घरसंपादकीयदिन विशेषथोर समाजसेवक सार्वजनिक काका

थोर समाजसेवक सार्वजनिक काका

Subscribe

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे महाराष्ट्रातील १९व्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले. नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले (१८४८) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (१८६५) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली.

ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस सार्वजनिक काका होते. सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गार्‍हाणी व अडचणी सरकार दरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.

- Advertisement -

सार्वजनिक काकांनी १८७२ मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कितीतरी वर्षे अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. १२ जानेवारी १८७२ रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर व त्याचा जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होते.

त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वत: आर्थिक झीज सोसली. जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्यांनी १८७१ मध्ये पुण्यात ‘स्त्री विचारवती’ या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. अशा या महान सामाजिक कार्यकर्त्याचे २५ जुलै १८८० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -