घरसंपादकीयओपेडकोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न सत्यात कधी येणार?

कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न सत्यात कधी येणार?

Subscribe

कोकणामध्ये प्रचंड नैसर्गिक साधनसामुग्रीची उपलब्धता आहे. विस्तीर्ण सागर किनारा आहे. गोव्यालाही मागे सारतील असे अत्यंत आकर्षक बीच कोकणात विकसित करता येऊ शकतात, एवढी क्षमता कोकणामध्ये आहे. कोकण रेल्वेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे मुंबईसारख्या आर्थिक राजधानीशी तसेच गोवा आणि दक्षिण राज्यांशी रेल्वे वाहतुकीने जोडले गेले आहेत. आता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच चिपी विमानतळदेखील सुरू झाले आहे. आता मुद्दा असा आहे की, कोकणातील राजकीय नेते मंडळी आणि तेथील लोक या विमानातून विकासाचे उड्डाण केव्हा घेणार, कारण कोकणचा कॅलिफोर्निया करण्याला निसर्ग साथ देत आहे, पण कोकणी लोकांनी त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.

कोकण प्रांत हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. एकीकडे ७२० किलोमीटर लांबीचा पसरलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि दुसरीकडे सह्याद्रीच्या रांगा यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नामकरण सरकार दरबारी कधीच झाले आहे. मात्र प्रत्यक्षात पर्यटनाच्या बाबतीत कोकणात सर्वत्र आनंदी आनंदच आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कोकणाबाबतची प्रचंड अनास्था ही तर कोकणासारख्या निसर्ग संपन्नतेने समृद्ध असलेल्या परिसराला विकासापासून कोसो दूर ठेवते आहेच, मात्र त्याचबरोबर कोकणी माणसांमधील कुपमंडूक वृत्ती, व्यवसायाबाबतची अनास्था आणि नोकरीबाबतचे विलक्षण आकर्षण यामुळे दैव देते पण कर्म नेते अशी कोकणची स्थिती आहे.

मात्र आता कोकणालगतच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे वारे वाहत आहेत, मग ते गोवा असो कर्नाटक असो की त्यानंतरचे केरळ असो. पर्यटनाच्या बाबतीत आणि उद्योग, व्यापार, शेतीच्या बाबतीतही ही राज्य कोकणच्या तुलनेत प्रचंड पुढे गेली आहेत. कोकणी माणसाने जर या प्रचंड प्रमाणावर बदल होत असलेल्या आधुनिक काळानुसार जर स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाहीत तर मात्र ज्याप्रमाणे मुंबई ही मराठी माणसाची राहिली नाही त्याचप्रमाणे येत्या काही वर्षांमध्ये कोकणही कोकणी माणसाचे राहणार नाही याची नोंद घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

कोकणामध्ये प्रचंड नैसर्गिक साधनसामुग्रीची उपलब्धता आहे. विस्तीर्ण सागरी किनारा आहे. गोव्यालाही मागे सारतील असे अत्यंत आकर्षक बीच कोकणात विकसित करता येऊ शकतात, एवढी क्षमता कोकणामध्ये आहे. कोकण रेल्वेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे मुंबईसारख्या आर्थिक राजधानीशी तसेच गोवा आणि दक्षिण राज्यांशी रेल्वे वाहतुकीने जोडले गेले आहेत. आता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच चिपी विमानतळदेखील सुरू झाले आहे आणि तिथून विमान सेवादेखील सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली दहा वर्षे रखडत सुरू असली तरी ते देखील येत्या वर्ष दीड वर्षात पूर्णत्वास येण्याची चिन्हे आहेत. तसेही मुंबई गोवा महामार्ग हा जसा कोकणसाठी वरदान ठरू शकतो त्याचप्रमाणे कोकणात येण्यासाठी मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर आणि निपाणी आंबोली मार्गे कोकणात येण्यासाठी देखील पर्यायी वाहतुकीचा अप्रतिम मार्ग उपलब्ध आहे. कोणत्याही जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होत असताना सार्वजनिक वाहतुकीची साधने दळणवळणाची साधने तेथील उत्पादनक्षमता स्थानिक बाजारपेठांमध्ये वाढ अथवा विकास होण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी या प्रामुख्याने विचारात घेतल्या जात असतात.

कोकणचा त्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास हवाई मार्गानेदेखील कोकण आता जवळ आले आहे. रेल्वे वाहतुकीने ते यापूर्वी जोडले गेले होते आणि रस्ते वाहतुकीच्या बाबतीतदेखील कोकण हे आता बर्‍यापैकी समृद्ध होत चालले आहे. त्याचबरोबर गोवा राज्यामध्ये दोडामार्ग तालुक्यालगत नवीन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे मोपा विमानतळावरून जेव्हा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईल त्यानंतर सावंतवाडी ,दोडामार्ग , बांदा येथील स्थानिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकेल. जलवाहतुकीचा ही पर्याय हळूहळू उपलब्ध होत आहे. ज्याप्रमाणे मुंबई आणि गोवा ही क्रूज सेवा उपलब्ध असते त्याच धर्तीवर जर मुंबईतून कोकणातील प्रमुख शहरांना जरी या जिल्हाअंतर्गत जलवाहतुकीने जोडता आले तरीदेखील येथील स्थानिक शेतमालाला भविष्यात चांगल्या प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध होऊ शकतील.

- Advertisement -

शेती आणि मासेमारीमध्ये कोकणामध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. मात्र त्याचबरोबर आता कोकणामध्ये फळ बागायती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहे. आंबा, फणस, नारळ, सुपारी ही तर कोकणची परंपरागत फळे आहेतच. त्याचबरोबर आता यामध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान येत असून या जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचा अवलंब करून कोकणातील फळबागायतीच्या क्षेत्रामध्ये कोकणातील शेतकर्‍यांनी नवनवीन प्रयोग केल्यास फळबागायतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रात नजीकच्या काळात अव्वल दर्जा प्राप्त करू शकतो, एवढी क्षमता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतर अर्थकारणाचे बरेच संदर्भ मोठ्या प्रमाणावर बदलले आहेत. कोकणातील तरुणांनी, शेतकर्‍यांनी, बागायतदारांनी तसेच मच्छीमारांनीदेखील या बदलत्या अर्थकारणाचा योग्य तो बोध घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच सिंधुदुर्गला राज्यातील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेले आहे आणि त्या दृष्टीने विविध घोषणाही त्या निमित्ताने करण्यात आलेल्या होत्या. यातील बर्‍याच घोषणांची अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. सरकारने एकदा घोषणा केली की त्या निर्णयांची अंमलबजावणी त्या त्या जिल्ह्यांमध्ये होते का नाही ही पाहण्याची जबाबदारी कोकणातील सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची असते हे देखील येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. १९९५ नंतर नारायण राणे हे कोकणातील सर्वोच्च नेते म्हणून ओळखले जातात. राणे यांना केवळ चार साडेचार महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे मिळाली होती. नारायण राणे यांनीदेखील या चार साडेचार महिन्यांच्या कालावधीत देखील कोकणासाठी जे काही करता येईल ते करण्याचा अवश्य प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दुर्दैवाने राणे यांना २०२२ पर्यंत पुन्हा काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळू शकलेले नाही ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे. राणे यांनी वेळोवेळी स्वत:चा करिष्मा दाखवत काँग्रेस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री त्यानंतर उद्योग मंत्री तर आता भाजप सरकारच्या काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून राणे यांच्या नावाचा दबदबा आहे.

मात्र कोकणातील जनता जरी राणे यांना त्यांचा नेता मानत असली तरी राणे यांचे कोकणावरील प्रेम हे केंद्रीय मंत्री झाल्यापासून काहीसे आटत चालले आहे असेच चित्र दुर्दैवाने दिसत आहे. कोकणातील गेल्या दोन-तीन दशकातील राजकीय निवडणुकांचा जर आढावा घेतला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आढळनिष्ठा दाखवत शिवसेनेला भरभरून दिले आहे. त्याचप्रमाणे केवळ शिवसेनेतच नव्हे तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यासारख्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये देखील कोकणातील नेत्यांची बिलकुल कमतरता नाही. मात्र असे असूनही दुर्दैवाने कोकणच्या विकासाला म्हणावी तशी चालना आणि गती मिळू शकली नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

नारायण राणे तसेच रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत असे केंद्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री तर उर्वरित तिघे महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री असे मिळून चार मंत्री सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना मिळालेले आहेत, मात्र असे असूनदेखील कोकणच्या विकासाकरता जी एक आंतरिक तळमळ लागते त्याचा कुठेतरी अभाव जाणवतो आहे आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम कोकणातील स्थानिक जनतेवर होत आहे. कोकणच्या विकासावर होत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. कोकणात सहकार आजवर कधी रुजला नाही, त्यामुळे तो पुढेही रुजणार नाही, हे मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. कोकणाच्या बाहेरील उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या सहकारी संस्था उभ्या केल्या, त्याचा लाभ तेथील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी होत आहे.

कोकणात लोक एकत्र येतात ते गजाली मारण्यासाठी, असेच आजवरचे सूत्र आहे. एकत्र मिळून काही काम करायचे म्हटले की, त्यांच्यातील मतभेद उफाळून येतात, त्यात ते तडजोड करत नाहीत. तडजोडीशिवाय सहकार शक्य होत नाही. पण हे लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती आहे. नेते मंडळी राजकीय पक्षांमध्ये विभागली गेली आहेत. त्याप्रमाणे त्यांना मानणारे कार्यकर्ते. त्यामुळे संघटित होऊन विकास साध्य करण्याचे एक स्वप्न बनून राहिले आहे. त्यामुळे कोकणात बाहेरून येणारे लोक आपले उद्योग वाढवून मूळ कोकणी माणसाला आपल्या मुठीत ठेवत आहेत. त्या लोकांकडून आपण काही उद्यमशीलता घ्यावी, ही मानसिकताही दिसत नाही. त्यामुळे मूळ कोकणी माणूस त्यांचा ग्राहक वर्ग बनला आहे. मुंबई पुण्यातील बहुतांश चाकरमाणी सणसुदीला कोकणात जातात. त्यामुळे स्वत:च्या घरी दूरचा पाहुणा मी, अशी त्याची अवस्था झालेली आहे.

कोकणात रोजगार उद्योग, पर्यटन, कृषीवर आधारित व्यवसाय, फूड प्रोसेसिंग उद्योग, मासेमारी यामध्ये जर लक्षणीय बदल घडवून आणायचा असेल तर त्याकरता सर्वात आधी कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी मग ते सरकारमधील असो अथवा विरोधी पक्षांमधील असोत त्यांनी विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून कोकणी माणसाच्या प्रगतीला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील वजनदार मंत्री आणि राजकीय नेते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये सरकारी निधी मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी खेचून आणतात, असा विकासकामांकरिता निधी खेचून आणण्याची स्पर्धा कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये असली पाहिजे. सरकारमधील जे चार मातब्बर मंत्री सध्या कोकण क्षेत्रातील आहेत या चारही मंत्र्यांनी राज्यातील, देशातील राजकीय स्थितीवर वाटेल तितके अवश्य बोलावे, मात्र कोकणातील विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणावर निधी कसा आणता येईल याचाही विचार या मंत्र्यांनी अवश्य करावा.

इथे प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना की उद्धव ठाकरेंची शिवसेना असा नसून कोकणी माणसाला आपली वाटणारी शिवसेना ही कोकणच्या विकासासाठी प्रत्यक्षात काय करते याचाही विचार आता सुजाण कोकणी माणूस करू लागला आहे. देशावर सत्ता गाजवणार्‍या भाजपलादेखील कोकणाने मातब्बर नेत्यांची रसद पुरवलेली आहे. अगदी आताच्या काळातले बघायचे झाल्यास मग ते विनोद तावडे असतील, अ‍ॅड. आशिष शेलार असतील की रवींद्र चव्हाण असतील. त्यामुळे कोकणी माणसाच्या विकासाचा एक कलमी कार्यक्रम केंद्रीभूत मानून जर कोकणातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी कोकण विकासाचा आराखडा आखला आणि त्याची अंमलबजावणी केली तर कोकणामध्ये किमान पायाभूत सोयीसुविधा तरी विकसित होऊ शकतील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकणापासून दुरावलेल्या कोकणी माणसाची पावले पुन्हा एकदा कोकणाकडे वळतील. माणसांअभावी बंद पडलेली कोकणातील घरे, वाड्या पुन्हा एकदा माणसांनी गजबजून जातील. कोकणचा कॅलिफोर्निया जरी होऊ शकला नाही तरी विकास मात्र निश्चितच होऊ शकेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -