वाणी ज्ञानेश्वरांची

अर्जुना झुंज देखें आताचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥
अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे भाग्यच समजा! अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगट झाला असे म्हणा!
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें। उदो केला ॥
अरे, याला काय युद्ध म्हणावे, हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुम्हांपुढे युद्धरूपाने उभा राहिला आहे.
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हे कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥
किंवा या तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुजवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे.
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥
अरे, क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला हा असला युद्धप्रसंग प्राप्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने जाताना इच्छित फळ देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा,
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥
किंवा या जांभईसाठी तोंड पसरले असता त्यात अकस्मात अमृत पडावे, त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे, असे तू समज.
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥
आता असे हे युद्ध सोडून भलत्या गोष्टींचे दुःख करीत बसलास, तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे होईल.
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥
या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिलेस, तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ति घालविलीस असे होईल.