घरसंपादकीयअग्रलेखदहशत पोसणार्‍या हुकूमशहाचा अंत

दहशत पोसणार्‍या हुकूमशहाचा अंत

Subscribe

सध्या सगळ्याच बाजूने डबघाईला आलेल्या पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दुबईत एका रुग्णालयात निधन झाले. ज्या व्यक्तीने उभ्या आयुष्यात भारताचा कायम द्वेष केला, कायम भारताला धमक्या दिल्या, चेहर्‍यावर आणि मनामध्ये कायम आक्रमकता जोपासली, अशा हुकूमशहाचा त्याच्या देशाच्या बाहेर एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. आपण केवढे, आपला देश केवढा आणि आपण काय वल्गना करत आहोत, याचा मुशर्रफ यांनी कधीच विचार केला नाही.

सध्या सगळ्याच बाजूने डबघाईला आलेल्या पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दुबईत एका रुग्णालयात निधन झाले. ज्या व्यक्तीने उभ्या आयुष्यात भारताचा कायम द्वेष केला, कायम भारताला धमक्या दिल्या, चेहर्‍यावर आणि मनामध्ये कायम आक्रमकता जोपासली, अशा हुकूमशहाचा त्याच्या देशाच्या बाहेर एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. आपण केवढे, आपला देश केवढा आणि आपण काय वल्गना करत आहोत, याचा मुशर्रफ यांनी कधीच विचार केला नाही. अर्थात, असा आक्रमकपणा बाळगणारे मुशर्रफ हे काही पाकिस्तानचे पहिले हुकूमशहा नाहीत. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या त्यांच्या लष्करप्रमुखांनी आणि राष्ट्राध्यक्षांनी असाच आक्रमक पवित्रा घेतलेला होता. या सगळ्या हुकूमशहांचे एक स्वप्न होते, ते म्हणजे सगळा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात घेणे. त्यासाठी त्यांनी हरतर्‍हेने प्रयत्न केले. भारताशी आपल्याला थेट युद्धात जिंकणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर त्या हुकूमशहांनी काश्मीरमधील मुस्लिमांची मोठी संख्या लक्षात घेऊन तिथे धर्माच्या आधारावर दहशतवाद पेरला आणि पोसला. परवेझ मुशर्रफ हे या प्रयत्नांमध्ये सगळ्यात आघाडीवर होते.

लष्करप्रमुखाने देशाच्या पंतप्रधानाला उलथून सगळी सत्ता ताब्यात घ्यायची हा पाकिस्तानच्या निर्मितीपासून रुढ झालेला शिरस्ता आहे. लोकनियुक्त पंतप्रधानाचा काटा काढून संपूर्ण देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली की मग आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, अशी या हुकूमशहांची भावना असते. मुशर्रफ लष्करप्रमुख असताना नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यातील स्पर्धा तीव्र होत चाललेली होती. मुशर्रफ आपली सत्ता उलथवून टाकण्यासाठी कटकारस्थान रचत आहेत, याची कल्पना शरीफ यांना आलेली होती. त्यामुळे संधी मिळाल्यावर मुशर्रफ यांचा काटा काढण्याची ते वाट पाहत होते. मुशर्रफ ज्या विमानात बसले होते. त्या विमानाला खाली उतरण्यास प्रतिबंध करण्यात आला. मुशर्रफ यांचे विमान खाली उतरण्याची प्रतीक्षा करत होते. एका बाजूला त्यांच्या विमानातील इंधन संपत आले होते. आपला अंत जवळ आला आहे हे मुशर्रफ यांच्या लक्षात आले. यामागे नवाझ शरीफ आहेत, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मोठ्या मुश्किलीने विमान पाकिस्तानच्या विमानतळावर उतरवले आणि कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर जराही वेळ वाया न घालवता लष्करी ताकदीचा वापर करून नवाझ शरीफ यांची सत्ता बरखास्त केली आणि त्यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर शरीफ यांनी मुशर्रफ यांच्या हातापाया पडून स्वत:ची सुटका करून घेतली आणि ते लंडनला परागंदा झाले.

- Advertisement -

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान बससेवा सुरू केली. त्या पहिल्या बसमधून अटल बिहारी वाजपेयी स्वत: पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ होते. तेव्हा पाकिस्तानात वाजपेयी यांचे मोठे स्वागत करण्यात आले. हा सगळा उत्साह आणि आनंद पाहून दोन्ही देशातील लोकांना असेे वाटू लागले होेते की, आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. पाकमधील एका स्वागत सभेत भाषण करताना वाजपेयी यांनी जंग न होने देंगे, ही कविता म्हटली होती. सगळा माहौल उत्साह आणि आनंदाने भारावून गेलेला होता. ज्या वेळी वाजपेयी पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन मैत्रीचे आणि दोन्ही देशांमधील विश्वास वाढावा म्हणून आवाहन करत होते, त्याच वेळी लष्करप्रमुख असलेले परवेझ मुशर्रफ घुसखोरांच्या वेशातील पाकिस्तानी सैन्याला भारतीय हद्दीतील कारगील भागात घुसवत होतेे. वाजपेयी शांतीचा संदेश देऊन भारतात परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, पाकिस्तानच्या लष्कराने कारगीलमध्ये घुसखोरी केलेली आहे. त्यानंतर वाजेपयी यांनी नवाझ शरीफ यांना या विश्वासघाताबद्दल विचारणा केली असता, त्यांनी हात वर केले आणि तो परवेझ मुशर्रफ यांचा निर्णय असल्याचे सांगितले. कारगीलमधील पाकिस्तानी घुसखोर सैनिकांना हाकलून देण्यासाठी जेव्हा भारताने मोठ्या विमानांचा वापर करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडण्याचा निर्णय घेतला तेव्हा पाकने अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणला. मोठे युद्ध भडकू नये म्हणून भारताने सौम्य युद्धाचा पवित्रा घेतला, पण त्यामुळे हे युद्ध दीर्घ कालावधी चालले आणि अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले.

पुढे वाजपेयी पंतप्रधान असताना पाकिस्तानचे सर्वेसर्वा झालेले मुशर्रफ भारत दौर्‍यावर आले होते. मागील कटुता विसरून संबंध सुुधारण्याचा वाजपेयींनी पुन्हा प्रयत्न केला, पण मुशर्रफ यांना सगळा काश्मीर हवा होता, तो त्यांचा हेतू काही साध्य झाला नाही. त्यामुळे ते दौरा अर्धवट सोडून अचानक निघून गेले. मुशर्रफ यांनाही पुढे पदच्युत होऊन पद आणि देश सोडावा लागला. त्यावेळी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, आम्हाला अमेरिकेकडून मिळत असलेली मदत आम्ही भारताच्या विरोधात वापरत होतो, असे सांगितले होते. इतकेच नव्हे तर पाकिस्तानात ज्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आम्ही पोसून मोठे केले, जे आमचे हिरो बनले होते, तेच आज व्हिलन बनून पाकिस्तानच्या अध:पातास कारणीभूत ठरत आहेत, असे म्हटले होते. आपण काय कुरापती केल्या हे मुशर्रफ यांनी आपल्याच तोंडाने सांगितले होते. त्यामुळे दहशत पोसणार्‍या अशा हुकूमशहाच्या मृत्यूनंतर भारतीयांनी कशासाठी श्रद्धांजली वहायची?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -