कर्तृत्ववान उद्योगपती जमशेदजी टाटा

जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपची स्थापना केली. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी गुजरातमधील नवसारी येथे एका झाला. वयाच्या तेराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईत आले. १८५६-५८ या काळात त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेतले. १८५८ मध्ये ते एल्फिन्स्टनमधून ‘ग्रीन स्कॉलर’ (पदवीप्राप्त) म्हणून उत्तीर्ण झाले. १८५९ मध्ये जमशेटजी आपल्या वडिलांच्या व्यवसायात शिरले. याच सुमारास हाँगकाँगच्या ‘जमशेटजी ड अर्देशिर’ शाखेच्या व्यवहारात लक्ष घालण्यासाठी त्यांना हाँगकाँगला पाठविण्यात आले.

तेथूनच पुढे ते शांघायला गेले व तेथे त्यांनी दुसरी शाखा उघडली. १८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळे निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन तिचे कापडगिरणीत रूपांतर केले. तिचे ‘अलेक्झांड्रा मिल’ असे नामकरण करून त्यांनी आपल्या औद्योगिक कारकीर्दीस प्रारंभ केला.

जमशेटजींनी आपल्या कापडगिरण्यांचे व्यवस्थापन म्हणजे वित्तपुरवठा, यंत्रसामुग्री, देखभाल आणि कामगार कल्याण इत्यादी कार्यक्षम राखले होते. व्यवहारी दृष्टीबरोबरच कल्पकता, उपक्रमशीलता, समयोचितता, धाडसीपणा आणि निकोप व्यापारी दृष्टी ह्या गुणांमुळेच जमशेटजींना अपार यश लाभले. रूढ धंद्यांपेक्षा नवेनवे औद्योगिक क्षेत्र शोधण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीच्या शोधाकरिता व विकासाकरिता प्रचंड श्रम घेण्यात आणि वैज्ञानिक अन्वेषणाची प्रेरणा देण्यात जमशेटजी टाटा हे अग्रभागी होते. अशा या कर्तृत्ववान उद्योगपतीचे १९ मे १९०४ रोजी निधन झाले.