घरसंपादकीयओपेडदादांची नाराजी आणि मुख्यमंत्रीपदाची चर्चा

दादांची नाराजी आणि मुख्यमंत्रीपदाची चर्चा

Subscribe

अजित पवारांची नाराजी आणि त्यानंतर त्यांना मिळालेले पुण्याचे पालकमंत्रीपद. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या सहा सहकार्‍यांनाही पालकमंत्रीपद मिळवून दिले आहे. त्यातही बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे, कोल्हापूरला हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. भाजप नेत्यांकडूनच अजितदादांचा मुख्यमंत्री म्हणून होणारा उल्लेख हा त्यांच्या पोटातील ओठांवर आले असल्याचे दाखवून देत आहे.

स्थळ – लंडन
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार.
‘मला आनंद आहे की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यासोबत आलेले आमचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार.’

स्थळ – सातारा
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप
‘राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत.’

- Advertisement -

भाजपचे सुधीर मुनगंटीवर, बावनकुळे या दोन नेत्यांनी अजित पवार यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला आहे. भाजप नेत्यांच्या पोटात असलेले त्यांच्या ओठांवर आले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला खतपाणी घालत आहे, ती एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेच्या टांगत्या तलवारीची.

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १३ ऑक्टोबरपासून होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायद्याने काम केले, तर शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील आणि साहजिकच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अशावेळेस अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहेच. राज्यात नुकताच गणपती उत्सव झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा ओळखला जातो. या गणरायाच्या दानपेटीत अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे पत्र अजितदादांच्या समर्थकाने टाकले होते. यावरून त्यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची ते मुख्यमंत्री व्हावे ही किती तीव्र इच्छा आहे, हे स्पष्ट होते.

- Advertisement -

अजित पवारांसोबत महायुतीत गेलेले विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील असे म्हटले आहे. राज्यात १४५ आमदारांचा आकडा ज्यांच्याकडे असेल तो मुख्यमंत्री होणार, असे सांगत मिटकरी म्हणाले, ‘अजितदादा २०२४ च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून राज्याचे मुख्यमंत्री होतील.’ मिटकरींनी आकडेवारीचे वास्तव सांगत दादांच्या मुख्यमंत्रीपदासाठी २०२४चा मुहूर्त सांगितला आहे. अजितदादांनींही बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलाताना हेच सांगितले,‘ज्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांना १४५ हा जादूई आकडा गाठावा लागतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी हा आकडा गाठला आणि ते मुख्यमंत्री झाले.’ यात अजितदादांना उशीर झाला असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

कार्यकर्ते आणि आमदारांसाठी अजित पवारही काय करू शकतात हे त्यांनी परवा दाखवून दिले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीकडे अजितदादांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सर्व मंत्री उपस्थित होते. अजित पवारांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचं त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी सांगितले, मात्र त्याचवेळी दादांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका आणि चर्चा सुरू होत्या. त्यामुळे दादांच्या नाराजीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. ही नाराजी होती पुणे, बीड, कोल्हापूर, रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्यासाठी.

दादांच्या नाराजीचे फलीत दुसर्‍या दिवशी – बुधवारी समोर आले. रायगड वगळता उर्वरीत तिन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे अजित पवार, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले. याशिवाय दिलीप वळसे-पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांच्या गळ्यातही पालकमंत्रीपदाची माळ पडली. अजित पवारांसोबत गेलेल्या ९ आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. आता त्यातील छगन भुजबळ आणि आदिती तटकरे वगळता सर्वांना पालकमंत्रीपदही मिळाले आहे. आपल्यासोबत असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी अजित पवार हे सर्वशक्तीने लढतात हे त्यांच्या कालच्या नाराजीतून दिसून आले आहे.

अजितदादांची अशीच नाराजी शरद पवारांसोबत असतानाही समोर येत राहिली आहे. दादांच्या नाराजी, नॉट रिचेबल असण्याचे किस्सेही अनेक आहेत, मात्र तेव्हा शरद पवार या मुत्सद्दी नेत्यासमोर दादांची नाराजी फारकाळ टिकून राहू शकत नव्हती.

२००४ सालानंतर अजित पवारांच्या नावासोबत अनेक वाद जोडले जाऊ लागले. त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून पक्षातील आणि सहकारी पक्ष म्हणजे काँग्रेस नेत्यासोबतच्या नाराजीपर्यंतच्या घटना आहेत. अजितदादांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यावर सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप झाला आहे. राज्य सहकारी बँक प्रकरणातच शरद पवारांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ सप्टेंबर २०१९ रोजी चौकशीला बोलवले होते. लोकसभा २०१९ निवडणुकीच्या बरोबर आधीची ही घटना होती. शरद पवारांनी ईडी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर करून स्वतःच ईडी कार्यालयात हजर होणार असल्याचे सांगितले. तेव्हा ईडीने आता चौकशीला येऊ नका, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सांगत प्रकरण गुंडाळले होते.

अशातच बातमी येऊन धडकली की अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याची माहिती स्वतः शरद पवारांनाही नव्हती. राजीनामा देऊन अजित पवार गायब झाले होते. ते नॉट रिचेबल होते. अजितदादांनी असा निर्णय का घेतला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते, तेव्हा शरद पवारांनी सांगितले होते, काकाला चौकशीला सामोरे जावे लागत असल्याच्या कारणामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असेल. दुसर्‍या दिवशी अजित पवारांनी माध्यमांसमोर येत भूमिका स्पष्ट केली. ‘राज्य सरकारी बँकेबाबत २०११ मध्ये तक्रार देण्यात आली होती. इतक्या वर्षांनंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि माझे नाव या प्रकरणात समोर येऊ लागले. पवारांचा या बँकेशी दुरान्वयानेही संबंध नाही. तरीही आमची बदनामी करण्यात येत असल्यामुळे उद्विग्न होऊन कोणालाही न सांगता राजीनामा दिला.’

हे काही पहिल्यांदा झाले होते असे नाही. २०२२ मध्ये दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू असताना शेवटच्या सत्रात शरद पवारांचे भाषण होते. त्याआधी अजितदादा बोलतील अशी शक्यता होती, मात्र ऐनवेळी अजितदादा मंचावरून खाली येऊन बसले. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी भाषणासाठी त्यांचे नाव घेतले, मात्र दादा सभागृहात नव्हते. बर्‍याचवेळाने मग शरद पवारांनी अखेर भाषण केले. तेव्हाही अजित पवार नाराज असल्याची चर्चा झाली होती. मुंबईत आल्यानंतर अजित पवारांनी सांगितले की,‘मी वॉशरुमला गेलो होतो. माझ्याबद्दल माध्यमांकडून नेहमीच चुकीचा अर्थ काढला जातो. मी वॉशरुमलाही जायचे नाही का?’

या घटनेनंतर काही दिवसांनीच नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे शिबिर होते. तेव्हाही अजितदादा गायब होते. तब्बल सात दिवस ते नॉट रिचेबल होते.

गेल्यावर्षी ४-५ डिसेंबर २०२२ ला शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर होते. या शिबिरालाही अजित पवारांची अनुपस्थिती सर्वांना खटकणारी होती. यानंतरही काही दिवस ते गायब होते. अजित पवारांनी समोर येऊन सांगितले होते की,‘मी परदेशात होतो. माझा नियोजित दौरा होता. कारण नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. अजित पवार कुठे आहे, एकदा तरी माझ्या ऑफिसला विचारा? उगाच काहीही बातम्या चालवायच्या!’ असे उलट माध्यमांनाच त्यांनी खडसावले होते.

असेच एकदा अजितदादा अचानक गायब झाले होते, त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. ती घटना म्हणजे २०१९चा ‘पहाटेचा शपथविधी.’ महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राजकीय वातावरण या घटनेमुळे ढवळून निघाले होते. अजित पवारांनी आतापर्यंत दिलेल्या सर्व धक्क्यांमधील हा सर्वात मोठा धक्का मानला पाहिजे.

एप्रिल २०२३ मध्येही ते असेच अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदारही नॉट रिचेबल होते. राज्याचा विरोधी पक्षनेता असा अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय चर्चांना उधान आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौर्‍यावर जाण्याच्या २४ तास आधी दादांच्या नॉट रिचेबलची बातमी येऊन धडकली, त्यामुळे या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

आता अजित पवार हे महायुतीत सहभागी आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच शब्द दिल्यामुळे ते सत्तेत सहभागी झाले असल्याचे सांगितले जाते. देवेंद्र फडणवीस सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आणि त्यागी वृत्ती भाजपच्या नेत्यांनी स्वीकारावी असे सांगत आहेत. त्यातच त्यांनी बुधवारी एका जाहीर मुलाखतीतही अजित पवारांना २०२४ मध्ये ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिंदेच २०२४ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करतील असे मानले जात असले तरी अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे गुरुवार, शुक्रवार हे दोन दिवस दिल्ली दौर्‍यावर आहेत. त्यात ते भाजप नेते अमित शहांचीही भेट घेणार आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणे शक्य नाही.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -