घरसंपादकीयओपेडकौन बनेगा मुख्यमंत्री...?

कौन बनेगा मुख्यमंत्री…?

Subscribe

देशभरातील भारतीय मतदारांवर आजही असलेला नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रभाव आणि महाराष्ट्रातील ही परिस्थिती लक्षात घेतली तर भाजप पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे यांची सत्ता आली तर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालतील हे आता तरी म्हणणे खूप धाडसाचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आगामी निवडणुकांमध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा पुढे निघून गेली, तर २०२४ नंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहण्याची शक्यता अधिक आहे.

देशातील राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले आणि या चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये भाजपने नरेंद्र मोदी या पंचाक्षरी मंत्राच्या करिश्मावर पुन्हा एकदा एकहाती काबीज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची भारतीय मतदारांना पडलेली भुरळ आता उतरू लागल्याचा जो प्रचार भाजप विरोधकांकडून केला जात होता त्याला या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय मतदारांनी सणसणीत चपराक लगावली आहे, असेच म्हणावे लागेल.

त्यामुळे सहाजिकच भारतीय मतदारांवर अद्यापही नरेंद्र मोदी या नावाची जादुई कांडी प्रभाव घालत आहे हेच या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट झाले. अर्थात निवडणुकीच्या आधीची राजकीय स्थिती आणि निवडणूक निकालानंतरची राजकीय स्थिती याच्यात बरीच तफावत असते. मतदारांनी ज्या राजकीय पक्षाच्या पारड्यात भरभरून मते घातलेली असतात त्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जी काही जीवघेणी स्पर्धा सुरू होते तिला भारतीय राजकारणात तरी दुसरी अन्य कोणतीही उपमा देता येणे शक्य नाही.

- Advertisement -

या चार राज्यांच्या निवडणूक निकालांचे जे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटले आहेत आणि आगामी काळातही ते उमटणार आहेत ते जर लक्षात घेतलं तर निवडणूक निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना २०२४ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जे काही वदवून घेतले आहे त्यामागेदेखील भाजपचे दरबारी राजकारण आहे, असे म्हटले तर नवल वाटायला नको. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा जर धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत स्पष्टपणे कोणत्याही एका नेत्याचे नाव चटकन नजरेसमोर येत नाही अशी महाराष्ट्राची आजची राजकीय स्थिती आहे.

२०१४ मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षश्रेष्ठींनी निवड केली होती त्या वेळची जर राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर ती २०२४ च्या तुलनेत बरीच बोलकी होती. मुळात शिवसेनेच्या विरोधात लढूनही भाजपला स्वबळावर महाराष्ट्रात तब्बल १२३ आमदार निवडून आणता आले होते. हाच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी सुखद धक्का होता. त्यावेळच्या भाजपमधील मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांची नावे लक्षात घेतली तर त्यावर प्रामुख्याने तत्कालीन विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नावे प्रामुख्याने चर्चेत होती.

- Advertisement -

पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी निवड करताना कोरी पाटी असलेल्या आणि भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची निवड करून तत्कालीन प्रस्थापित भाजप नेत्यांना धक्का दिला होता. कारण महाराष्ट्राचे सर्वोच्च असे मुख्यमंत्रीपद मिळण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे साधे आमदार होते. त्यांना त्यापूर्वी कोणत्याही मंत्रीपदाचा अनुभव नव्हता. त्यामुळे एकदम आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपने मुख्यमंत्री केल्यानंतर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि त्याचा कारभार हा देवेंद्र फडणवीस यांना झेपेल की नाही याबाबत भाजपमध्येच शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या, तथापि देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ अशी सलग पाच वर्षे जोरदार बॅटिंग करत त्यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या संधीचे रूपांतर भाजपसाठी सुवर्णसंधीत करून दाखवले होते.

अर्थात राज्यामध्ये भाजपचा विस्तार बळकटपणे करताना त्यांनी पक्षामध्येच त्यांना वरचढ होऊ शकणारे अथवा मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकणारे असे जे प्रस्थापित भाजप नेते होते त्यांची त्यांनी योग्य ती व्यवस्था करण्याचे काम या पाच वर्षात चोखपणे बजावले होते. हे सर्व एवढं सविस्तरपणे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपने ठिकठिकाणी जल्लोष केला. त्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल, असा प्रश्न विचारत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जे वदवून घेतले हा आगामी काळातील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या व्यूहरचनेचा एक भाग आहे असे समजण्यास हरकत नाही.

वास्तविक २०१९ मध्येच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची वेगळी भूमिका घेतली नसती तर आगामी पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते ही काळ्या दगडावरील रेघ होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात झाले ते सर्वश्रुत आहे. अगदी दीड पावणे दोन वर्षांपूर्वी भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवत राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार पाडले आणि शिवसेनेतीलच एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले.

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा जो कार्यक्रम होता तो जर ठळकपणे आणि बारकाईने लक्षात घेतला तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता नव्हती, मात्र तरीदेखील त्यावेळी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे जे आदेश दिले ते फडणवीस यांच्यासारख्या कुशल, मुत्सद्दी, कर्तबगार भाजप नेत्यासाठी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट करणारे होते. त्यामुळे २०२४ मध्ये जर महाराष्ट्रात भाजपला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बहुमत मिळाले तरी त्यानंतरदेखील राज्याचे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मिळेल याची कोणतीही शाश्वती आज तरी भाजपमधील राष्ट्रीय पातळीवरील एकही नेता देऊ शकणार नाही.

मुळात सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी जी काही वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे महाराष्ट्राकडे बघण्याचा दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची जी घनिष्ठ मैत्री होती ती लक्षात घेता दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठी हे आता फडणवीस यांच्याकडेही काहीशा वेगळ्या नजरेतून पाहू लागले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेतीलच एक मोठा वर्ग भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या हाती सापडला असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अत्यंत निकडीची अशी गरज भाजपला आता तरी राहिलेली नाही. त्याचप्रमाणे शरद पवार यांची राष्ट्रवादीदेखील आता पूर्वीसारखी एकसंध नाही.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये काही महिन्यांपूर्वी सहभागी झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जी दोन दिग्गज सत्तास्थाने होती, त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वप्रथम त्यांच्याच पक्षातील बंडखोरांशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन दिग्गज सत्ता केंद्रांचे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर राजकीय खच्चीकरण केले आहे. ठाकरे आणि पवार यांच्यातील या खच्चीकरणाचा भाजपला जो मोठा लाभ होणार आहे तो हा की, आगामी निवडणुका भाजपला या दोन प्रमुख राजकीय पक्षांशी लढाव्या लागण्याची शक्यता धूसर आहे.

कारण या दोन्ही नेत्यांचा निवडणुकांमधील प्रचार हा प्रामुख्याने त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांशी लढण्यातच करावा लागणार आहे. देशभरातील भारतीय मतदारांवर आजही असलेला नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रभाव आणि महाराष्ट्रातील ही परिस्थिती लक्षात घेतली तर भाजप पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे यांची सत्ता आली तर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालतील हे आता तरी म्हणणे खूप धाडसाचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा पुढे निघून गेली तर २०२४ नंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहण्याची शक्यता अधिक आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -