घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि ऋग्यजुःसामु । हे तीन्हीं म्हणे मी आत्मारामु । एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥
म्हणून ऋक्, यजु व साम हे तिन्ही वेदही मीच. याप्रमाणे वेदांची वंशपरंपराही मीच होय, असे श्रीकृष्ण म्हणाले.
हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परम गती मी ॥
हे सर्व स्थावरजंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आत भरलेले आहे ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते, ते उत्तम स्थान मी.
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये । जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥
आणि ज्याच्यामुळे ही प्रकृती वाचते, ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते व जो प्रकृतीच्या स्वाधीन होऊन सत्त्व, रज व तम या गुणांचा उपभोग घेतो.
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता । मी गोसावी एथ समस्ता । त्रैलोक्याचा ॥
तो विश्वलक्ष्मीचा पति मीच; आणि अर्जुना, सर्व त्रैलोक्याचा स्वामीही मीच.
आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगें नसावें । पावकें दाहावें । वर्षावें जळें ॥
आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायूने क्षणभरदेखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टी करावी.
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥
पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वहावा ही आज्ञा माझी आहे.
म्यां बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले । म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥
मी बोलविल्याने वेद बोलतात, मी चालविल्याने सूर्य चालतो, सर्व जगाचा चालक जो प्राण तोही मी हालविल्याने हालतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -