घरसंपादकीयओपेडराजकारणात ‘राम’ राहिला आहे का?

राजकारणात ‘राम’ राहिला आहे का?

Subscribe

सध्या राजकारण एवढे गढूळ झाले आहे की, यात हात घातला तरी हाताला काही लागणार नाही, अशी स्थिती आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. त्या अनुषंगाने श्रीरामाचा जयघोष होत आहे, पण प्रभू रामचंद्राचे इतर आदर्श तर जाऊ द्या, पण किमान एक वचनी, एक वाणी या आदर्शांना राजकारण्यांकडून सर्रास हरताळ फासलेला दिसत आहे. त्यामुळे ‘रामराज्या’च्या कितीही वल्गना केल्या तरी, त्यापासून आपण सर्वच कोसो दूर असल्याची कल्पना आता सर्वांनाच येत चालली आहे. गरिबांबद्दलची कणव, स्त्रीदाक्षिण्य, विद्येबद्दल आदर, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार हा कवडीमोलाचा झाला आहे. जनतेच्या या प्रश्नांच्याच आगीवर पुढेही राजकारण्यांची पोळी भाजली जाणार आहे. त्यामुळे मूळ परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ प्रभू श्रीरामाचा जयजयकार नको, तर त्याबरोबर जागरुकताही आवश्यक आहे. येणार्‍या निवडणुका म्हणजे एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Politics is a science.You can demonstrate that you are right and that others are wrong. (राजकारण हे एक शास्त्र आहे. तुम्ही बरोबर आहात आणि इतर चुकीचे आहेत, असे तुम्ही यात दाखवू शकता.) असे फ्रेंच साहित्यिक आणि तत्त्ववेत्ता झां-पॉल सार्त्र यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, गोवा असो किंवा बिहार असो, न पेक्षा संपूर्ण भारतातच हेच चित्र पहायला मिळत आहे. पुढार्‍यांच्या माकडचेष्टा आणि बेडूक उड्या पाहून नीतीमत्ता, निष्ठा आता फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात यापुरत्याच राहिल्या आहेत, याची खात्री होते.
बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली आणि ते एका दिवसात माजी-आजी मुख्यमंत्री बनले. 28 जानेवारीला त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली आहे. 2014-15 चा काळ वगळता 2005पासून त्यांचा हाच खेळ सुरू आहे. आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील मतदार किती सुज्ञपणा दाखवतात, हे समजेल.

वास्तविक, नितीश कुमार यांनी 2022 मध्ये भाजपची साथ सोडल्यानंतर यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला धूळ चारण्याचा निर्धार करत विरोधकांची मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. या विरोधकांची पहिली बैठक त्यांनी बिहारमधील पाटणा येथे आयोजित केली होती. त्यातूनच विरोधकांची आघाडी असलेली ‘इंडिया’ अस्तित्वात आली, पण याची सूत्रे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने हाती घेतली आणि आघाडीत धुसफूस सुरू झाली. प्रमुख नेत्यांच्या नावाची चर्चा रंगली, पण त्यात नितीश कुमार यांचे नाव मागे पडले. आपल्याला पंतप्रधानपदाची इच्छा नाही, असे कितीही ते म्हणत असले तरी, अशा सुप्त इच्छा लुप्त होत नाहीत, हेच वास्तव आहे. ज्यांच्या राजकारणाचा परीघ एखाद्या राज्यापुरताच आहे, असे कैक नेते मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगून आहेत. नितीश कुमार तर मोठे राजकारणी आहेत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. इंडियामध्येदेखील ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकावा, असे कोण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालला नसता आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत लागली असती, तर याच विरोधकांच्या आघाडीतील अनेक पक्षांनी पुढे येत समर्थन दिले असते. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये यातील अनेक पक्ष सहभागी झाले होते, हे कसे विसरता येईल? हे पक्ष त्यावेळी काँग्रेसविरोधात भाजप आघाडीत होते आणि आता भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत आहेत.

- Advertisement -

विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही झाला, पण प्रत्यक्षात निवडणुकांच्या वेळी काहीच झाले नाही. 2024 च्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एक पाऊल पुढे टाकत आघाडी तरी स्थापन केली आहे, पण पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबमध्ये या आघाडीला सुरूंग लागला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर ल़ढण्याचा मनसुबा जाहीर केला आहे, तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीनेदेखील दिल्ली आणि हरयाणात एकट्यानेच निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यात काँग्रेसची खुमखुमीदेखील अद्याप कमी झालेली नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इंडियाचा प्रयोग करून बघायला हरकत नव्हती. ती एक लिटमस टेस्ट ठरली असती, पण यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. तर मध्य प्रदेशातील निवडणुकीत इंडियातील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीशी युती करण्याचे काँग्रेसने झिडकारले. परिणामी तेलंगणाचा अपवाद वगळता इतर तीन राज्यांमध्ये भाजपचे कमळ फुलले. एकूणच, या आघाडीत सहभागी असलेल्या प्रत्येक पक्षाचा आपापला अजेंडा आहे आणि त्यानुसारच ते चालतात. वाजपेयी यांच्या कारकीर्दीत हेच झाले होते आणि इंडियाच्या बाबतीतही हेच होणार आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मात्र तशी स्थिती नाही. भाजपने, विशेषत: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. त्यामुळेच आपल्या अजेंड्याबद्दल आग्रही असणारे बडे पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. हेच अटल बिहारी वाजपेयी यांना जमले नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. भाजपचीही ध्येय-धोरणे बदलत चालली आहेत, एकेकाळी ‘शतप्रतिशत भाजप’ अशी घोषणा देण्यात आली होती. भाजपने त्यात बदल केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी, ‘भाजप आणि फक्त भाजप’ असा नवा नारा या पक्षाचा झाला आहे, हेच अलीकडच्या काळातील घडामोडींवरून दिसते. एखाद्या राज्यात भाजपव्यतिरिक्त दुसर्‍या पक्षाला बहुमत मिळाले तरी, कालांतराने भाजपचाच बडा नेता त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसतो. एखाद्या निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तरी, सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच स्थापन होते, हेच आता आपण सर्व पाहात आहोत. 2017 मधील गोवा आणि मणिपूरमधील निवडणूक असो की, 2018ची मध्य प्रदेश निवडणूक. हेच चित्र पहायला मिळाले. यासाठी साम वगळता, दाम, दंड, भेद यांचा मुक्तपणे वापर सुरू आहे.

- Advertisement -

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटले आहे की, ‘रामायण म्हणजे, आदर्शवाद. तिथे मस्तक मनापासून किंवा नाटकीपणाने झुकवले की संपले. सगळ्या देशाची स्वातंत्र्यानंतर लंका झाली असली तरी, पांढर्‍या टोपीने ‘रामराज्य’ डिक्लेअर केले की काम झाले. प्रभू श्रीरामचंद्रांनी बालवयात जसा ‘चंद्र हवा’ म्हणून हट्ट धरला होता, त्याप्रमाणे रामायण चंद्रासारखे शीतल आहे. आदर्श प्रत्यक्ष आचरणात आणायचे नसले की, शीतलच असतात…‘तत्त्व, निष्ठा, चरित्र आणि आदर्श’ यांचा वारंवार उदोउदो करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष अंमलात आणण्याची पात्रता किती राजकारण्यांत आहे? पित्याच्या शब्दाखातर राज्यकारभार सोडून वनवास पत्करणारा राम कुठे आणि सत्ता व पैसा यासाठी आपल्याच पक्षाला, निष्ठेला दूर सारणारा राजकारणी कुठे? एका धोब्याने संशय घेतल्यावर सीतेला रामाने पुन्हा वनवासात पाठविले होते, पण आता आपल्याविरोधात एखादी टिप्पणी करण्यात आली, तर संबंधित व्यक्तीला भररस्त्यात किंवा आपल्या निवासस्थानी नेऊन मारहाण केली जाते. त्या व्यक्तीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले जातात. सर्वसामान्यांनी जगायचे ते त्या तीन माकडांप्रमाणेच, काही पहायचे नाही, काही बोलायचे नाही अन् काही ऐकायचे नाही…’

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जयजयकार करणार्‍या राजकारण्यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियाएवढे प्रभावी माध्यम असल्याने त्यांची अनेक ‘कृष्णकृत्ये’ लगेच लोकांसमोर येतात. शिक्षणाशी ज्याचा फारसा संबंध आलेला नाही, तो एखाद्या प्राचार्याच्या अंगावर बेधडकपणे हात उचलतो. एखाद्या रुग्णालयाच्या अधिष्ठात्याला प्रसाधनगृह साफ करायला लावतो. एखाद्या विजयी मिरवणुकीत कसलीही चाड न बाळगता आक्षेपार्ह कृत्य केले जाते. आधीच पूर्वीप्रमाणे पोलिसांचा धाक आता कोणालाही उरलेला नसताना, एका कार्यक्रमात जाहीरपणे एका आमदाराकडून थेट पोलीस कॉन्स्टेबलच्या श्रीमुखात लगावली जाते.
एवढ्यावरच हे राजकारणी थांबलेले नाहीत, तर कायद्याच्या रक्षकांसमोरच दुसर्‍या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. यावर उतारा म्हणून केवळ एसआयटी अर्थात विशेष तपास पथक, आयोग, समित्या स्थापन केले जातात; हा केवळ फार्स असून यातून काहीच उघड होणार नाही, याची कल्पना सर्वांनाच आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की, कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत, ही आकडेवारी समोर येईलच.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, श्रमिक, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांपेक्षा दुसर्‍या पक्षातील नेत्याला आपल्याकडे वळविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली जात आहे. कारण गरिबांबद्दलची कणव, स्त्रीदाक्षिण्य, विद्येबद्दल आदर, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार हा कवडीमोलाचा झाला आहे. जनतेच्या या प्रश्नांच्याच आगीवर पुढेही राजकारण्यांची पोळी भाजली जाणार आहे. त्यामुळे मूळ परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ प्रभू श्रीरामाचा जयजयकार नको, तर त्याबरोबर जागरुकताही आवश्यक आहे. येणार्‍या निवडणुका म्हणजे एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -