राऊत विरोधकांच्या जाळ्यात

संपादकीय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठला आहे. तसे पाहिले तर असे केव्हा ना केव्हा तरी होणे अपेक्षितच होते. सुरुवातीला खासदार संजय राऊत यांची दररोज सकाळी होणारी पत्रकार परिषद म्हणजे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दिवसभरातील अजेंडा काय आहे ते स्पष्ट व्हायचे, मात्र हळूहळू संजय राऊत यांचा जिभेवरील ताबा सुटू लागला आणि बेछूट, बेधडक विधाने ते करू लागले. पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या एखाद्या जबाबदार व्यक्तीने अशी विधाने केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले, पण ते सावरले नाहीत. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेची पातळी अनेकदा सुटली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना प्रसिद्ध होणार्‍या अग्रलेखांवर त्यांची छाप स्पष्टपणे दिसायची; भलेही ते अग्रलेख संजय राऊत यांनी लिहिलेले असले तरी! पण त्यांच्या पश्चात निर्बंधच सुटले. या अग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या भाषेत टीका केली जायची त्याला भाजपने आक्षेप घेतला होता. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिकाच्या तत्कालीन संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्रही लिहिले होते. संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणार्‍या भाषेचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला होता.

तथापि चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्राचा काहीही परिणाम संजय राऊत यांच्यावर झाला नाही. वृत्तपत्रातून लिखाण करताना ते काहीतरी मर्यादा पाळत होते, पण प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा जिभेवरील ताबा पूर्णपणे सुटला. अभिनेत्री कंगना रणौत हिला ‘हरामखोर’ असे त्यांनी म्हटले आणि नंतर त्यावर त्यांनी सारवासारवही केली, पण त्यांची जीभ दिवसेंदिवस घसरतच गेली. कॅमेर्‍यासमोर बोलताना ते थेट शिव्यांचाच वापर करू लागले. भाजप नेते किरीट सोमय्या हे खासकरून त्यांच्या निशाण्यावर होते. संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. १७ सेकंदांच्या या क्लिपमध्ये त्यांनी २७ वेळा एका महिलेला शिव्या दिल्याचे समोर आले आहे. सर्वात कहर केला तो विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर! त्यांनी या बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल करताना शिव्या देण्याबरोबरच या बंडखोरांना रेड्यासह विविध विशेषणांनी संबोधले.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्व आमदारांच्या मनात ही खदखद होतीच. कायम कोणत्या ना कोणत्या वादात अडकणारे आमदार संतोष बांगर यांनी तर थेट खासदार राऊत यांच्या कानशिलात देण्याची भाषा वापरली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर यातील काही आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत ही खंत व्यक्तही केली. राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे संजय राऊत विजयी झाले, तर संजय पवार पराभूत झाले होते. त्याचा उल्लेख करत ‘साला, भलताच पडला, पडायला तर दुसरा पाहिजे होता,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेतील आमदारांची होती, असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनादेखील ‘वाचाळ’ संजय राऊत हे केव्हा तरी आपल्या सर्वांना गोत्यात आणू शकतात अशी भीती होतीच. तशी ती काही नेत्यांनी खासगीत व्यक्तही केली होती.

गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यावर त्यांची भाषा नरमाईची झाल्याचे जाणवले. ईडी किंवा ज्यांनी ज्यांनी हे कटकारस्थान रचले त्यावर मी टिप्पणी करणार नाही. त्यांना जर यात आनंद मिळाला असेल तर मीसुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहे, हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे कौतुकही त्यांनी केले. फडणवीस यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला होता, पण बुधवारी अखेर खासदार संजय राऊत यांनी आपल्या राजकीय विरोधकांना संधी दिलीच. राज्य विधिमंडळाचा उल्लेख त्यांनी ‘चोरमंडळ’ असा केला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खासदार संजय राऊत यांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. सुरुवातीला कारवाई आणि नंतर थेट हक्कभंगाचा ठराव मांडण्यात आला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील या विधानाबाबत नाराजी व्यक्त करत खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे समर्थन केले. त्यामुळे आता त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करायची की नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या ८ मार्चला जाहीर करणार आहेत. सर्वात अवघड स्थिती उद्धव ठाकरे समर्थक आमदारांची झाली आहे. सहनही होईना आणि सांगताही येईना, अशी त्यांची स्थिती आहे. मनात खदखद असली तरी ती व्यक्त करता येणार नाही, पण या घटनेचीदेखील इतिहासात नोंद होऊ शकते. एखाद्या खासदाराविरोधात कारवाई करण्यासाठी त्याच्याच पक्षातील निम्म्याहून अधिक आमदार सरसावतात असे कुठे घडले नसेल, पण यातून ते काही बोध घेतील असे वाटत नाही, तर दुसरीकडे अनायसे जाळ्यात सापडलेल्या संजय राऊत यांना त्यांच्याच पक्ष सहकार्‍यांसह इतर पक्षीय आमदारदेखील धडा शिकवण्याची संधी सोडणार नाहीत हे निश्चित.