घरसंपादकीयओपेडवर्ल्डकपचे अतिरेकी स्वप्नरंजन...!

वर्ल्डकपचे अतिरेकी स्वप्नरंजन…!

Subscribe

क्रिकेट वर्ल्डकपमधील पराभवानंतर भारतीय जनतेने यातून सर्वात ठळकपणे जर कुठली गोष्ट शिकायची असेल तर ती म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या बळावर जगज्जेता होता येत नसते. त्यासाठी लागते ते अत्यंत उत्तम, शिस्तबद्ध आणि तितकेच संयमपूर्ण टीमवर्क होय. तसेच अतिआत्मविश्वास, स्वतःची अतिआत्मप्रौढी ही कोणालाही शेवटी अधोगतीकडे घेऊन जात असते. वर्ल्डकपमधील भारतीय क्रिकेट टीमची कामगिरी ही नक्कीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होती यात वादच नाही. वर्ल्डकपचा अंतिम सामना होण्यापूर्वी भारतीय संघाने वर्ल्डकप स्वतःच्या खिशात घातल्याचे चित्र भारतीय प्रसारमाध्यमांनी अगदी उथळपणे रंगवले होते. तिथेच सगळा घात झाला. वर्ल्डकपचे अतिरेकी स्वप्नरंजन महागात पडले.

इंसान लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता है…!

कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांना काल वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलिया टीमचे नाव कोरले गेल्यानंतर वरील ओळी नक्कीच आठवल्या असतील. शत्रूच्या राज्यात जाऊन सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना कमालीच्या संयमाने आणि उत्कृष्ट खेळ करत विजय पदरात पडेपर्यंत म्हणजेच अर्थात शेवटच्या चेंडूपर्यंत सर्व परिस्थितीचे भान राखून कसे खेळावे आणि स्वतःच्या देशाला स्वतःच्या टीमला कसे विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवावे हे काल ऑस्ट्रेलियाच्या टीमने केवळ भारतीय क्रिकेट टीमलाच नव्हे तर भारतातील तमाम राजकीय पक्षांना आणि भारतीय जनतेलादेखील स्वतःच्या कृतीतून ठामपणे आणि तितक्याच शांतपणे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

मुळात भारतीय जनतेने यातून सर्वात ठळकपणे जर कुठली गोष्ट शिकायची असेल तर ती म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या बळावर जगज्जेता होता येत नसते. त्यासाठी लागते ते अत्यंत उत्तम, शिस्तबद्ध आणि तितकेच संयमपूर्ण टीमवर्क होय. तसेच अतिआत्मविश्वास, स्वतःची अतिआत्मप्रौढी ही कोणालाही शेवटी अधोगतीकडे घेऊन जात असते. वर्ल्डकपमधील भारतीय क्रिकेट टीमची कामगिरी ही नक्कीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होती यात वादच नाही.

वर्ल्डकपचा अंतिम सामना सोडला तर त्याआधी झालेले पहिले नऊच्या नऊ सामने भारतीय क्रिकेट टीमने एकहाती जिंकून वर्ल्डकप हा जणू अंतिम लढाईपूर्वीच स्वतःच्या खिशात घातल्याचे चित्र भारतीय प्रसारमाध्यमांनी अगदी उथळपणे रंगवले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट टीमची प्रत्यक्ष मैदानावर ऑस्ट्रेलिया जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आल्यानंतर जी काही मानसिक स्थिती झाली होती या मानसिकतेला जबाबदार सर्वार्थाने उथळपणे वर्ल्डकपचे अतिरंजित वार्तांकन आहे. मुळात प्रसारमाध्यमे तसेच भारतीय क्रिकेट रसिक यांना याचे निश्चितच भान आहे की क्रिकेट हा मुळातच शेवटच्या चेंडूपर्यंत कधीही निकाल फिरवून निर्णायक कलाटणी देणारा खेळ आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा अंतिम सामन्यामध्ये भारतातील प्रसारमाध्यमांनी ज्या एकदम सातव्या आसमान पे नेऊन ठेवल्या तिथेच खरेतर भारतीय क्रिकेट टीमचा पहिला घात झाला, असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

हे लक्षात घेण्याची गरज आहे की भारतीय जनता ही अधिक भावनिक, धार्मिक, श्रद्धाळू आणि त्याचबरोबर ती तेवढीच क्रिकेटवेडी आहे. यामुळेच सचिन तेंडुलकर याला आपण भारतीय क्रिकेटचा देव मानतो, तथापि हे क्रिकेटवेड भारतीयांनी कुठेतरी मर्यादित आणि संयमित, संतुलित करण्याची गरज आहे हे कालच्या वर्ल्डकपनंतर अधिक प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. मुळात कोणताही खेळ असो त्या खेळाकडे खेळाडू वृत्तीने अर्थात स्पोर्टिंग स्पिरिट्सने पाहिले जाणे हे अत्यंत गरजेचे आहे.

दोन देशांमधील क्रिकेटचा सामना म्हणजे काही दोन देशांमधील युद्ध नव्हे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये गेल्या काही दशकांमध्ये क्रिकेटचा फिवर हा कोरोनापेक्षाही अधिक वेगाने पसरू लागला. त्यापासून क्रिकेटचे ग्लॅमर अधिकाधिक वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये दोन देशांमधील क्रिकेटच्या मॅचेस या अगदी दोन शत्रू राष्ट्रांमधील अटीतटीच्या निर्णायक युद्धाप्रमाणे खेळवल्या जाऊ लागल्या. त्याने भारतीयांमधील खिलाडूवृत्ती पूर्णपणे मारून टाकली आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती वाटू नये.

भारताच्या खेळाडूंनी विकेट काढली तर भारतीय क्रिकेट रसिक संपूर्ण स्टेडियम डोक्यावर घेतात आणि तेच जर ट्रेझर्स हेडने सिक्सर अथवा एखादा चौकार मारला तर स्टेडियमवर भयाण शांतता पसरते हे कशाचे द्योतक आहे? याचाही विचार क्रिकेट रसिकांनी निश्चितपणे केला पाहिजे. ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप जिंकणार हे चित्र जेव्हा हळूहळू स्पष्ट होत गेले तसतसे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण हे कमालीचे शांत, निस्तेज तर झालेच, मात्र त्याहीपेक्षा म्हणजे क्रिकेटप्रेमी भारतीयांच्या घरातदेखील स्मशान शांतता पसरली. इतके क्रिकेटबाबत खेळ म्हणून आपण अरसिक का झालो याचेही आत्मचिंतन क्रिकेट रसिकांनी केले पाहिजे. भारतीय क्रिकेट रसिकांनी भारताने विश्वविजेता व्हावे या अपेक्षा बाळगण्यात काहीच गैर नाही. त्या जरूर बाळगल्याच पाहिजेत, मात्र त्या बाळगत असताना आपण क्रिकेट हा खेळ म्हणून त्याचा मनमुराद आनंद घेतोय हेदेखील त्यांनी भान बाळगले पाहिजे.

भारतीय क्रिकेट टीमची वर्ल्डकपमधली कामगिरी ही निश्चितच तमाम क्रिकेट विश्वातील रसिकांना अभिमानास्पद वाटावी अशीच होती आणि आहे, मात्र प्रत्येक सामना हा भारतीय क्रिकेट टीमने जिंकलाच पाहिजे, भारतीय बॅट्समननी षटकार आणि चौकार यांची बरसात करत धावांचा डोंगर उभा केलाच पाहिजे आणि त्याचबरोबर भारतीय बोलर्सनी त्यांच्या गोलंदाजीवर पटापट विकेट काढल्याच पाहिजेत ही जी काही भारतीय क्रिकेट रसिकांची अतिरेकी भावना गेल्या काही वर्षांमध्ये वाढीस लागली आहे, ही भारतीय क्रिकेटला भविष्यामध्ये घातक वळणावर नेऊ शकते याचे तरी भान क्रिकेटवर मनापासून प्रेम करणार्‍या रसिकांनी बाळगणे गरजेचे आहे.

क्रिकेट रसिकांच्या या अतिरेकी भावनांचा भारतीय क्रिकेट टीमवर, त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या खेळावर काय परिणाम होत असेल याचा तरी विचार करणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा म्हणजे जे बाहेरचे देश आपल्या देशात येऊन निर्भय वातावरणाची अपेक्षा बाळगून खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ दाखवत असतात, त्यांच्यातील खेळाडूंवर या अतिरेकी मानसिकतेचा किती विपरीत परिणाम होत असेल याचा तरी माणूस म्हणून कधीतरी विचार करावा, असे वाटत नाही का? इतके असहिष्णू तर दीडशे वर्षे देशावर राज्य करणार्‍या इंग्रजांबाबतही आपण कधी नव्हतो, मग क्रिकेटबाबतच इतकी टोकाची असहिष्णूता का बरे असावी?

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने १३७ धावांची निर्णायक, अप्रतिम, संयमित, संतुलित आणि तितकीच आक्रमक खेळी खेळून स्वत:च्या संघाला तसेच देशाला ज्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय मिळवून दिला, त्याच्यातील खेळाडूला भारतीय क्रिकेट रसिकांनी खुल्या मनाने मनापासून दाद देणे हे खरे तर अपेक्षित होते. ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या शहरात आणि ज्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या टीमने स्वतःच्या क्रिकेट संघाला क्रिकेटमधील जगज्जेते केले तेथील सर्व वातावरण हे पूर्णपणे त्यांच्या विरोधात होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी तर वर्ल्डकप फायनल सामन्याच्या आधीच जणू भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकलाच आहे अशी हवा निर्माण करून ठेवली होती आणि मीडियाच्या तालावर नाचणार्‍या भारतीय जनतेने त्यावर स्वतःच्या अतिरेकी विजयी भावनांचा कळस चढवला होता.

त्यातही ऑस्ट्रेलियाची सुरुवातीची परिस्थिती अत्यंत दयनीय आणि पराभवाच्या छायेत होती. केवळ ४७ धावांवर ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते. अशा परिस्थितीमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेन या दोघाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जो संयमीतपणा त्यांच्या खेळामधून दाखवला तो खरोखरंच सामान्य क्रिकेट रसिक म्हणून त्यांच्यातील खेळाला उत्स्फूर्त दाद देणारा तसेच वाखाणण्यासारखाच होता आणि त्याचबरोबर क्रिकेट म्हणजे केवळ धावांचा डोंगर रचणे नव्हे अथवा पटापट विकेट काढणेही नव्हे तर आपल्यातील क्षेत्ररक्षणाचे उत्कृष्टपणे दर्शन घडवत प्रतिस्पर्धी संघाच्या धावा स्वतःच्या बळावर रोखून दाखवणे हाही क्रिकेटमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि विजयामध्ये मोलाची भूमिका बजावणारा घटक आहे हेदेखील ऑस्ट्रेलियाच्या टीमने तमाम क्रिकेट रसिकांच्या निदर्शनास आणून दिले.

कारण कालच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचे किमान आठ ते दहा चौकार रोखले आणि तेही त्यांच्यातील चपळाईचे पूर्ण कौशल्य पणाला लावत. त्यांनी वाढणारी धावसंख्या होती ती नियंत्रणात आणण्याचे फार मोठे कार्य या वर्ल्डकप फायनलच्या सामन्यात दाखवून दिले. याकडेही भारतीय क्रिकेट रसिकांनी अभ्यासू वृत्तीने पाहिले पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हे जे काही आठ ते दहा चौकार रोखले याचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास नवल वाटू नये.

अर्थात याचबरोबर क्रिकेटकडे यापुढे खिलाडूवृत्तीने एक खेळ म्हणून निरपेक्ष नितळ भावनेने पाहिले गेले पाहिजे. गेल्या काही दशकांमध्ये क्रिकेट ही खूप मोठी इंडस्ट्री म्हणून उदयाला आली आहे. त्याचे बाजारीकरण लक्षात घेता असेच जर यापुढेही होत राहिले तर सर्वसामान्य क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये क्रिकेट या खेळाविषयी असणारा एक विश्वास, आवड, रसिकता आणि खेळाचा निर्मळ आनंद हा कुठेतरी हरवून जाईल ही भीतीदेखील क्रिकेटमधल्या नामवंतांनी, तज्ज्ञांनी लक्षात घेतली पाहिजे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -