घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥
याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार प्रसन्न झाले आणि परम उल्हासाने अर्जुनास म्हणाले, “तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल, ऐक.
देखा कामधेनुऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥
ज्ञानेश्वर म्हणतात पहा, ज्या नशीबवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे, त्याला खेळण्यास चंद्रदेखील मिळेल.
पाहें पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना? ॥
आणखी असे पहा की, उपमन्यूला श्रीशंकर प्रसन्न झाल्यावर त्याचे इच्छेप्रमाणे दूधभाताचे ऐवजी त्याला त्यांनी क्षीरसमुद्र दिला नाही का?
तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा? ॥
त्याचप्रमाणे औदार्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो अर्जुनास प्राप्त झाला असता सुखाचे वस्तिस्थान त्यांनी का न व्हावे? अर्थात झालेच पाहिजे.
एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मी- कांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥
किंवा श्रीलक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी, त्याने आपले इच्छेप्रमाणे मागावे यात चमत्कार तो कोणता?
म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥
म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते ते त्याला प्रसन्न वदनाने श्रीकृष्णांनी दिले. ते काय, ते आता सांगतो.
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥
भगवान म्हणाले, हे कुंतीसुता, खरोखर विचार केला असता, कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -