घरसंपादकीयदिन विशेषसुप्रसिद्ध कवी सुरेश भट

सुप्रसिद्ध कवी सुरेश भट

Subscribe

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना ते अडीच वर्षांचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

शालेय जीवनात त्यांना संगिताची गोडी आईने लावली. त्या स्वत: हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. सुरेश भट यांचे वडील श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच.एम.व्ही.चा एक ग्रामोफोन आणला होताच. मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत.

- Advertisement -

सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत. सुरेश भट यांचा एक पाय दुर्बल झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासंतास मैफली करू शकत. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. अशा या महान गझल सम्राटाचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -