घर संपादकीय ओपेड राज ठाकरे फिनिक्स भरारी घेणार..?

राज ठाकरे फिनिक्स भरारी घेणार..?

Subscribe

कोकणी माणूस हा शिवसेनेवर त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अतोनात प्रेम करायचा. त्याचप्रमाणे कोकणी माणसाचे हे प्रेम जर राज ठाकरे मिळवू शकले, तर त्यांचा डळमळीत असलेला राजकीय पाया आगामी काळात अधिक भक्कम होऊ शकेल. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विभागलेल्या शिवसेनेचा फायदा राज ठाकरे यांना मिळू शकतो. त्यातूनच त्यांना फिनिक्स भरारी घेत येऊ शकते. शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा मार्ग कोकणातून जातो हे लक्षात घेतले पाहिजे.

महाराष्ट्रात रविवारी जो काही जाहीर सभांचा धुरळा उडाला आहे, तो पाहता आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेल्या कथित बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. भाजपसारख्या प्रस्थापित आणि केंद्रामध्ये तब्बल दहा वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रीय पक्षासाठीदेखील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांसाठीदेखील आगामी निवडणुका या दिसतात तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीत.

अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण संवाद यात्रा सुरू करून कोकणी माणसाला साद घातली आहे. तब्बल पन्नास पंचावन्न वर्षे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज ज्येष्ठ अनुभवी नेत्यासमोरही अस्तित्व राखण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर मराठी माणसांची हुकमी व्होट बँक असलेली शिवसेना यंदा प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभागली गेली आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी निवडणुकांमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी कोकण संवाद यात्रा काढून त्यांचे पहिले लक्ष कोकणी माणूस असल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी कोकणची निवड करण्यामागे विशिष्ट राजकीय कारण आहे. आजवर कोकणी माणूस आणि शिवसेना एक अभेद्य समीकरण म्हणून ओळखले गेले. शिवसेनेत त्यांना राजकीय नेतृत्व करण्याची संधी मिळते मग ते नगरसेवक असतील आमदार असतील या सर्वांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा वाटा आहे. साध्या मुंबई महापालिकेचे उदाहरण द्यायचे झाल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन कोकणातील जिल्ह्यातूनच ६५ च्या आसपास नगरसेवक जिल्ह्यातून शिवसेनेला मिळालेले आहेत. त्यामुळे राजकीय कारकीर्द घडवायची असेल, तर त्याचे मूळ कोकणाशी निगडित असणे हे गरजेचे असल्याचे आजवरच्या शिवसेनेच्या वाटचालीवरून स्पष्ट होते. आमदार आणि खासदार याबाबतही शिवसेनेला कोकणातील भूमीने बरेच तारले आहे.

त्यामुळे सध्याची दुभंगलेल्या शिवसेनेची जर अवस्था लक्षात घेतली, तर कोकणी मतदारांचा विश्वास प्राप्त केला तर कोकणातील तीनही जिल्ह्यांमधून मनसेला तसेच राज ठाकरे यांना भरभक्कम पाठबळ मिळू शकते, असा राज ठाकरे यांना विश्वास असावा आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा हायवेच्या प्रश्नावरून राळ उडवण्यास सुरुवात केली आहे. याकरिता त्यांनी वेळ साधली आहे तीदेखील गणपती उत्सवाच्या आधीची. कारण गणपती उत्सव हा कोकणातील जनतेसाठी जगण्या-मरण्याच्या प्रश्नापेक्षाही मोठा असतो. कोकणी माणूस हा प्रेमळ आहे, कडवट निष्ठावंत आहे आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचे पाठबळ जर मनसेसारख्या आणि विशेषतः राज ठाकरे यांच्यासारख्या स्वतःचा करिष्मा असलेल्या नेतृत्वाला आगामी निवडणुकांमध्ये मिळू शकले, तर राज ठाकरे आणि मनसे राज्याच्या राजकारणात बरीच उलथा पालथ घडवू शकतात.

- Advertisement -

कोकणी माणूस हा जसा शिवसेनेवर त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अतोनात प्रेम करतो. त्याचप्रमाणे कोकणी माणसाचे हे प्रेम जर राज ठाकरे मिळवू शकले, तर त्यांचा डळमळीत असलेला राजकीय पाया आगामी काळात अधिक भक्कम होऊ शकेल. त्यामुळे शिवसेना मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असो की उद्धव ठाकरे यांची असो या दोघांनीही राज ठाकरे यांच्या या कोकण संवाद यात्रेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा मार्ग कोकणातून जातो हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी १९९५ साली जेव्हा महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना आणि भाजप युतीची राज्यात सत्ता आली तेव्हादेखील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मूळचे रायगड जिल्ह्यातील नांदवी येथील मनोहर जोशी यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री केले. त्यानंतरदेखील जेव्हा मनोहर जोशींना बदलून दुसरा मुख्यमंत्री देण्याची वेळ शिवसेनाप्रमुखांवर आली त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारायण राणे या अस्सल कोकणी नेत्याचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली. यावरून शिवसेना आणि कोकण यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे स्पष्ट होते.

बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आणि त्यानंतरही अगदी आत्ता आत्ता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करेपर्यंत कोकणी माणसाची नाळ ही मूळ एकसंध शिवसेनेशी जुळलेली होती, पण आता मात्र सर्वच राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार, खासदार आणि नगरसेवक पदाधिकारी हे मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. काही यापुढे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय शक्ती ही मोठ्या प्रमाणावर क्षीण झाली आहे. एकीकडे निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असताना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो मूळ पाया आहे तो कडवट निष्ठावंत शिवसैनिकांचा आणि त्यातही कोकणातील कार्यकर्त्यांचा अधिक आहे.

राज ठाकरे यांची स्वतःची अशी एक विशिष्ट शैली आहे. बाळासाहेबांप्रमाणेच जहाल आणि आक्रमक ठाकरी भाषणशैली ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे, पण याचसोबत राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण त्यांच्या करिष्म्यामुळे माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात, त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. असे असूनही आपल्याकडे आलेली माणसे आपल्यासोबत का टिकत नाहीत, ती का सोडून जातात. गर्दी करणारे आपल्याला मते का देत नाहीत, आपले भाषण हे केवळ फुलटू मनोरंजन आहे का, याचा विचार राज ठाकरे यांनी करायला हवा. तरच पुढील मार्ग सुकर होईल.

कोकणातील खेड या नगर परिषदेवर मनसेचा सर्वप्रथम झेंडा याआधी फडकलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाची भुरळ जर कोकणी मतदारांवर पडली, तर कोकणातून मनसेला बर्‍यापैकी यश मिळेल. तसेच राज ठाकरे यांचा काहीसा कमकुवत असलेला राजकीय पाया कोकणामुळे भक्कम होऊ शकेल आणि याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्यांनी सर्वप्रथम कोकणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जर राजकीय दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास शिंदे सरस आहेत. कारण त्यांनी राजकीय नैपुण्य वापरत उद्धव ठाकरे यांच्याकडील मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही शिवसेनेची परंपरागत यशस्वी निशाणी स्वत:कडे मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. राज ठाकरे यांचादेखील हेतू शिवसेनेप्रमाणे राजकीय पक्ष बांधणी करणे हाच होता.

२००९ मध्ये विधानसभेच्या एकाच वेळी तब्बल मनसेचे १३ आमदार निवडून आणून राज ठाकरे यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण त्यावेळेस सिद्ध केले होते, मात्र त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या पदरी निराशा आली. २०१९ मध्ये तर मनसेचा अवघा एकमेव आमदार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येऊ शकला. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळते, मात्र ही गर्दी मतदानात परावर्तित होत नाही, असे आजवर निदर्शनास आलेले आहे. मात्र आताची आणि या पुढची राजकीय परिस्थिती आणि यापूर्वीची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि मनसेच्या माध्यमातून स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात होते आणि त्यांच्या निधनानंतरदेखील मूळ एकसंध शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडे होती, मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आमदार, खासदार, नगरसेवकांच्या रूपाने का होईना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात आहेत.

त्यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर कोकणातील मतदारांसमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कौल द्यायचा की राज ठाकरे यांच्या मनसेला आपलेसे करायचे असा प्रश्न उभा ठाकला आणि जर कोकणी मतदारांनी राज ठाकरे यांची निवड केली, तर मात्र उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व खिळखिळे होण्याची भीती आहे. राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे पाठीमागून वार करणारे नाहीत. त्यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर समोरून चाल करून आले आहेत एवढाच याचा मतितार्थ आहे. अर्थात ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गगन भरारी घेणार का, हे आगामी निवडणुका आणि कोकणातील मतदारच ठरवणार आहेत.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -