घर संपादकीय ओपेड भाजपमध्ये नाही कुणाला कुणाचा मेळ...!

भाजपमध्ये नाही कुणाला कुणाचा मेळ…!

Subscribe

आजवर महाराष्ट्र भाजपमधील कोणत्याही पक्षांतर्गत वादावर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करायचे आणि नेत्यांमधील भांडणाचा फटका पक्षाला बसणार नाही याची काळजी घ्यायचे. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील भाजपची परिस्थिती लक्षात घेता भाजपच्या ठाण्यातील नेत्यांमध्ये कोणाचाही कुणाला ताळमेळ नसल्याचे दिसून येते. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांवर पक्षश्रेष्ठींचा वचक आहे की नाही, असाच प्रश्न कोणाच्याही मनात उभा राहावा अशी स्थिती आहे.

राज्याच्या इतिहासात ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपामधील राजकीय घडामोडींना पूर्वीपासूनच महत्त्व आहे. १९९६ साली सर्वप्रथम ठाणे लोकसभा मतदारसंघ जो भाजपच्या प्राध्यापक रामभाऊ कापसे यांच्याकडे परंपरागतरित्या होता तो शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून शिवसेनेकडे घेतला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील राजकीय कुरघोड्या आरोप प्रत्यारोप हे नेहमीच चर्चेचे मुद्दे राहिले. आता तर गेल्या दीड वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेचे ठाणेकर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात तसेच जवळच्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेचा वाढलेला आवाज हा भाजपला भारी पडू लागला आहे.

मात्र केवळ भाजपा आणि शिवसेना यांच्यातच सत्तेची जोरदार रस्सीखेच आहे अशातला भाग नसून भाजप नेत्यांमधील अंतर्गत यांनी ठाणे जिल्ह्यातील भाजपा हा अक्षरशः खिळखिळा झाला आहे असे म्हटल्यास कोणाला नवल वाटू नये. ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे ठाणे, कल्याण, भिवंडी असे तीन मतदारसंघ आहेत तर विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. राजकीय बलाबल जर पाहायचे झाले तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे खासदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजन विचारे खासदार आहेत तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील हे खासदार व केंद्रात मंत्री आहेत.

- Advertisement -

ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, संजय केळकर अशा नेत्यांनी ठाण्यात भाजपची बलस्थाने भक्कम केली. १९९५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकहाती वर्चस्व होते, मात्र मराठी भूमिपुत्रांच्या भक्कम पाठबळामुळे भाजपची ही घडी विस्कटली आणि ठाणे जिल्ह्याचा ताबा हा हळूहळू भाजपकडून शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडे मध्यंतरीच्या काळात गेला. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या या वर्चस्वाला सर्वप्रथम जर कोणी आव्हान दिले तर ते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी दिले होते.

त्यावेळी भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांच्या हाती महाराष्ट्र भाजपची सूत्रे होती. शिवसेनेच्या तळागाळात पसरलेल्या संघटनेच्या पाठबळावर भाजपला महाराष्ट्रात सर्वदूर पसरायचे होते आणि त्यामुळेच एक वेळ ठाणे शिवसेनेकडे गेले तरी चालेल मात्र अन्य मतदारसंघांमधून ठाण्यातून होणारी तूट ही दुप्पट तिप्पट पद्धतीने भरून काढता येईल या उद्देशाने प्रमोद महाजन तसेच गोपीनाथ मुंडे यांनी १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेचे भाजपचे तत्कालीन खासदार रामभाऊ कापसे यांच्याकडील हा मतदारसंघ आनंद दिघे यांच्या हट्टाखातर शिवसेनेला बहाल केला.

- Advertisement -

आता तर शिवसेना-भाजपमधील या कुरघोड्यांनी पुढचे पाऊल गाठले असून पक्षांतर्गत सत्ता स्पर्धेने ठाणे जिल्ह्यातील भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे भिवंडीचे खासदार व केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या उघड संघर्ष सुरू आहे. किसन कथोरे मुरबाडमधून पुन्हा कसे निवडून येणार नाहीत यासाठी कपिल पाटील प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे कपिल पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भिवंडीतून निवडून जाऊ नयेत यासाठी किसन कथोरे यांनी त्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत.

मुळात खासदार कपिल पाटील असो की आमदार किसन कथोरे असो यांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या विजयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा फार मोठा प्रभाव आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती होती आणि त्यामुळे शिवसेनेची परंपरागत मते ही या दोन्ही भाजपच्या उमेदवारांना पडलेली होती. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर खासदार कपिल पाटील यांच्याविषयी लोकसभा मतदारसंघांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतच फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती, तथापि शिवसेनेचे तत्कालीन जेष्ठ नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कपिल पाटील यांच्या विजयासाठी पूर्ण शक्ती पणाला लावल्यामुळे त्यांच्याबाबत असलेली नाराजी ही काही प्रमाणात मागे पडली आणि कपिल पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.

आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, कपिल पाटील यांच्याबाबत मतदारसंघांमध्ये पूर्वीप्रमाणेच फारशी अनुकूल स्थिती नाही. त्यातच पूर्वीची एकसंध शिवसेना आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे पाठबळ जरी असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहानुभूती यावेळी कपिल पाटील यांना मिळणार नाही, त्यामुळे या मतविभागणीचा फटकादेखील कपिल पाटील यांना काही प्रमाणात निश्चितच बसणार आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रतिकूल परिस्थितीत जर कपिल पाटील यांनी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची नाराजी अंगावर ओढवून घेतली तर त्यातून कथोरे यांच्यापेक्षा कपिल पाटील यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.

दुसरीकडे मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे यांची विकासकामे जरी मोठ्या प्रमाणावर झालेली असली तरीदेखील गेल्या दीड वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर म्हणजेच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आल्यानंतर मुरबाडच्या विकास कामांना काहीसा ब्रेक लागला आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यातच कपिल पाटील यांनी मुरबाडमधील किसन कथोरे यांच्या समर्थकांना स्वत:कडे ओढून घेतल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमधूनच कथोरे यांना कसे आव्हान उभे केले जाईल याची काळजी कपिल पाटील घेत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भांडणांमध्ये ठाणे जिल्ह्यातील भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता पूर्णपणे हिरमुसून गेला आहे. आजवर महाराष्ट्र भाजपमधील कोणत्याही पक्षांतर्गत वादावर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करायचे आणि नेत्यांमधील भांडणाचा फटका पक्षाला बसणार नाही याची काळजी घ्यायचे.

आता मात्र ठाणे जिल्ह्यातील भाजपची परिस्थिती लक्षात घेता भाजपच्या ठाण्यातील नेत्यांमध्ये कोणाचाही कुणाला ताळमेळ नसल्याचे दिसून येते. अगदी गेल्याच आठवड्यात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रखडलेल्या वाडा भिवंडी रस्त्याच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे ज्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर कपिल पाटील यांनी भ्रष्टाचाराचे टक्केवारीचे आरोप केले ते खाते भाजपचे डोंबिवलीतील आमदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. स्वतःच्या जिल्ह्यातील भाजपच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यावर जेव्हा केंद्रातील मंत्री परखड भाष्य करतो तेव्हा त्याची निश्चितच गांभीर्याने नोंद घेण्याची गरज असते. मात्र महाराष्ट्र भाजपचा सध्याचा कारभार बघितला तर ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांवर पक्षश्रेष्ठींचा वचक आहे की नाही असाच प्रश्न कोणाच्याही मनात उभा रहावा अशी स्थिती आहे.

ठाणे शहरातील भाजपचे एकमेव आमदार संजय केळकर हे ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात सातत्याने एकमुखी लढाई लढत आहेत. अगदी आजच्या मराठा समाजाने पुकारलेल्या ठाणे बंदलाही आमदार संजय केळकर यांनी पाठिंबा दिलेला आहे. जो बंद राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेला होता त्या बंदला ठाण्यातील भाजपचे आमदार पाठिंबा देतात यावरूनही भाजपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत काय भावना आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या गुहावटीच्या काळात त्यांच्याबरोबर बसमध्ये बाजूच्या आसनावर दिसल्यापासून रवींद्र चव्हाण यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा शिक्का भाजपमध्ये लागलेला आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाजपने कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरीदेखील रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीतून पुन्हा जर निवडून यायचे असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळाशिवाय निवडून येणे शक्य नाही.

त्यामुळेच रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांसमवेत अगदी ते शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्यापासून सातत्याने जुळवून घेत आलेले आहेत. नेत्यांच्या या कुरघोड्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते मात्र त्रस्त झाले आहेत. भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी जर ठाणे जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणले नाही तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून गेल्यात जमा आहे एवढे जरी वरिष्ठ नेतृत्वाने लक्षात घेतले तरी खूप झाले असेच म्हणावे लागेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -