घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥
ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्रसंन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते (म्हणजे स्वप्नातसुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही).
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयाचें मन ओलावा । विवेकासी ॥
ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो (ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही) व ज्यांचे मन विचारास जीवन आहे.
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसी आले । पालव नवे ॥
ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलींची कोवळी पाने आहेत.
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥
जे पुरुष परिणामाला (पूर्ण अवस्थेला) फुटलेले अंकुर आहेत, जे (सात्विक) धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत,
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥
ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते.
जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥
ज्यांनी सर्व इंद्रियांचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक, त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -