Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड उदयनिधींच्या निमित्ताने भाजपकडून इंडियाची कोंडी!

उदयनिधींच्या निमित्ताने भाजपकडून इंडियाची कोंडी!

Subscribe

उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य रामास्वामी पेरियार यांच्या पुरोगामी विचारांतून आलेले आहे, मात्र त्यांना होणारा विरोध हा धर्मचिकित्सा करण्याऐवजी राजकीय आहे, असेच दिसते. उदयनिधी स्टॅलिन यांचा पक्ष ‘डीएमके’ सध्या भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष आहे. भाजपच्या एकाधिकारशाहीला ‘इंडिया’ देशभरात आव्हान देत आहे. ही आघाडी सध्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे भाजपचे सनातन प्रेम उफाळून आले आहे.

तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन विचारधारा संपली पाहिजे असे वक्तव्य केलं आणि भाजपला ‘इंडिया’ आघाडीविरोधात बोलण्यासाठीच नाही, तर तुटून पडण्याची मोठी संधी चालून आली. त्याचे पुरेपूर राजकारण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सुरू झाले आहे. 2 सप्टेंबरला तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स आणि आर्टिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात उदयनिधी यांनी सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं, असे विधान केले होते. सनातनी वृत्तीचे उच्चाटन करावे लागणार आहे, असा उदयनिधी यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. कारण सनातन धर्माचे उच्चाटन शक्य नाही.

उदयनिधींच्या या वक्तव्यानंतर हिंदू साधूसंतांनी त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला. भाजपचे मंत्री, नेते, प्रवक्त्यांनीही उदयनिधींचे वक्तव्य हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा टाहो फोडायला सुरुवात केली. त्यावर उदयनिधी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. मी काही नरसंहारासाठी कोणाला प्रोत्साहित केलेले नाही. तसं माझं वक्तव्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा काँग्रेसमुक्त भारत झाला पाहिजे, असे म्हणतात, तेव्हा ते काही काँग्रेस कार्यकर्त्यांचा खात्मा करण्याचं सुचवत नसतात. ‘सनातन’ म्हणजे अपरिवर्तनशील – काहीच बदल नको. धर्मामध्ये काही वाईट चालीरीती असूनही, त्या बदलण्यास असलेला विरोध ही सनातनी वृत्ती आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. हीच आमची विचारधारा आहे. 19व्या शतकापर्यंत मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला जात नव्हता. महिला-मुलींना मंदिरात प्रवेश नव्हता. आम्ही हे सर्व बदलले आहे, हीच आमची द्रविड विचारसरणी आहे. असे म्हणत उदयनिधी स्टॅलिन हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. उदयनिधी यांनी त्यांच्या वक्तव्याला दक्षिणेतील विचारवंत ई. व्ही. रामास्वामी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सनातन धर्मावरील अभ्यासाचा दाखला दिला आहे.

- Advertisement -

ई. व्ही. रामास्वामी यांच्या राजकीय जीवनाला 1919 मध्ये गांधीवादापासून, एक काँग्रेसी कार्यकर्ता म्हणून सुरुवात होते. दारू बंदी, अस्पृष्यता विरोध, खादीचा वापर या गांधी विचारांकडे ते आकर्षित झाले. त्यांनी पत्नी नागमणि आणि बहीण बालाम्बल यांनाही त्यांनी राजकीय आंदोलनात सक्रिय सहभागास प्रवृत्त केले. असहकार आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. तुरुंगवासही भोगला. काँग्रेसच्या मद्रास प्रेसिडेंसीचे अध्यक्ष झाले. हा सर्व राजकीय लढा सुरू असतानाच 1924 मध्ये एक घटना घडते. केरळमधील त्रावणकोरचा राजा मंदिराकडे निघाला होता. तेव्हा त्याने राज प्रसाद ते मंदिरापर्यंत दलितांना प्रवेशबंदी केली. यामुळे दलितांचा आत्मसन्मान दुखावला गेला. त्यांनी राजाच्या या कृत्याचा विरोध सुरू केला. राजाच्या आदेशाने दलितांना पकडण्यात आले, तुरुंगात टाकण्यात आले. तेव्हाच लोकांनी ई. व्ही. रामास्वामी यांना या आंदोलनाचे नेतृत्व सोपवले. त्रावणकोरच्या राजाविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी रामास्वामी पेरियार यांनी मद्रास प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अस्पृश्यता निर्मूलन, बाल विवाहांना विरोध, विधवा विवाहांना प्रोत्साहन, महिलांना फक्त चूल आणि मूलमध्ये न अडकवता शिक्षणाचा अधिकार, जोडीदार निवडण्याचे किंवा सोडण्याचे स्वातंत्र्य, लग्न हे पवित्र बंधनपेक्षा दोघांच्या संमतीने मैत्रीपूर्ण संबंध यासाठी अभियान चालवले. पेरियार यांचे मत होते की समाजामधील अंधश्रद्धा आणि माणसा-माणसांतील भेदभाव चुकीचा आहे. दक्षिण भारतीयांवर हिंदी थोपवले जाण्याचाही त्यांनी 1937 मध्ये विरोध केला होता. 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचे वक्तव्य केले होते. तेव्हाही गैर-हिंदी राज्यांनी त्याचा कडाडून विरोध केला होता. त्यात तामिळनाडू आग्रही होते. इंडिया आघाडीच्या नुकत्यात झालेल्या मुंबईतील बैठकीतही डीएमके नेते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या मातृभाषेतच पत्रकार परिषदेला संबोधित केले.

एआयएडीएमके प्रमुख आणि तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयराम जयललिता यांचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, तेव्हा प्रश्न उपस्थित झाला की जयललिता यांचा अंत्यविधी कोणत्या पद्धतीने करायचा? त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करायचे की दफनविधी करायचा? जे. जयललिता या हिंदू असल्या तरी त्यांचा पक्ष हा द्रविडी विचारधारा मानणारा आहे. द्रविड विचारधारा ही हिंदू धर्मातील वैदिक आणि ब्राम्हणवादी परंपरांना मानत नाही. द्रविड आंदोलनातील लोकांचा अंत्यसंस्कार हा अग्निसंस्काराने नाही, तर दफनविधी करून केला जातो. त्यामुळे अखिल भारतीय द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या प्रमुख राहिलेल्या जे. जयललिता यांचे पार्थिव दफन करण्यात आले आणि नंतर तिथे समाधी बांधण्यात आली. याचप्रमाणे 2018 मध्ये जयललिता यांचे कट्टर विरोधक डीएमके प्रमुख एम. करुणानिधी (उदयनिधी स्टॅलिन यांचे आजोबा) यांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्यावरही अग्निसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी झाला. पेरियार यांनी सुरू केलेले द्रविड आंदोलन कशा पद्धतीने सनातनी वृत्तीला विरोध करते त्याचे हे मोठे उदाहरण आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनीदेखील सनातनी वृत्तीलाच विरोध केला आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे, की आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो.

- Advertisement -

उत्तर भारतात स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा विरोध होत असला तरी दक्षिण भारतातून त्यांना समर्थन मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियंक खर्गे, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी उदयनिधी यांचे समर्थन करत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असलेल्या टीकेला अनाठायी म्हटले आहे. दक्षिणेत सामान्य बोलचालीमध्ये सनातनी धर्म हाच आशय वापरला जातो असे त्यांनी म्हटले आहे. फक्त राजकीय नेतेच नाही तर तामिळ चित्रपट क्षेत्रातूनही उदयनिधी यांना पाठिंबा मिळत आहे. चित्रपट निर्माते पा. रंजित यांनीही उदयनिधी यांचे समर्थन करताना म्हटले आहे की, जातीच्या, लिंगाच्या आधारावरून भेदभाव ही अमानवीय पद्धती आहे. क्रांतिकारी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, महात्मा फुले यांची हीच विचारधारा आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचेही हेच सार आहे, मात्र त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून, नरसंहाराच्या आव्हानाच्या स्वरुपात दाखवले जात आहे, हे चुकीचे आहे.

भारतामध्ये धर्माची वेळोवेळी चिकित्सा झालेली आहे. ही परंपरादेखील प्राचीन आहे. चार्वाक, बुद्धापासून कबीरांपर्यंत हे चालत आलेले आहे. राजाराम मोहन राय यांनी पश्चिम बंगालमध्ये बाल विवाह, सती प्रथा, जातीवाद, कर्मकांड, पडदा पद्धतीला विरोध केला होता. इंग्रज सरकारला त्यासाठी कायदे करायला लावले. महाराष्ट्रानेही अनिष्ट रुढी परंपरांना विरोध केलेला आहे. मागील शतकातील तरुण पिढीला आपल्या धर्मातील दोष ठळकपणे दिसू लागले होते. जातीभेदावर आधारलेली समाजरचना, काही जातींवर होणारा अन्याय यांच्या जाणिवेमुळे ही पिढी अस्वस्थ झाली. स्त्रियांवर धर्माने टाकलेल्या बंधनांतून त्यांना मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले होते. यात गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडवून समानतेच्या आधारावर समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रस्त्यावरील लढाईसह कायद्याच्या माध्यमातून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरिती, अंधश्रद्धा या वृत्ती आहेत. त्यांचा विरोध महाराष्ट्रातील संत परंपरेनेही वेळोवेळी केला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्यदेखील याच पुरोगामी विचारांतून आलेले आहे, मात्र त्यांना होणारा विरोध हा धर्मचिकित्सा करण्याऐवजी राजकीय अधिक आहे. उदयनिधी स्टॅलिन यांचा पक्ष ‘डीएमके’ सध्या भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. भाजपच्या एकाधिकारशाहीला ‘इंडिया’ देशभरात आव्हान देत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत 3 बैठका झाल्या आहेत. यात एकही घटकपक्ष कमी न होता मुंबईमधील बैठकीत त्यात एक-दोघांची भर पडून जवळपास 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी ही आघाडी झाली आहे. ‘इंडिया’ दिवसेंदिवस मजबूत होत असल्यामुळेच भाजप आणि एनडीए आघाडीतील घटक पक्ष उदयनिधींच्या माध्यमातून ‘इंडिया’वर निशाणा साधत आहेत का, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. आज डीएमकेवर टीका करणार्‍या भाजप नेत्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की 1999 ते 2003 मध्ये डीएमकेच्या पाठिंब्यावर अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत होते. ही आघाडी तेव्हा भाजपला कशी चालली? हेदेखील भाजप नेत्यांनी सांगितले पाहिजे, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -