घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं । आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥
मी सर्व स्थावरजंगमाचा आत्मा असून एकाचा कैवारी व एकावर रागावून त्यास मारणारा अशी माझी सर्वत्र प्रसिद्धी करितात.
किंबहुना ऐसें समस्त । जे हे मानुषधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥
किंबहुना अशा प्रकारचे सर्व क्षुद्र मनुष्यधर्म, ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते.
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणौनि ॥
ज्या वेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात, त्या वेळेस ती देवच आहे या भावाने तिला भजतात; मग तीच भंगल्यावर तिच्यातील देवपण नाहीसे झाले असे मानून तिचा त्याग करतात.
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥
मला या प्रकाराने मनुष्यच आहे असे समजतात, म्हणून त्यांचे ज्ञानच खर्‍या ज्ञानाच्या आड येते.
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरूनीचि पाहावे ॥
सारांश, ज्यांची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते त्यांचा जन्म व्यर्थच होत. ज्याप्रमाणे, पर्जन्यकाळावाचून मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजळाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत.
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । अभासती कां ॥
अथवा मातीच्या चित्रातले घोडेस्वार, मांत्रिकाने केलेले अलंकार किंवा संध्याकाळी ढगात दृष्टीस पडणारे नगर जसे भासते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -