घरसंपादकीयअग्रलेखमहागाई, बेरोजगारीचा जुमला!

महागाई, बेरोजगारीचा जुमला!

Subscribe

‘अब की बार चारसौ पार’ची आकांक्षा बाळगून आम्हीच पुन्हा येणार, असा पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करणार्‍या भाजपने लोकसभा निवडणुकीचा आपला जाहीरनामा लोकांसमोर आणला. भाजपच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी एक औपचारिकता आहे, कारण मोदी हैं तो मुमकिन हैं, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर करावयाच्या कामाची सूची त्यांनी जारी केली आहे. म्हणजे आमचे जे सरकार चालू आहे, ते अखंडपणे चालणार आहे. आता आहेत तसेच नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहणार आहेत, असे भाजपला वाटत आहे. पण कुठल्याही राजकीय पक्षाने जनतेला इतके गृहीत धरायचे नसते. कारण जनता कसा निर्णय घेईल याचा अंदाज कुणालाच येत नाही.

दरवेळी मतदारांचा कल मोजणार्‍या चाचण्या खर्‍या ठरतीलच असे नाही. कारण बरेचदा काही अनपेक्षित घटना घडतात, त्यामुळे दिशा बदलते. विजयी पंतप्रधान मोदींना याचा अनुभव आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजपची बहुमताची सत्ता आणल्यानंतर महाराष्ट्रात चांगला दबदबा निर्माण केल्यावर आपल्याला दिल्लीची विधानसभा सहज जिंकता येईल, असे वाटत असताना कुठलाही आसभास नसताना अरविंद केजरीवाल हे डार्क हॉर्स ठरले आणि त्यांनी दिल्लीत बाजी मारली. अर्थात, आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ते तिहारच्या तुरुंगात आहेत ही बाब वेगळी. यावेळी भाजप नेत्यांचा असा दावा आहे की, विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे कुणी एक नेताच नाही, तर आमच्याकडे नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व आहे.

- Advertisement -

आज जशी भाजपची स्थिती आहे, तशीच स्थिती एकेकाळी काँग्रेसची होती. आज भाजपचे नेते मोदींच्या भरवशावर आम्ही जगातील कुठलीही गोष्ट जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त करत आहेत. तसेच त्यावेळी ‘इंदिरा इज इंडिया’ असा ठाम विश्वास असल्यामुळे इंदिरा गांधी यांच्या भरवशावर आम्ही कुठलीही निवडणूक जिंकू शकतो, असे काँग्रेसवाल्यांना वाटत असे. पण पुढे काळ बदलत गेला. आज काँग्रेसची अवस्था काय झालेली आहे ते सर्वांना दिसत आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जितक्या जागा जिंकाव्या लागतात, तितक्याही जिंकता आल्या नाहीत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा योग साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाजपच्या मुख्यालयात लोकसभा निवडणूक जाहीरनामा ‘संकल्पपत्र’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी दहा प्रमुख मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी गरिबांसाठी 3 कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस या प्रमुख घोषणा आहेत. ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येईल. जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येतील. उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी या घोषणा केल्या असल्या तरी मागील दहा वर्षांमध्ये त्यांना खरोखरच अच्छे दिन आणता आले आहेत का, याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण काँग्रेसच्या काळात सुरू असलेल्या काही जनहिताच्या योजनांची नावे बदलण्यात आली. मुद्दा केवळ योजना जाहीर करून आम्ही इतकी कामे केली याची आकडेवारी देऊन चालत नाही, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती झाली, लोकांना त्याचा उपयोग किती झाला हे महत्त्वाचे आहे. कारण नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी आम्ही भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू, स्वीस बँकांमध्ये भारतीय लोकांनी ठेवलेला काळा पैसा आम्ही परत आणू आणि त्याचा सामान्य माणसांच्या भल्यासाठी वापर करू असे सांगितले होते, तो पैसा भारतात आणणे त्यांना शक्य झाले नाही.

- Advertisement -

स्मार्ट सिटीची घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आली होती. चीन आणि जपान यांच्या प्रमुखांना भारतात आणून त्यांच्या शहरांप्रमाणे आपल्या देशातील काही शहरे विकसित करण्याचे करार करण्यात आले होते. २०२२ पर्यंत देशातील सगळ्या लोकांना हक्काचे घर मिळेल, असे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. गावागावात गॅस सिलिंडरची सबसिडी खरोखर किती लोकांना मिळते, कारण गॅस परवडत नाही, त्यामुळे अनेकांनी पुन्हा चुली फुंकायला सुरुवात केली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या या संकल्पपत्राची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे जुमला पत्र आहे, अशी खिल्ली उडवली आहे. भाजपने महागाई, बेरोजगारी या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही.

लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांची भाजपला चर्चा करायची नाही. याउलट आमची योजना अतिशय स्पष्ट आहे. सरकार आल्यानंतर 30 लाख नोकरभरती करायची आणि प्रत्येक शिक्षित तरुणाला कायमची नोकरी द्यायची आहे. राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी याविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, पण मोदींच्या अगोदर त्यांचे दहा वर्षे सरकार होते, तेव्हा काय केले. त्यापूर्वी त्यांची आजी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा लोकप्रिय नारा दिला होता त्याचे काय झाले. त्यामुळे भाजप असो नाही, तर काँग्रेस असो घोषणांची जुमलेबाजी कुणीही करू नये, लोकांच्या हितासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करावेत. कारण कुणीही कितीही वल्गना केल्या तरी त्यांचे हात आकाशाला टेकत नाहीत, हे लोकांना माहीत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -