्या भिंतींवर मारून टाकावे? हे माणसातील संवेदना बोथट झाल्याचेच लक्षण मानावे. संवेदना जाग्या राहणे हीच आजच्या काळाची गरज आहे. आज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना आपल्याला अशा अफवा टाळ्ण्यासाठी काय करावे लागेल यावर विचार व्हायला हवा. कारण अशा तर्‍हेचे भयानक वास्तव मानवता संपवणारे आहे. कुठल्याही बाबीची खातरजमा करायला पाहिजे. जागरूक नागरिकच अशा घटनांना आळा घालू शकतात, अन्यथा जिवंत माणसांच्या मृत्यूचे ‘सोहळे’ समाजमाध्यमांवर वर्षानुवर्षे सुरूच राहतील!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -