घरसंपादकीयदिन विशेषप्रख्यात कवी मिर्झा गालिब

प्रख्यात कवी मिर्झा गालिब

Subscribe

मिर्झा गालिब यांचा आज स्मृतिदिन. ते प्रख्यात उर्दू कवी होते. त्यांचे संपूर्ण नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग खान हे लष्करात अधिकारी होते. गालिब पाच वर्षांचे असतानाच ते एका लढाईत मारले गेले. त्यानंतर त्यांचा सांभाळ आग्र्यास त्यांच्या आजोबांनी केला. त्यांचे अरबी व फार्सीचे शिक्षण झाले. ते मुळातच बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न होते.१८२८ च्या सुमारास ते वर्षासनाच्या खटल्यानिमित्त कोलकात्यास गेले.

या खटल्याचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेला आणि ते दिल्लीस परतले. या खटल्यात त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरून त्यांना फार मनस्ताप झाला व कर्जही बरेच झाले. तथापि त्यांनी वर्षासनासाठी आपले प्रयत्न मोठ्या चिकाटीने चालूच ठेवले. त्यांचे बहुतांश आयुष्य दिल्लीतच व्यतीत झाले. मिळणारे तुटपुंजे वर्षासन तसेच अयोध्येच्या नबाबाकडून आणि दिल्ली दरबारातून त्यांना जे काही थोडेफार वेतन मिळे, त्यावरच अतिशय तंगीत ते आपला निर्वाह करत.

- Advertisement -

वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षांपासूनच ते कविता रचू लागले आणि पंचवीसाव्या वर्षांपर्यंत त्यांनी उर्दूत काव्यरचना केली. वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून ते त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत मात्र त्यांनी उर्दूऐवजी फार्सीत रचना केली. त्यांचे फार्सीवर विशेष प्रेम होते. आपली उत्कृष्ट रचना उर्दूऐवजी फार्सीतच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तथापि, त्यांची विशेष ख्याती मात्र उर्दू काव्यामुळेच झाली. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिब यांनी परंपरेला नावीन्याची झालर लावली. त्याच्या समग्र फार्सी कवितांचा कुल्लियात-इ-गालिब (१८४५) हा संग्रह प्रसिद्ध असून त्यात कसीदा, गझल, मस्नवी इत्यादी प्रकारांतील रचनांचा समावेश आहे. अशा या महान कवीचे १५ फेब्रुवारी १८६९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -