शिवसेना कधीही संपत नसते…

शिवसेनेची स्थापन होऊन छपन्न वर्षे झाली. इतक्या वर्षांमध्ये शिवसेनेने अनेक चढउतार पाहिलेत, शिवसेना संपल्याची, संपवल्याची चर्चा केली जात आहे. मात्र शिवसेना संपत नसते, संपणार नाही, हे दस्तुरखुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. शिवसेना हा भूमीपुत्रांचा आवाज आहे. आज सर्वोच्च न्यायालयात खरे शिवसैनिक कोण? हा निकाल लागणार आहे. हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला किंवा शिवसेनेच्या विरोधातही गेला तरीही दोन्ही बाजूकडून त्याचा शिवसेनेलाच फायदा होणार आहे. जात धर्माच्या प्रश्नापेक्षा भाकरी आणि नोकरीचा प्रश्न मोठा आहे. हा बदल जाणणारा नव्या पिढीचा शिवसैनिक नव्या पिढीच्या शिवसेनेत आहे, तोपर्यंत शिवसेना संपणारी नाही.

शिवसेना संपणार नाही, त्याची कारणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या केलेल्या संगोपनात आहेत. शिवसेनेत वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण, असे जरी म्हटले जात असले तरी त्याची विभागणी ही सरसकट नाही. शिवसेनेत 20 टक्के समाजकारण हा वरच्या ऐशी टक्के सत्तेचे मजले उभारलेल्या राजकारणाचा पाया आहे. हा पाया कमकुवत नाही, सत्तेची इमारत दर पाच वर्षांनी कोसळते, त्याआधी अविश्वासदर्शक ठराव, बहुमतांची गणिते यामुळेही या इमारतीला हादरे बसतात, शिवसेनेलाही याआधी अनेकदा असे हादरे बसलेले आहेत. मात्र तरीही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात शिवसेनेला पर्याय नसल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आधीचा काळ महाराष्ट्रात आणि मुख्यतः मुंबईत कामगार चळवळींचा असल्याचा इतिहास आहे.

साठ आणि सत्तरच्या दशकातील शिवसैनिकांची तिसरी पिढीही आज राजकारणात आहे. राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करायला हवा. शिवसेनेतून पुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात दाखल होऊन तसेच अपक्ष म्हणूनही आपली राजकीय कारकिर्द घडवणार्‍या अनेक नेत्यांनी राजकारणाची बाराखडी शिवसेनेतच गिरवली आहे. राज्याच्या राजकारणासाठी येथील समाजकारणाच्या मनाचा ठाव घेत त्याचा संघटनेसाठी पाया रचण्याचे कौशल्य बाळासाहेबांइतके कोणाला जमलेले नाही. याचे कारण बाळासाहेबांना येथील समाजव्यवस्थेची असलेली जाण यातच आहे. आज बाळासाहेब देहाने जरी नसले तरी त्यांनी शिवसेनेची केलेली अशी पायाभूत रचनाच ही संघटना भविष्यात कायम ठेवण्यासाठी पुरेशी आहे.

शिवसेना कायम दोन स्तरांवर काम करत आलेली आहे. यातील एक भाग सामाजिक स्तरावरील शिवसेना आणि दुसरा राजकीय पटलावरील शिवसेना असा आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या जडण घडणीत या दोन्हीमध्ये गल्लत होणार नाही, याची नेहमीच कायम काळजी घेतलेली आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावरील शिवसेनेची मीमांसा त्यामुळेच वेगवेगळी आहे. शिवसेना नावाच्या इमारतीच्या मजबूत पायामध्ये मुंबई आणि राज्यातील गल्लीबोळात उभारलेल्या सामान्य शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शाखेचे दगड रोवलेले आहेत. त्यामुळेच शिवसेनेची ही इमारत सत्तेच्या पटलावर उभी राहिल्यावरही शिवसेनेने अनेक धक्के पचवले आहेत.

प्रतिशिवसेना स्थापन करण्याचे प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. मात्र त्यात यश आलेले नाही. शिवसेनेत शिवसेनाप्रमुखांचा आदेश प्रमाण मानला जात असे. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्ष प्रमुखांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. याची पाळेमुळे शिवसेनेच्या जडणघडणीतच आहेत. शिवसेनाप्रमुख ही एक संज्ञा असल्याचे बाळासाहेबांच्या निधनानंतर स्पष्ट करण्यात आले होते. बाळासाहेबांनंतर शिवसेनाप्रमुख ही संंज्ञा संपुष्टात आली. त्यानंतर कुणीही शिवसेनाप्रमुख झालेले नाही, मात्र शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी सूत्रे हाती घेतली. हा फरक केवळ शाब्दिक नव्हता, बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घोषित केले नाही. यामागे त्यांचा दूरगामी विचार होताच.

बाळासाहेबांचा देशाच्या राजकारणात असलेला दबदबा, त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणातील करिष्मा आणि वक्तृत्व, तसेच तंतोतंत जुळणारे नेतृत्वगुण आपल्यात नसल्याचं उद्धव ठाकरेंना ठाऊक होतंच, त्यांनी याबाबत स्वतःची ‘इतरांसारखी’ कधीही फसवणूक केली नाही. त्यांना आपल्या मर्यादा आणि बलस्थाने पक्की माहीत होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आक्रमक वक्तृत्ववादी राजकारणाची रि ओढण्याचे टाळून त्याला वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. समकाळात माहिती, तंत्रज्ञान, जागतिकीकरणाच्या टाळता न येणार्‍या परिणामांमुळे देशाच्या महाराष्ट्राच्या समाजकारणासोबतच राजकारणही बदलत जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी भावनिक राजकारणाला काहीचे बाजूला सारून, (टाळले म्हणता येणार नाही), प्रत्यक्ष कृतीशील राजकारणावर भर दिला.

कोविड 19 च्या संकटाच्या आगडोंब उसळलेल्या निखार्‍यात शिवसेना नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडीला हे संकट म्हणजे जनतेच्या मनात शिरण्याची ही संधी मिळाली. या संधीचं सोनं उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्र कोविड संकटातील या दोघांच्या कामाची दखल इतिहासाने सुवर्णाक्षरात नोंदवून घेतलेली आहेच. जातीय दंगली, पाऊस पूर, आगडोंब, साथीचे आजार, दहशतवादी हल्ले या संकटकाळात सामान्य शिवसैनिकांनी मुंबईच्या गल्लीबोळात सामान्य नागरिकांसाठी केलेली मदत ही शिवसेनेची जमेची बाजू राहिलेली आहे. शिवसेनेची गल्लीबोळातली शाखा…न्याय मागण्याचं हक्काची जागा असल्याचे शिवसेनेच्या समाजकारणाने याआधीही अनेकदा कृतीतून स्पष्ट केलं आहे. ‘नवरा दारू पिऊन मारझोड करतो, घरी पगार पैसा देत नाही’ पासून ते अगदी मोठमोठ्या बांधकाम व्यावसायातील वितुष्टाची प्रकरणे शिवसेनेच्या शाखेत सोडवली गेल्याचा अनुभव सामान्य माणसांनी अनेकदा घेतलेला आहे. यातील शिवसेनेने आर्थिक तडजोडी केल्याचे आरोपही नवे नाहीत, मात्र हे केवळ राजकीय आरोप असल्याचे स्पष्ट करण्यात आणि शिवसेनेची ‘सामान्य नागरिकांची शिवसेना’ हा विश्वास कायम ठेवण्यात सातत्याने शिवसेनेला मिळाले आहे, हा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आजही कायम ठेवला आहे.

सामान्य माणसांना शिवसेनेने मोठं केलं की, सामान्य माणसांनी शिवसेनेला मोठं केलं, हा प्रश्न सत्तेच्या राजकारणाच्या मुळाशी आहे. याचं उत्तर दोन्ही बाजूने देता येईल. शिवसेनेत सामान्य मराठी माणसं दाखल झाली तीच मुळात बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व, लेखन, व्यंगचित्र, वक्तृत्वाने प्रभावित होऊन, हा प्रभाव आजही कायम आहे. आज त्याला उद्धव ठाकरे यांनी कृतीशील राजकारणाची परिस्थितीनुरूप जोड दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकारण संयमी आहे. बाळासाहेबांइतके आक्रमक नसले तरी धोरणात्मक असल्याचे मागील अडीच वर्षात राज्यातल्या जनतेने पाहिलेले आहे.

राज्याच्या मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला जनतेने बहुमताचा कौल दिला होता. भाजपकडे शंभरच्या पुढे स्पष्ट बहुमत असताना शिवसेनेने भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी बनवून सत्ता मिळवली. त्यावेळी जनमानसात शिवसेना, काँग्रेस विरोधात वातावरण होते, शिवसेना, राष्ट्रवादीने केलेली राजकीय नैतिकता डावलणारी सत्तेची पहाटेची खेळी म्हणून भाजपाच्या बाजूने सहानुभूतीही मिळाली होती. त्या बदल्यात भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणूनच लोकांना गैर वाटत नव्हते, तो भाजपाचा हक्कही होताच, मात्र खरा वाद होता तो सत्तेपर्यंत नेणार्‍या हिंदुत्वावरील हक्काचा…? हा हक्क कुणाचा? शिवसेनेचा की भाजपचा हा कळीचा मुद्दा होता. या वादात भाजपाने शिवसेनेवरील हिंदुत्वाच्या हक्काविरोधात रान पेटवले असते तरी ते सत्तेचे राजकारण म्हणून समजून घेता आले असते.

राष्ट्रवादी, काँग्रेसमधील आमदार आपल्याकडे वळवले असले तरी भाजपाच्या हेतूबाबत शंका घेता आली नसती. मात्र देशाला हिंदुत्वाचा मार्ग दाखवणार्‍या शिवसेनेला संपवण्याची खेळी सत्ताधार्‍यांनी खेळल्याने भाजपसोबत असलेली हिंदुत्वाची सहानुभूती आता शिवसेनेच्या मातोश्रीवर दाखल झाली आहे. जर आज सर्वोच्च न्यायालयात भाजपाच्या बाजूने पक्षाचा व्हीप डावलून ‘प्रतिनिधीक बहुमताचा’ निकाल लागला तरी हा निकाल भाजपासाठी अडीच वर्षानंतर डोकेदुखी ठरू शकतो. कारण आमदार किंवा लोकप्रतिनिधींच्या सत्तेच्या आकड्यावर जरी महाराष्ट्राच्या राजकारणाने नियंत्रण मिळवले असले तरी शिवसेनेच्या सामान्य शिवसैनिकांवर भाजपच्या सत्तेचे नियंत्रण नाही, हीच खरी शिवसेना आहे.

काळाच्या ओघात जनमानस कमालीचे बदललेले आहे. कट्टरतेपेक्षा विवेकशील राजकारणाची मांडणी येत्या काळात गरजेची आहे. हे उद्धव ठाकरेंनी ओळखले आहे. आज धर्म, सांप्रदायाचे आणि गटवादी राजकारणाचे ते परिणाम साध्य होऊ शकत नाहीत जे चार दशकांपूर्वी साध्य केले जाऊ शकत होते, हे शिवसेनेच्या नेतृत्वाने ओळखले आहे. एका गटाला दुसर्‍या गटाविरोधात दशकानुदशके उभे केले जाऊ शकत नाही, हे ओळखणारे उद्धव ठाकरे हे समंजस राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर उदयास येत आहेत. त्यांची पुढील पिढी आदित्य ठाकरे यांनीही, तणाव, भीती आणि फुटीरतावादी राजकारणापेक्षा काळानुसार बदलणार्‍या कृतीशील राजकारणावर भर दिला ही बदलणारी परिपक्व समज वैशिष्टपूर्ण आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने इतिहासात घेतलेल्या कम्युनिस्ट, दलितविरोधी, धर्मनिरपेक्षवाद्यांविरोधातील राजकीय भूमिकांमुळे धार्मिक आणि वैचारिक मुद्यांवर अनेकांचे मतभेद होते. या मतभेदातून मुंबई आणि राज्यांच्या रस्त्यांवर रस्तही सांडले आहे. शिवसेनेने विरोधकांचे सांडलेले रक्त माफ करता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले आजही मांडत आहेत. मात्र असे असले तरीही महाराष्ट्रात शिवसेना असायला हवी, ही भूमिकाही शिवसेनेच्या विरोधकांनी आजच्या राजकारणात मांडलेली आहे. समाजमाध्यमांवर त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजपच्या सांप्रदायिक राजकारणापेक्षा शिवसेनेच्या धार्मिकतेवर वाढलेला विरोधकांचा विश्वास हा बदलत्या काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे.

शिवसेना सेक्युलर झाली किंवा नाही? शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले आहे किंवा नाही? या प्रश्नांपेक्षा शिवसेना जात धर्म न पाहता सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ठेवून आहे किंवा नाही, हा प्रश्न बदललेल्या राजकारणाच्या मुळाशी आहे. ही क्षमता सोडवण्याची क्षमता शिवसेनेत असल्याचा विश्वास वैचारिक मुद्यांवरील विरोधकांचाही असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना असायलाच हवी, असा विचार समोर येऊ पाहत आहे. संयमी हिंदुत्वासोबतच प्रबोधनकार ठाकरेंचे विवेकवादी विचार असलेली शिवसेना महाराष्ट्राला आणि विवेकाने विचार करणार्‍या हिंदुत्वालाही हवी आहे. लोकशाहीत संभ्रम असायलाच हवा, संपूर्ण पक्षाला ताब्यात घेण्याचा धोका हा कुठल्याही राजकीय सत्तेपेक्षा लोकशाहीला मारक ठरतो, हे स्पष्ट व्हावे.

शिवसेनेने सत्तर ऐंशीच्या दशकात जे सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपले समाजकारण केले. त्यातील बहुतांशी मुद्दे आज 2022 मध्ये काळाच्या ओघात निकालात निघालेले आहेत, बाबरी प्रश्न आज निकालात निघाला आहे. मराठी माणसांचा मुद्यांवर दोन अडीच दशकांआधीइतके भावनिक राजकारण आज करता येणार नाही, हे शिवसेनेच्या नेतृत्वाने ओळखले आहे. माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आले असताना भावनिक राजकारणाच्या पलिकडे विचार होत असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या नव्या शिवसैनिकांच्या हे ध्यानात आलेले आहे. जात धर्माच्या प्रश्नापेक्षा भाकरी आणि नोकरीचा प्रश्न मोठा आहे. हा बदल जाणणारा नव्या पिढीचा शिवसैनिक नव्या पिढीच्या शिवसेनेत आहे, तोपर्यंत शिवसेना संपणारी नाही.