घरसंपादकीयओपेडग्रामीण भागात भाजपचा डंका आणि आघाडीला दणका...!

ग्रामीण भागात भाजपचा डंका आणि आघाडीला दणका…!

Subscribe

महाराष्ट्रातील एकूण 2359 ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले. त्यातील प्रत्यक्षात 2208 ग्रामपंचायतींचे निकाल पाहिल्यास त्यामध्ये भाजप हा अव्वल स्थानावर म्हणजेच 655 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखून प्रथम क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी ज्या काही विविध योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आहे, त्याचा लाभ गावखेड्यांपर्यंत पोहोचत आहे असेच यातून दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची सरशी होत आहे, तर महाविकास आघाडीला दणका बसला आहे.

-सुनील जावडेकर

साधारणपणे गेल्या दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे भाजपने महाविकास आघाडीचे सरकार उलथवले आणि शिवसेनेतीलच मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून महाविकास आघाडीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या आजच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी ग्रामीण मतदारांची भाजपला असलेली सहानुभूती ही पूर्वीच्या तुलनेत कमी झालेली असली तरीदेखील आजच्या घडीला राज्यातील ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष हाच नंबर एकचा पक्ष आहे, हे ग्रामीण मतदारांनी त्यांच्या जनमताच्या कौलातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा आगामी निवडणुकांमधील प्रमुख सामना हा भारतीय जनता पक्षाशीच होणार आहे हेदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचा डंका कायम आहे तर भाजप वगळता अन्य सर्वच पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. या निवडणूक निकालाचा एक प्रमुख आणि ठळक मुद्दा लक्षात घ्यायचा झाला तर तो हा आहे की महाराष्ट्रात भाजप हा आगामी काळातदेखील क्रमांक एकवर राहू शकणारा पक्ष आहे आणि दुभंगलेली शिवसेना आणि दुभंगलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्ष अशा जर या पाच पक्षांचे संख्याबळ लक्षात घेतले तर या पाचही पक्षांची धडपड ही भाजपानंतर क्रमांक दोनच्या स्थानासाठी आहे आणि ती आगामी काळातदेखील तशीच राहणार आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
सोमवारी महाराष्ट्रातील एकूण 2359 ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले. त्यातील प्रत्यक्षात 2208 ग्रामपंचायत निकाल पाहिल्यास त्यामध्ये भाजप हा अव्वल स्थानावर म्हणजेच 655 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखून प्रथम क्रमांकावर आहे. शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यापासून फारकत घेऊन भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला दुसर्‍या क्रमांकाची अर्थात 392 ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली आहे. काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्ष हा महाराष्ट्रात आणि देशात सत्ताधारी भाजपाविरोधात एवढा अँटी
इन्कमबन्सी फॅक्टर असूनदेखील 271 ग्रामपंचायतींवर सत्ता प्राप्त करू शकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 289 ग्रामपंचायतींवर सत्तेत आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 145 ग्रामपंचायती तर यामध्ये अत्यंत दयनीय स्थिती ही राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची झाली असून त्यांना सर्व राजकीय पक्षांमध्ये सर्वात कमी म्हणजे 110 ग्रामपंचायतींवर सत्ता राखता आली आहे आणि त्यातही उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पाचही मातब्बर राजकीय पक्षांपेक्षा अपक्षांनी ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली असून तब्बल 346 ग्रामपंचायती या आजमितीला अपक्षांच्या ताब्यात गेल्या आहेत. अपक्ष हे 346 जागांवर विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या एका विशिष्ट राजकीय वातावरणात झाल्या त्यासाठी विचार केला तर महाराष्ट्रात जागोजागी मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आंदोलन हे सरकार विरोधात पेटलेले होते. अर्थात मराठा आंदोलनाची धग ही जशी राज्यातील भाजप आणि शिंदे यांच्या विरोधात होती तशीच ती विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधातदेखील होती. त्यामुळेच मराठा आंदोलनाचा जो लाभ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रचार करून काँग्रेस, शरद पवार अथवा उद्धव ठाकरे या तीन मातब्बर नेत्यांना घेण्याची संधी होती ती संधी या तीनही राजकीय पक्षांनी आजच्या भाजपला मिळालेल्या अव्वल यशामुळे धुळीस मिळाली आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगे नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या जर प्रमुख तीन नेत्यांच्या प्रतिमेचा विचार करायचा झाल्यास भाजपला मिळालेल्या यशामध्ये नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी ज्या काही विविध योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचे लाभ हे आता थेट गावखेड्यातील शेतकर्‍यापर्यंत, आदिवासींपर्यंत तसेचअन्य दुर्लक्षित उपेक्षित समाज घटकांपर्यंत मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज भाजपला मिळालेले यश हे केंद्र सरकारच्या या गोरगरिबांच्या कल्याणाकरिता राबवल्या जाणार्‍या योजनांचे यश आहे हेदेखील येथे लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कितीही टीकेचा भडिमार केला तरीही देवेंद्र फडणवीस हे जराही विचलित होत नाहीत. पूर्वीप्रमाणे ते अतिआक्रमकता हे आता दाखवत नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही विषयाकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती जर लक्षात घेतली तर महाराष्ट्रातील आजच्या घडीला अत्यंत परिपक्व नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यावे लागेल.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आधारस्तंभ आणि चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शरद पवार यांच्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याला त्यांचे सख्खे पुतणे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 392 ग्रामपंचायती जिंकत जो काही 420चा धक्का दिला आहे तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बरंच काही बोलून जाणार आहे. मुळात राष्ट्रवादीची जर जडणघडण लक्षात घेतली तर राष्ट्रवादी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 110 ग्रामपंचायती मिळाल्या म्हणून त्यांच्यावर सर्वात कमी जागा मिळाल्याची जी टीका होते ती योग्य असेलही, मात्र त्याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की शिवसेनेची ताकद ही शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे, मग ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडाळीनंतर जरी लक्षात घेतली तरी महापालिका, नगर परिषदांमध्ये प्रामुख्याने जो सामना होणार आहे तो उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातच प्रामुख्याने होणार आहे. त्यामुळे तेथेदेखील उद्धव ठाकरे यांचे काही प्रमाणात वर्चस्व हे राहणारच आहे ते जर लक्षात घेतले तर ग्रामीण महाराष्ट्र हा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या राष्ट्रवादीची स्थिती ही चिंताजनक आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अर्थात ही राष्ट्रवादी ही शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 392 ग्रामपंचायती जिंकत ग्रामीण महाराष्ट्रात आता शरद पवार यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शब्द अंतिम चालतो हे या निकालातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत स्पर्धेमध्ये जो मोठा परिणाम जाणवणार आहे अथवा त्याचे ते पडसाद उमटणार आहेत ते जर लक्षात घेतले तर आगामी काळात अजित पवार यांची बाजू ही शरद पवार यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट क्षमतेने अधिक असेल आणि हा धोका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी असणार आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या प्रकारे काँग्रेसने महाराष्ट्रात 727पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचे सांगितले त्याकडे जर बारकाईने पाहिले तर नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आता अधिक बारकाईने अभ्यास करणे आणि काँग्रेस ही ग्रामीण महाराष्ट्राबरोबरच शहरी अथवा मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये अधिकाधिक मजबूत कशी होईल या दृष्टीने कार्य करणे हे अधिक गरजेचे आहे. विविध वृत्तवाहिन्यांमध्ये महाविकास आघाडीला ज्या 526 जागा दाखवल्या आहेत त्या जर लक्षात घेतल्या तर एकट्या भाजपच्या जागा या महाविकास आघाडीच्या म्हणजे तीनही प्रमुख पक्षांच्या जागांपेक्षा तब्बल 100 हून अधिक आहेत ही जर तफावत लक्षात घेतली तर आगामी काळ हा महाविकास आघाडीसाठी सत्त्वपरीक्षेचा काळ असणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या काँग्रेससाठी अथवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी अथवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी फारशा आशादायक स्थितीत नसणार याची काळजी घेऊन जर त्यांनी आतापासूनच त्यांच्या निवडणूक तंत्रामध्ये, प्रचार यंत्रणेमध्ये बदल केला नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे प्रतिबिंब उमटले तर त्याचे कोणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हा निकाल अजित पवार यांच्यासाठी राजकारणामध्ये त्यांची स्थिती अधिक बूस्ट करणारा, तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना धोक्याचा अलार्म वाजवणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -