घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय सिणले । रायाचे हात? ॥
अरे, एखादे शहर राजाने वसविले या म्हणण्यात जरी खरेपणा असला तरी खरोखर पाहू गेले असता राजाच्या हाताला काही शीण पडतो का?
आणि मी प्रकृती अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥
आणि मी प्रकृतीचा स्वीकार करितो, तो कसा म्हणशील तर जसा स्वप्नावस्थेत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा.
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता?। कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय? ॥
तर, हे पंडुसुता, स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत येताना त्या मनुष्याचे पाय दुखतात का? किंवा स्वप्नांत असताना त्यात खरोखर फिरण्याचे श्रम तरी होतात का?
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥
या सर्वाचा अभिप्राय काय म्हणशील, तर ही भूतसृष्टी निर्माण करण्याला मला काहीएक करावे लागत नाही, हाच अर्थ आहे.
जैसी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारें आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु हा माझा । येर करणें तें इयेचें ॥
ज्याप्रमाणे राजाने आज्ञेत ठेविलेली प्रजा आपआपल्या कामाकरिता व्यापार करिते, त्याप्रमाणे प्रकृतीचा व माझा संबंध मात्र आहे. एर्‍हवी उत्पत्ती, स्थिती व लय हे सर्व व्यापार तिचेच आहेत.
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्रीं अपार भरतें दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे? ॥
हे पाहा, पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते, पण अर्जुना, येथे चंद्राला काही श्रम पडतात का?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -